आमच्याविषयी

शिक्षण विवेक    22-Jan-2017
Total Views |

जागतिकीकरणाच्या युगात शिक्षणाचं, ज्ञान संपादनाचं, माहिती मिळवण्याचं महत्त्वाचं साधन ठरतं आहे, ते इंटरनेट (माहितीजाल). लहान-थोरांसाठी, सगळ्यांसाठीच अशी नानाविध संकेतस्थळं आज उपलब्ध आहेत. याच पार्श्वभूमीवर समाजात अस्तित्वात असणाऱ्या महत्त्वाच्या क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून त्यातल्या महत्त्वाच्या घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. गेल्या चार वर्षांपासून साप्ताहिक विवेकची भूमिका अंगीकारत शिक्षणविवेक नियतकालिक स्वरूपात प्रकाशित होऊ लागलं, त्याचा एक पुढचा टप्पा म्हणजे शिक्षणक्षेत्राला वाहिलेलं हे संकेतस्थळ. 

‘शिक्षण’ हा समाजाचा पायाभूत आणि महत्त्वाचा भाग आहे. विकासाची, प्रगतीची बीजं जेथून रुजवली जातात, रोवली जातात त्या क्षेत्राचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे मूलभूत आणि तितकेच अत्यावश्यक घटक आहेत. या तीनही घटकांना अत्यावश्यक असणारं साहित्य येथे आहे. या तीनही घटकांमध्ये समन्वय, सुवर्णमध्य साधला जाईल आणि त्यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी मदत होईल, असा प्रयत्न केला आहे. एकाच संकेतस्थळावर, एकाच वेळी, एकत्रितपणे माहिती मिळण्याचे आणि तरी या प्रत्येक घटकाचे अनन्यत्व जपत, या प्रत्येक घटकाला पूरक  ठरणाऱ्या भूमिकांची मांडणी वेगवेगळ्या पद्धतींनी, वेगवेगळ्या माध्यमांतून येथे केली आहे.
आजच्या काळात ‘मूल्य’ ही संकल्पना निरनिराळ्या अर्थाने वापरली जात असली, तरी छोट्या-छोट्या क्षेत्रांमध्ये अगदी रोजच्या रोज आपण निरनिराळी मूल्य अगदी सहजपणे जोपासत जातो, आपल्याच मुलांमध्ये ती मूल्य रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नही करत असतो, त्या मूल्यांना दिशादर्शक ठरेल अशी लेखात्मक माहितीही येथे देत आहोत. अर्थात या मूल्यांचं स्वरूप थोडं निराळं आहे. यात कलेच्या आस्वादाचं, निसर्गभानाचं, प्रयोगशीलतेचं, स्व-ओळखीचं मूल्य अंर्तभूत आहे. ‘शिक्षणानं ‘माणूस’ घडत जातो’, हे सगळ्यांनाच मान्य होणारं, पण घासून गुळगुळीत झालेलं विधान असलं तरी, आजचा आपला अनुभव हेच सांगतो की, शिक्षणानं माणूस ‘माणूस’ म्हणून घडत असतो. आणि तो माणूस म्हणून घडला की, आजच्या काळातील परवलीचे शब्द असणाऱ्या स्वातंत्र्य, समता आणि बंधूता या त्रिसूत्रीचाही नव्या आयामानं विचार करू लागतो, त्याची दृष्टी मीपणाकडून, आपलेपणाकडे वळू लागते. या आपलेपणाला खतपाणी घालणाऱ्या या तीन संकल्पनांचा नवा अन्वयार्थ लावण्याची एक दिशाही येथे मिळेल.
शिक्षण क्षेत्र हे निरनिराळ्या पातळ्यांवर, निरनिराळ्या पद्धतीनं जगासमोर येत आहे, ते स्वत: निरनिराळ्या वैचारिक भूमिकांतून व्यक्त होत आहे. जागतिकीकरणाचा एक धागा शिक्षण क्षेत्रही आपल्या हातात धरून आहे. या धाग्यात वैविध्यता असली तरी, ती जपत, तिच्यात एकवाक्यता ठेवण्याचं काम, आपली अशी एक भूमिका मांडण्याचं काम, आपल्या सगळ्यानांच एका चळवळीच्या माध्यमातून पार पाडावं लागणार आहे. या शिक्षण चळवळीचा एक भाग होत, या चळवळीला निश्चित आणि नेमकी दिशा देण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे.