गजानना श्री गणराया। आधी वंदू तुज मोरया॥

अशी आपण सगळयांनी गणरायाची आळवणी केली. कोण होता हा गणपती, त्याचाच का एवढा उत्सव, त्यालाच का एवढं महत्त्व असे अनेक प्रश्न पडणं अगदी नैसर्गिक आहे. विद्यार्थी म्हणून तुम्हाला असे प्रश्न पडलेच पाहिजेत. मलाही अगदी माझ्या लहानपणापासून असे प्रश्न पडायचे. गेल्यावर्षी आमच्या शाळेत पाहुण्या म्हणून आलेल्या लेखिका वैशाली पंडित यांनी एक गोष्ट सांगितली आणि मला गणपतीबाबत पडणाऱ्या अनेक का जवळजवळ सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळाली. आज मी ती गोष्ट तुम्हाला सांगते.

कोकणातल्या एका खेड्यात एका गरीब आई वडिलांच्या पोटी एक बालक जन्माला आलं, माघी चतुर्थीला. दिसायला बघाल तर एकदम कसंतरीच. मिचमिचे डोळे, ओघळणारे ओठ, मोठ्ठे कान, सुटलेलं दोंद म्हणजे पोट. पोरगं दिसामाजी वाढू लागलं. आपलं मूल कसंही असलं तरी आईवडिलांचं लाडकंच असतं तसं हेही बाळ होतं. बरं हुशारही होतं बऱ्यापैकी. म्हणून वडिलांनी अनेक गुरुंना विनंती केली त्याला शिकवायची पण हे असं वेडविद्रं रूप बघून कोणीही त्याला शिष्य म्हणून पत्करेना. वडील त्याला घेऊन मजल दरमजल करत पार हिमालयापर्यंत पोहोचले आणि हिमालयात त्यांना एक जोडपं भेटलं. बुद्धीने तल्लख आणि वृत्तीने कफल्लक. तेच शंकर पार्वती. त्यांनी या मुलाला शिकवण्याचं आव्हान स्वीकारलं आणि चौदा विद्या आणि चौसष्ट कलांमध्ये त्याला पारंगत करून सोडलं.

कालांतराने सर्व विद्या आणि कलांमध्ये पारंगत झालेला हा तरुण आपल्या मूळ गावी कोकणात परत आला, तो हा गजानन. तर कोकणात नरांतक नावाच्या क्रूरकर्म्याने थैमान घातलं होतं. नावाप्रमाणेच हा नरांतक होता. नरसंहार करत राहणे हेच ह्याचे काम. सगळ्याना त्याने पुरते सळो की पळो करून सोडले होते. त्याला शह देण्यासाठी त्या गजाननाने प्रत्येक घरात एक सैनिक तयार केला तो 'गणपती'. प्रत्येकाला शास्त्रोक्त शिक्षण देत पारंगत केले. प्रत्येक शंभर गणपतींचा प्रमुख महागणपती वगैरे रचना करून सैन्यच तयार झाले. या सैन्याने नरांतकाच्या सेनेचा पराभव केला आणि गजाननाने नरांतकाचा वध केला. हे युद्ध सुरू झाले भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आणि दहा दिवसांनी नरांतकाचा वध केल्यावर गजाननाने कोणताही सत्कार न स्वीकारता सरळ समुद्राच्या पाण्यात आपण विसर्जित झाला. सर्व जनतेला रुखरुख लागून राहिली की आपण गजाननाप्रती कोणतीच कृतज्ञता दाखवू शकलो नाही म्हणून त्यांनी घरोघरी जे गणपती म्हणजे सैनिक होते त्यांची पूजा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला करण्याची पद्धत सुरू केली. त्याचंच रूपांतर पुढे मूर्तीपूजेत झालं आणि अनंत चतुर्दशीला, ज्या दिवशी गणपतीने सागरगमन केलं त्या दिवशी मूर्ती पाण्यात विसर्जन करायची पद्धत पडली.
आता तुमच्याही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील ना? आणि याआधीच्या सर्व गोष्टींमध्ये मी बाप्पाबद्दल तो माणूस असल्यासारखं का बोलत होते हेही लक्षात आलं असेल ना?

- मेघना जोशी