बाळासाहेब बबन भरम, सेवक,

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे.

"आपण अण्णांची चाकरी करतो, कुणाला पटो अगर न पटो" असे म्हणणारे मुलांचे लाडके भरम काका आज आपल्यात नाहीत. शाळेतील कितीतरी मुलांना नकळत मदत करणारे, अत्यंत हुशार, चाणाक्ष, नेमकी कोणाला मदत हवी असेल हे ओळखणारे भरम काका. फक्त शाळेतच मुलांवर भरम काकांचा प्रभाव होता असे नाही तर, शाळेबाहेरही मुले आपल्या समस्या भरम काकांना सांगत. भरम काका कधी स्वतःच्या खिशातून तर कधी इतरांकडून मुलांना मदत मिळवून द्यायचे. भरम काकांना सांगितले म्हणजे ‘प्रॉब्लेम सॉल्व्ह’ असा मुलांना कायम विश्वास असायचा.
मला अजूनही आठवतो तो प्रसंग, आणीबाणीचा आणि भयानक पण भरम काकांनी सहज हाताळलेला. कसे ते त्यांनाच माहीत. आमच्या आणि शेजारच्या शाळेच्या मुलांची भांडणे झाली. भांडणे विकोपाला गेली. मी मैदानावरच तास घेत होते. समोरच मुलांना भरम काका ओरडत होते. तेवढ्यात समोरच्या मुलाने नारळवाल्या काकांच्या हातून कोयता हिसकावला आणि आमच्या मुलांवर फेकून मारला. तोच काकांनी मला हाक मारली. मी पोहोचले तेव्हा आमच्या मुलाने तो कोयता व्यवस्थित झेलला होता पण त्याने समोरच्या मुलाला फेकून मारण्यासाठी उगारला होता. नेमका त्याच वेळी त्याचा हात मी पकडला. कोयता त्याच्या हातातून सोडवून नारळवाल्या काकांना देऊन टाकला. मोठा अनर्थ टळला, पण आमच्या ‘त्या’ मुलाचा पारा चांगलाच चढला. तो माझ्या अंगावर ओरडत होता. "तुम्हाला बघून घेतो. त्याला तुम्ही सोडून दिले. मलाच दादागिरी दाखवता", असे बरेच काही तो बोलत होता. भरम काकांनी समोरच्या मुलांना शांत करून तिथून पिटाळून लावलेे. मात्र आमचा मुलगा प्रचंड चिडला होता. त्याच्या मित्रांसमोर त्याला अडविल्यामुळे त्याचा अपमान झाला होता. मी ही नंतर तास संपल्यावर वर्गात निघून गेले. शाळा सुटली.
‘तोच’ मुलगा माझ्याकडे आला व म्हणाला, ‘तुमच्या गाडीची चावी द्या.’ मी विचारले कशाला? तर म्हणाला, ‘पंक्चर काढून आणतो. हवा ही भरून आणतो.’ मला काहीच उलगडा होईना म्हणून मी का विचारले तर शांतपणे सांगू लागला. "कारण रागाच्या भरात तुम्हाला अद्दल घडवावी म्हणून मीच तुमच्या गाडीची हवा सोडली. चाक पंक्चर केले." मला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, "सॉरी, मला माफ करा. तुम्ही गेल्यावर भरम काकांनी मला समजावले. त्या मुलाचा नेम चुकला, पण ताईंनी तुला अडवले नसते तर? तुझा नेम चुकला नसता तर? किती भयंकर घडले असते?" "तू आयुष्यातून उठला असतास." मी त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला म्हणाले आणि भरम काकांकडे गेले.
भरम काका माझी वाटच पाहत होते. मला पहिल्या पहिल्या ते मला काळजीपोटी रागावत म्हणाले, "ताई जरा डोकं शांत यात तुम्हालाही अपघात झाला असता तर? पुढच्या वेळी काळजी घ्या." मी काहीच बोलले नाही. काकांनी एक बाका प्रसंग उलटवून लावला होता. मुलालाही सरळ मार्गावर आणले. असे प्रसंगावधान राखणारे, मुलांवर जीवापाड प्रेम करणारे भरम काका स्वतःवर ओढवलेल्या संकटाला मात्र परतवू शकले नाहीत. आज जरी भरम काका आपल्यात नसले तरी त्यांच्यासोबत राहिलेल्या प्रत्येकाच्या मनात भरम काकांच्या स्मृती जाग्या आहेत.
'काका तुमची आठवण सतत येत राहणार!'


- सुनिता वांजळे