नमस्कार बालमित्रांनो!

निसर्ग आपला गुरू नावाचे आपण एक सदर सुरू केले आहे. मागच्या भागात आपण किडा-मुंगीपैकी, मुंगी माणसाची गुरू कशी होऊ शकते हे बघितलं. आता आपण कोळी हा कीटक माणसाचा गुरू कसा होऊ शकतो हे बघू या. तुम्ही सगळ्यांनी कोळी हा कीटक, त्याचं जाळं आणि स्पायडरमॅन सिनेमाही बघितलेला आहे. मुंगीप्रमाणे कोळी सुद्धा माणसाला अनेक प्रकारचे ज्ञान देतो.  पण ते समजावून घेण्यासाठी आपण शाळेपासून सुरुवात करू या. शाळेत ज्या वेळी आपल्याला भूमिती हा विषय सुरू होतो, त्या वेळी तो शिकण्यासाठी आपल्याजवळ कंपास पेटी असते. यात पट्टी, पेन्सिल, खोडरबर, कोनमापक, कर्कटक, वगैरे सगळे साहित्य असते. वर्गात आपले भूमितीचे शिक्षक ते साहित्य वापरून समांतर रेषा कशा काढाव्यात? कोन कसा मोजावा? त्रिकोण, पंचकोन, वर्तुळ हे कसं काढावं हे शिकवतात. परंतु गंमत अशी होते विषय नीट समजलेला असून आणि सर्व साहित्य बरोबर असूनसुद्धा, आपल्याला पहिल्या प्रयत्नात या छोट्या आकृत्या काढायला नीट जमत नाही. षटकोन -अष्टकोन तर लांबच राहिले. खरं की नाही? आता आपण कोळ्याकडे वळू या. कोळी केवढास्सा, त्याचं शरीर, त्याचे हात, पाय, मेंदू, डोळे, हे सुद्धा किती छोटे. तो कोणत्याही शाळेत गेलेला नसतो. त्याला कोणी शिक्षक नसतात. समजावून सांगायला आई - वडील सुद्धा नसतात. मदतीला कोणीही नसतं. त्याच्याकडे कंपास पेटी वगैरे साहित्य तर अजिबात नसतं. तो बिचारा स्वतःच्याच  शरीरातून एक धागा बाहेर काढतो आणि बघता बघता षटकोनी किंवा अष्टकोणी जाळे विणतो. तेही काही तासात! मग आता ते जाळे डोळ्यासमोर आणा आणि मी सांगतो ती वैशिष्ट्ये त्या जाळ्यामध्ये आहेत की नाही ते पहा. जाळं षटकोनी असेल तर - 
१. उभ्या बांधलेल्या सहा धाग्यातला कोन बरोबर साठ अंशाचा असतो.
२. आडवे बांधलेले धागे बरोबर समांतर असतात. एकही धागा वेडावाकडा बांधला गेलेला नसतो. हो की नाही? मग आता पाहा, कोनात एक अंशाची पण चूक नाही आणि आडवे धागेही अगदी समांतर. किती परिपूर्ण असते की नाही त्याचं हे काम? याचा अर्थ असा की, कोणाची मदत नसताना, कोणतेही साहित्य बरोबर नसताना, केवळ स्वतःच्या हिमतीवर परिपूर्ण काम कसं करावं हे आपण कोळ्याकडून शिकू शकतो. मग आता कोळी माणसाचा गुरू झाला की नाही?
पण मित्रांनो, एवढ्यावर ही गोष्ट थांबत नाही. तुम्हाला ते जाळं आवडत नाही. तुम्ही साफसफाई करताना झाडूने ते झटकून टाकता. एका अर्थाने त्याचे घर उद्ध्वस्त केलं ना तुम्ही? तुमच्या घराच्या खिडकीची काच जर कोणी फोडली, तर तुम्ही किती आरडाओरडा कराल. पण काही तास खपून विणलेल्या त्याच्या जाळ्याला तोडले, तरी तो बिचारा शांत राहतो. तुम्ही तिथून निघून गेल्यावर, तो काही तास खपून परत पहिल्या इतकंच चांगलं जाळे विणतो. दोन दिवसांनी लक्षात आल्यावर, तुम्ही परत ते तोडलं तरीही न रागवता तो पुन्हा विणतो. एक वेळ तुम्ही कंटाळाल, पण तो जाळं विणायचं सोडणार नाही. याचा अर्थ असा की कोळी आयुष्यात कधीही हार मानत नाही अथवा निराश होत नाही. बघा किती मोठा गुण आहे त्याच्यात. म्हणून आपल्याला कोळ्याकडून दोन गोष्टी शिकायला मिळतात. एक म्हणजे स्वतःच्या हिंमतीवर परिपूर्ण काम कसं करावं आणि दुसरे म्हणजे आयुष्यात कधीही हार न मानता अथवा निराश न होता आपलं काम चालू ठेवावं. बालमित्रांनो, आपणही असेच काम करणे आवश्यक आहे ना?
बालमित्रांनो, निसर्गातील आपला तिसरा गुरू कोण हे आपण पुढील भागात अभ्यासू या.

- अविनाश ब. हळबे.