सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

दिंनाक: 28 Jun 2020 14:50:08


सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ब्रीद अमुचे भारी

छातीचा कोट करतो, रक्षण्या कायदा, नरनारी

बारोमासी, तिन्ही ऋतुत असे जागरणाची वारी

प्राण तळहाती अमुचा, आम्ही देशाचे पहारी ||धृ||
(कोरस:-
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
भारत माता की जय!
जय हिंद! जय महाराष्ट्र!)

जनतेसाठी कार्य अमुचे, आम्ही सदैव जनतेचे
कुणी पोलीस मित्र म्हणती आम्हासी रक्षक देशाचे
दिनरात जागे, सजगतेने करितो पालन कर्तव्याचे

कधी मृदू, खंबीर, कठोर आम्ही प्रतिरूप वज्रनियमांचे
समूळ मिटविण्या सज्ज आम्ही विकृती, गुन्हेगारी ||१||

संकट असो कोणतेही आम्ही उभे हिमालयापरी
जनतेच्या साथीने आम्ही मात करितो संकटावरी
कार्य करताना आम्हांसी माणसे भेटती भलीबुरी
ध्येय गाठताना धोका असे निरंतर अमुच्या शिरी
अमुच्या जागरुकतेने आनंद, सुरक्षा नांदते घरोघरी ||२||

कर्मसेवा आमुचा धर्म, मानव, जीव रक्षण आमुचा मंत्र
दुष्टांचा नायनाट करण्या घेतले आम्ही बंदूक, अस्त्रशस्त्र
खाकी वर्दी अमुचि आण बाण शान, नसे ते साधे वस्त्र
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ब्रीद, अमुच्यासाठी स्तोत्र
सहस्र एकीच्या बाहूं नि विजय मिळवितो अन्यायावरी ||३||

संघर्ष, त्याग अमुचा न्यारा, नित्य लढतो न्यायासाठी
माणसाला सुरक्षा, शांतता, सुखमय जीवन देण्यासाठी
कायदा, रक्षणासाठी चालवितो बंदूक, कधी लाठीकाठी
कधी चांगला, कधी वाईट 'प्रतिसाद' आमुच्या माथी
शंभर अमुचा नंबर लावता पोलीस गाडी तुमच्यादारी ||४||

गीतलेखन:-
राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे