मुंबई आणि मुंबईची ‘लाईफ लाईन’ समजली जाणारी आगगाडी अर्थातच रेल्वे, मुंबईतील लोकांचं सर्व जीवन हे रेल्वेवर अवलंबून आहे. रेल्वेशिवाय प्रवासाची कल्पनाही करू शकत नाही. सेंट्रल वेस्टर्न, हार्बर लोकल प्रवास म्हणजे एक आनंद पर्वणीच. आता तुम्ही म्हणाल आनंद पर्वणी कसली? एवढ्या गर्दीमध्ये चढणे आणि उतरणे शक्य आहे का? मुंबईचे लोक रोज कसा प्रवास करतात असे प्रश्न अनेकांना पडतो. परंतु या रेल्वे प्रवासाचे काही अलिखित नियम जर आपण पाळले, तर या रेल्वेचा प्रवास सुखकर होतो.    

रेल्वे इंग्रजांच्या राजवटीत सुरू झाली. माझ्या आजीकडून असे ऐकले होते की, इंग्रजांच्या काळात मुंबई ही खूप देखणी होती, लावण्यवती होती. भल्या पहाटे सर्व मुंबईतले रस्ते पाण्याने धुतले जायचे. तेव्हा स्वच्छ, सुंदर मुंबई होती. आपण जर असा विचार केला की हीच रेल्वे मुंबईत नसती तर बापरे कल्पनाच करू शकत नाही.

 कमाल आहे बुवा या इंग्रजांची. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा ठराव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जीजीभाई आणि जगन्नाथ नाना शेठ यांनी केला. मूळजी जेठा, मोरारजी, गोकुळदास आदमजी फिरभाई, डेविड ससून वगैरे अनेक नामांकित नगर शेटजीचे अर्थात त्यांना पाठबळ होते. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिंसुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली. अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. 18 एप्रिल 1853 सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. पाना-फुलांची हार तोरणे निशाने लावून दहा मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले इंजिनावर इंग्रजांचे मोठे निशाण फडकत होते. गर्दीच्या खुर्च्या त्यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर सर जमशेटजी जीजीभाई नाना शंकर शेठ आणि इतर जामानिमा करून बसलेले. बरोबर पाच वाजता गाडीने कु..ड..क शिटीचा करना कुमकुं आपल्या भगभग फकफक प्रवासाला सुरुवात केली. मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रजी चमत्कार पाहिला ‘आ’ वासून उभे होते.

 ना बैल, ना रेडा, ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक नाही, दोन नाही दहा डब्यांची माळ खुशाल चालली आहे. झुक झुक करीत लोखंडी रुळावरून! कमाल आहे बुवा या विंग्रेजांची!

 मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्यात जाऊन मुंबईला सुखरूप परत आली. परंतु वाफेच्या भुताटकीच्या गाडीत बसायचा लोकांचा धीर होत नव्हता. अशा वेळी लोकांना गाडीत बसण्यासाठी राजी करणे हे महत्त्वाचे होते आणि त्यासाठी त्यांना काही आमिषही दाखवली गेली. यामध्ये ठाणे ते मुंबई नेण्या-आणण्याची सोय मोफत देण्याची दवंडी पिटली गेली. आगगाडीत बसणे धोक्याचे नाही. प्रवास लवकर आणि सुखकारक होतो, हे लोकांना पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभार्‍यांनी खूप आटापिटा केला. लोकांच्यात अनेक अफवा पसरत होत्या. अफवांना पीक आल होतं. त्यातली महत्त्वाची अफवा म्हणजे, इंग्रज पूल बांधत आहेत. इमारती बांधत आहेत, त्याच्या पायात जिवंत गाढण्यासाठी माणसे हवी आहेत आणि ती फूस लावून नेत आहेत. हा त्यांचा डाव आहे; अशा अफवापुढे रेल्वे कारभारीही काही करू शकत नव्हते.

आगगाडीने प्रवास केला त्यांनी त्यांचे अनेक अनुभवही लोकांना सांगितले; पण लोकांची भीती काही केल्या जाईना. नंतर दर माणसी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवास असा डंका पिटला गेला. या पैशाच्या आमिषाने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले. पण ही माणसे जाताना त्यांचे घरातले आप्तजन आजूबाजूला उभे राहून ठणाण हाय मोकलायची आणि त्यांची समजूत काढता काढता रेल्वे अधिकारी वैतागायचे आणि प्रवास करून आल्यानंतर त्यांची चौकशी करणार्‍यांचे घोळके त्यांच्याभोवती जमायचे. हळूहळू रेल्वेने इनाम पद्धत बंद करून सर्रास तिकीट विक्री सुरू केली. ठाणे मुंबई बैलगाडी किंवा खटारा गाडीचा प्रवास एक दिवसाचा असायचा, परंतु या गाडीमुळे मुंबई ठाण्याचा प्रवास सव्वा तासात होऊ लागला आणि मग मात्र प्रवाशांची झुंबड उडू लागली.

 आज रेल्वेत इतका बदल झालेले आहेत. लोकांची गर्दी मात्र कमी होत नाही1853 साली सुरू झालेला हा रेल्वेचा प्रवास आजही अविरतपणे चालू आहे. इंग्रज दीडशे वर्षे राज्य करून गेले; परंतु या दीडशे वर्षांमध्ये भारतामध्ये अनेक सुधारणा पायंडे पाडून गेले. त्यातीलच एक म्हणजे सर्व सामान्य लोकांना परवडेल अशी अगीनगाडी, रेल्वे झुक झुक गाडी, आगगाडी... वाफेची गाडी ही विंग्रजाची भुताटकी आहे.

- विजयालक्ष्मी सणस, सहशिक्षिका, विद्यामंदिर, कल्याण