रवीकाका रिटायर्ड झाले होते. चांगल्या नोकरीत असल्याने पेन्शनही चांगली मिळत होती. त्यांनी एक नियम केला. कुणा ओळखीच्या व्यक्तिकडे, त्याला वेळ असेल तेव्हा जायचं. फक्त चहा घ्यायचा. थोडा वेळ संवाद साधायचा. जास्त वेळ थांबायचं नाही. फक्त घरातील मुलांत चांगले संस्कार दिसले, तर बक्षीस द्यायचं आणि निघून यायचं. असेच ते संध्याकाळी सहा वाजता सुषमाच्या घरी गेले. सुषमा त्यांच्या मित्राची मुलगी. तिचे पती चार्टर्ड अकाऊटंट होते. एक मुलगी किर्तना दुसरीत होती. मुलगा सुबोध चौथीत होता. सुषमा सुबोधला म्हणाली,

“सुबोध, काकांना पाणी दे बेटा!”
“थांब गं आई. देतो पाच मिनिटांनी. संपेलच आता कार्टुन.” सुबोध म्हणाला. तो टी.व्ही.पाहत बसला. सुषमाने किर्तनाला हाक मारली.
“किर्तु बेटा, काकांना पाणी दे राजा.”
“मी जरा झाडांना पाणी घालतेय ना.” किर्तना पटकन आत गेली आणि स्वच्छ ग्लासमध्ये पाणी घेऊन आली. काकांच्या हातात पाणी दिलं नी खाली फतकल मारुन बसली. ती कसलं तरी चित्र काढत होती. रंगही भरत होती. जसे जमतील तसे. तिन्ही सांजेची वेळ होती, म्हणून सुषमाने सुबोधला परत हाक मारली आणि देवापुढे दिवा लावायला सांगितलं. “थांब गं आई, पाच मिनिटांनी लावतो. संपेलच आता कार्टुन,” असं म्हणून त्याने खिशातलं चॉकलेट बाहेर काढून खाल्लं आणि चॉकलेटचा कागद जमिनीवरच टाकला. काकांना हे खूप खटकलं. सुषमाने मग किर्तनाला सांगितलं दिवा लावायला.
“किर्तुबाळा, तू तरी लाव.”
“हो आई.” असे म्हणून किर्तना लगेच उठली व दिवा लावला. काडेपेटीची जळलेली काडी जमिनीवरच न टाकता केराच्या टोपलीत टाकली. देवाला नमस्कार केला. आईलाही नमस्कार केला आणि रवीकाकांनाही केला. हे दृश्य पाहून रविकाकांना छान वाटलं. सुषमाचे झाडांना पाणी घालून झाले. ती आत गेली आणि गरम चहा घेऊन आली. “घ्या काका. कसं काय चाललंय? काकू कशा आहेत?”
“अगं, मजेत चाललंय. काकू मजेत आहेत. आज सहज भेटायला आलो तुम्हाला.” काकांनी चहा संपवला आणि सुषमाला म्हणाले, “मी निघतो गं पोरी. येईन परत कधीतरी.”
“हो काका.” असं म्हणून सुषमानेही काकांना नमस्कार केला. काकांनी आपल्या पिशवीत हात घातला आणि पेन्सिल, खोडरबर, शार्पनरचा सेट काढून, तो किर्तनाच्या हातात दिला. सेट देता देता म्हणाले, “किर्तू बाळा, तू आईने सांगितलेलं काम लगेच ऐकतेस ना, म्हणून तुला हे बक्षीस. लगेच उठून आईची छोटी छोटी कामं करणारी, घरात कचरा न करणारी मुलं मला खूप आवडतात. थांब गं, थांब गं, करणारी मुलं, कचरा जमिनीवरच टाकणारी मुलं मला आवडत नाहीत.” असं म्हणून त्यांनी सोफ्यावर बसलेल्या सुबोधकडे जरा नाराजीनेच पाहिलं. सुबोधला आपली चूक लक्षात आली. तो पटकन उठला. काकांना नमस्कार केला. किर्तनाला खूप आनंद झाला होता. सुषमालाही खूप आनंद झाला होता. मग सुबोध म्हणाला, “काका, पुढच्या वेळेस याल तेव्हा दोन बक्षीसे आणा. कारण मीही यापुढे आईचं सगळं पटकन ऐकेन. थांब गं, थांब गं, नाही करणार आणि हो घरात कचराही नाही करणार. मलाही द्याल ना बक्षीस?”
“हो तर. माझ्याजवळ गुणी बाळांसाठी नेहमीच बक्षीस असतं.” असं म्हणून काकांनी सुबोधला जवळ घेतलं. “मी आजही आणलंय एक्स्ट्रा बक्षीस. पण ते मी तुला पुढच्या खेपेला देईन. तू छान वागलास की...” असं म्हणून काका निघून गेले. आई स्वयंपाकघरात गेली. स्वयंपाक करताना तिने स्वयंपाक घरातूनच विचारलं, “मला कोथिंबीर-मिरची कोण आणून देईल?”सुबोध जोरात ओरडला, “मी देतो आई.” सुबोधने टी.व्ही पटकन बंद केला आणि कोथिंबीर आणायला गेला. सुषमाने लगेचच काकांना फोन लावला. “थॅक्स काका, तुमच्यामुळे सुबोधला कळले की, आईला छोट्या कामात मदत करावी. त्याने टी.व्ही स्वतःहून बंद केला आणि मला कोथिंबीर आणून द्यायला उठला. गोष्ट किरकोळ असली तरी फार मोलाची आहे. मी त्याला खूपदा सांगायचे. पण तो माझं नाही ऐकायचा. आज तुमचं मात्र त्याला पटलं. “खूप थॅक्स काका.” काका म्हणाले, “माझ्यामुळे जर सुबोध छान वागणार असेल, तर मला खूप आनंदच आहे गं. मी येईन परत तुमच्याकडे. सुबोधचं बक्षीस घेऊन...लवकरच....सुखी रहा.”


- शैलजा भास्कर दीक्षित, सहशिक्षिका, प्राथमिक विद्यामंदिर, मांडा