या पक्ष्याला पाहिलं तरी काही वेळा त्याची भीती वाटते. बरेचदा हा सुंदर पक्षी दिसला तर तो अपशकुन आहे असं मानलं जातं. पण खरं तर निसर्गचक्रात या पक्ष्याचं महत्त्वाचं स्थान आहे.... लक्ष्मीचं वाहन म्हणूनही या पक्ष्याला विशेष मान आहे बरं का...
तर ओळखा हा पक्षी त्याच्या पूर्ण नावासह...

याचं संस्कृत नाव आहे रक्तलोचन घुबड. रक्त म्हणजे लाल आणि लोचन म्हणजे डोळे. लाल डोळ्यांचं म्हणून रक्तलोचन. याला चित्रित घुबड असंही म्हणतात.त्याच्या अंगावर सुरेख नक्षी दिसते रेघारेघांची म्हणून चित्रित घुबड असंही नाव आहे. केवढी किमया आहे नं निसर्गाची! याला इंग्रजीत Mottled Wood-Owl असं संबोधतात.
याच डोकं छान ठिपकेदार असतं. चेहर्‍यावर पण वर्तुळांची नक्षीच दिसते. त्याचा पिसारासुद्धा नक्षीकाम केल्यासारखा असतो. साधारण ४८ से.मी. याचा आकार असतो.
हा राहतो निम सदाहरित जंगलात आणि बाहेर पडतो रात्रीच! झाडाच्या ढोलीत अंडी घालून हा पिल्लांना वाढवतो आणि याचा खाऊ आहे उंदीर, घूस, सरडे असे प्राणी.

 

-डॉ.आर्या जोशी