मैत्री

दिंनाक: 07 May 2020 13:51:53


कमळाच्या फुलाप्रमाणे मैत्रीच्या नात्यांचेही अनेक पैलू असतात. ते जसजसे उलगडू लागतात तसतसे ते अधिक सुंदर वाटू लागतात आणि मनाला खुलवतात, सुखावतात. जिवापाड प्रेम करणाऱ्या मित्रत्वाच्या नात्याची महती वेगळीच. मैत्रीचे नाते सहवासातून जुळते आणि फुलते; पण सहवास तुटला म्हणजे मैत्री तुटतेच असे नाही. मैत्रीचे हे नाते नवीन लावलेल्या रोपट्यासारखे आहे. त्याला जपा वाढवा आणि मैत्री फुलवा.
चांगले मित्र लाभणे म्हणजे नक्षत्रांचे देणेच असते. जन्माबरोबर अनेक नाती चिकटलेली असतात. आई-वडील, भाऊ-बहीण, आत्या, मावशी, मामा, असा गोतावळा.. त्यातला एक गुंता सोडवताना अनेक सूक्ष्म नात्यांची वीण गहिरी होत जाते. खरी मैत्री ही फुलातल्या सुगंधासारखी असते. सुखात हसरी साथ आणि दु:खात मायेचा उबदार हात म्हणजेच मैत्री.
आपल्यामध्ये काही गुण व दोष असतात. दोष वगळून नेहमी गुणांचा स्वीकार करावा हेच धडे मैत्री शिकवते. मैत्री ही निरंतर वाहणाऱ्या गंगेसारखी निर्मळ व पवित्र असते.
मैत्री ही काही एक दिवस साजरा करण्याची बाब नाही. जीवनातील प्रत्येक क्षणी मैत्रीचा सोहळा साजरा करायला हवा.
कधीकधी असे वाटते की मैत्रीचा हा अर्थ, जीवनशैलीत हरवल्यासारखा झाला आहे. म्हणूनच हा दिवस साजरा करण्याची गरज भासायला लागली आहे.
जागतिकीकरणाच्या युगात आणि मुक्त विचारधारेत मैत्रीची व्याख्या बदलली आहे. २०-२५ वर्षांपूर्वी आई-वडील व वयात आलेल्या मुलांमध्ये एक दुरावा होता. मुले, आई-वडिलांसामोर स्वत:चे विचार मुक्तपणे मांडायला घाबरत, पण आज त्यांच्यामध्ये मैत्रीच्या नात्याची जोड झालेली दिसते. एका दृष्टीने पाहता
हा बदल चांगला आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते
मैत्रीची साथ, मैत्रीचाच हात
मैत्रीच्या मंदिरात मैत्रीचीच वात
मैत्रीच्या घरात मैत्रीचीच बात आणि मैत्रीची जात मैत्रीच्याच आत
हे युगांतराचे नाते एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता असीम-अमर्यादित ठेवून तिच्यात ओतप्रोत प्रेमभावना सतत जागृत ठेवली पाहिजे.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या मैत्रीचा बगीचा वेगळ्याच दुनियादारीने फुलत असतो. त्यामध्ये शाळेतील मैत्री, कॉलेज जीवनातील मैत्री अन् संकटसमयी धावून येणारी मैत्री, आयुष्यामध्ये कोणतीही संकटे आली तरी आपण मैत्रीच्या आधाराने त्या संकटांवर मात करत असतो.
परमेश्वर व भक्त यांच्यातील अतूट मैत्री ही महाभारतातील श्रीकृष्ण व सुदाम यांच्या रूपाने दाखवली आहे.
मैत्रीला वय, वेळ, स्थळ यांच्या मर्यादा येत नाहीत.

उजालों मे मिल ही जाएगा कोई ना कोई
तलाश उसकी रखों, जो अंधेरो में भी साथ दे..!

- स्वप्नील नंदकुमार गोंजारी
सहाय्यक शिक्षक
म.ए. सो. चे की. ग. भी. देशपांडे
माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय बारामती