नमस्कार बालमित्रांनो! आपण एक नवीन सदर सुरू करत आहोत. ज्याचं नाव आहे निसर्ग आपला गुरू. या संकल्पनेची माहिती घेण्यासाठी प्रथम आपण गुरू म्हणजे काय? ते बघू या. आपण लहानाचे मोठे होत असताना आपल्याला सभोवतालची मंडळी अनेक प्रकारची माहिती आणि ज्ञान देतात. काही माहिती कायिक म्हणजे आपल्या शरीराबाबत असते. उदाहरणार्थ - तोंड कसे धुवावे? दात कसे घासावे? वगैरे. काही माहिती वाचिक असते म्हणजे स्पष्ट आणि शुद्ध कसे बोलावे? लहानांशी कसे बोलावे? मोठ्यांशी कसे बोलावे? वगैरे. काही माहिती मानसिक असते. म्हणजे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? विचार कसा करावा? पाठांतर कसे करावे? वगैरे. या तिन्ही बाबतीत आपली आई आपली पहिली गुरू असते, जी आपल्याला या सर्व गोष्टींची सुरुवात करून देते. नंतर वडील आपले गुरू होतात. तेही आपल्याला बरीच माहिती देतात. त्यानंतर आपल्या घरातली मोठी भावंडे अथवा नातेवाईक असतात, तेही आपल्या ज्ञानात भर घालतात. पुढे आपण जेव्हा शाळेत जातो त्या वेळी, शिक्षक आपले गुरू असतात जे आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान देतात. असे शेकडो गुरू आपल्याला आयुष्यातल्या वाटचालीमध्ये भेटतात.
परंतु हे सर्व होत असताना आपलं, आपल्या एका मोठ्या गुरूकडे दुर्लक्ष होतं, तो म्हणजे निसर्ग. निसर्गात पशु, पक्षी, वनस्पती, इत्यादी अनेक गोष्टी येतात. यातील प्राणीवर्गाचा विचार केला, तर अगदी किड्या-मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि वनस्पतींचा विचार केला, तर हरळीपासून महाकाय वटवृक्षापर्यंत सर्वच आपले गुरू असतात. हे आपापल्यापरीने माणसाला अनेक प्रकारचे ज्ञान देत असतात. त्यामुळे निसर्ग आपला सगळ्यात मोठा गुरू कसा आणि तो आपल्याला काय ज्ञान देतो, हे आपण या सदरातून बघणार आहोत.
तुमच्या मनात आता ‘किडा-मुंगी हे केवढे छोटे प्राणी आहेत. मग ते आमचे गुरू कसे होऊ शकतील? मुंगी चावली तर आम्ही तिला चिरडून पण टाकतो. मग मुंगी माणसाचा गुरू कसा होऊ शकेल?'' असे अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. म्हणून आपण मुंगीपासून सुरुवात करू या.
यासाठी प्रथम आपण आपल्या शाळेतल्या शारीरिक शिक्षण अथवा खेळाच्या तासाकडे जाऊ या. या तासाची घंटा होते त्या वेळी आपले शिक्षक आपल्याला सांगतात “मुलांनो, आता खेळाचा तास आहे. उठून उभे राहा. दोघा-दोघांच्या जोड्या करा. वर्गातून शिस्तीत बाहेर पडा. ग्राउंडवर जा. तिथे फक्कीने रेषा आखलेल्या आहेत. त्या रेषेवर एक हाताचे अंतर सोडून उभे राहा.” हो की नाही? मग तुम्ही काय करता? दोघा-दोघांच्या जोड्या करता, वर्गातून बाहेर पडू लागता; पण जोपर्यंत तुम्ही शिक्षकांच्या नजरेच्या टप्प्यात आहात, तोपर्यंत शिस्तीत चालता. एकदा का त्यांच्या नजरेच्या टप्प्याबाहेर गेलात की मुक्तपणे उधळत सुटता!! हो की नाही? मग याला आपण शिस्तपालन म्हणायचं का?
आता आपण मुंग्यांकडे वळू या. मुंग्यांना कळतं कुठेतरी साखर पडली आहे. पण हे कळल्याबरोबर त्या साखरेकडे असं धुम्म पळत सुटतात का? कधीच नाही. त्या वारूळातून शांतपणे बाहेर पडतात. त्यांच्यासाठी कोणी रेषा आखलेली नसते. तरीही त्या एका सरळ रेषेत पुढे जातात. चालताना दोन मुंग्यांमध्ये अंतर सारखंच असतं. त्यांच्यापैकी कोणीही रांग सोडून जात नाही. चालत चालत साखरेकडे जातात. प्रत्येक मुंगी एकच दाणा घेते. तो घेताना त्यांच्यामध्ये ढकलाढकली - चेंगराचेंगरी होत नाही. जशा आल्या तशा एक रांगेत परत जातात. याला म्हणतात शिस्तपालन! याचा अर्थ शिस्तपालन कसे करावे हे आपल्याला मुंगी शिकवते. पटलं ना आता?
आता मुंगीचे आणखी एक वैशिष्ट्य सांगतो. तुम्ही खूप खेळलात किंवा अभ्यास केला, तर थोड्यावेळाने दमल्यामुळे आराम करता किंवा झोपता पण दिवसभरात मुंगी फक्त आठ मिनिटे विश्रांती घेते. ती सोडली तर मुंगी जन्मापासून मरेपर्यंत कधीही झोपत नाही. होय, अजिबात झोपत नाही. मुंग्या सतत काहीना काही काम करत असतात. याचा अर्थ, आपले ध्येय साध्य करण्यासाठी न थांबता, न कंटाळता, अथक परिश्रम कसे करावे? हे मुंग्याकडून शिकावे. बरोबर आहे ना? म्हणजे शिस्तपालन आणि सततची कार्यमग्नता, या दोन्ही गोष्टी मुंगी आपल्याला शिकवते. म्हणून मुंगीही माणसाचा गुरू होऊ शकते. पटलं ना आता?
तर मुंगीला समजून घेतल्यानंतर आपण किडा पण माणसाचा गुरू कसा होऊ शकतो ते पुढच्या भागात बघू या.

- अविनाश हळबे