धैर्यशील सावरकर

दिंनाक: 28 May 2020 13:36:28


 

आपल्या भारतातील एक महान व्यक्तिमत्व ‘श्री. विनायक दामोदर सावरकर’ यांच्या धैर्यशील स्वभावाची आपल्या सर्वांना कल्पना आहेच. त्यांच्या मार्सेलिस बंदरावरून सुटकेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. 

        दिनांक २८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये एक छोटेसे गाव ‘भगूर’ येथे विनायकरावांचा जन्म झाला. घरात आणि मित्रमंडळी त्यांना ‘तात्या’ ह्या नावाने संबोधित असत.
१८९७ सालची गोष्ट. भारतात ब्रिटिशांचे राज्य होते. महाराष्ट्रात त्या वेळी सर्वत्र प्लेगची साथ पसरली होती. सर्वत्र मृत्यूचे तांडव सुरू होते, इंग्लंडमध्ये महाराणी व्हिक्टोरिया साम्राज्यपदी होती. अशा परिस्थितीत तिच्या राज्यरोहणाचा समारंभ भारतातही मोठ्या थाटामाटाने साजरा करण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतलेला होता. राज्यरोहणाचे आयोजन करणे म्हणजे प्लेगने पिडलेल्या लोकांच्या जखमांवर डागण्या देण्यासारखेच होते. सत्ताधारी परकीय इंग्रजांच्या शासनाला धडा शिकवण्याकरिता पुण्याच्या चाफेकर बंधूंनी दोघा इंग्रज अधिकाऱ्यांना गोळ्या घातल्या. या सगळ्या स्थितीचा लहानग्या विनायकावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावण्याची प्रतिज्ञा केली.

माध्यमिक शिक्षण पूर्ण करून विनायकरावांनी उच्च शिक्षणासाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला. ‘अभिनव भारत’ ही संघटना स्थापन करून त्यांनी ‘विदेशी वस्त्रांची होळी’ हा उपक्रम जोरदारपणे राबविला. त्यामुळे कॉलेजच्या वसतिगृहातून त्यांना काढून टाकण्यात आले. विनायकराव पुढील शिक्षणा साठी जुलै १९०६ मध्ये इंग्लंडला पोहोचले. तेथे ते बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले.
ते भारतात येण्याच्या तयारीत असतानाच लंडनच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली आणि मोरया नामक जहाजातून सावरकरांची भारताकडे रवानगी करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. आता ते इंग्रजांचे कैदी होते. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी दोघा पहारेकर्‍यांची नेमणूक झालेली होती. 
१० जुलै १९१० रोजी फ्रान्समधील मार्सेलिस बंदरात ‘मोरीया’ हे जहाज नांगरून उभे राहिले होते. जहाजात काहीतरी यांत्रिकी बिघाड झालेला होता. तो दूर करण्यात कारागीर मग्न होते. जहाजातून प्रवास करणारे प्रवासी जहाज दुरुस्त होण्याच्या प्रतीक्षेत होते. सावरकरांवर दिवस-रात्र दोघा पहारेकऱ्यांचा सक्त पहारा होता.
एकदा त्यांच्या विनंतीवरून पहारेकरी त्यांना जहाजावरील संडासाकडे घेऊन गेले. सावरकरांनी संडासाच्या दाराला आतून घट्ट कडी लावली. नियमानुसार दाराबाहेर दोघा पहारेकर्‍यांच्या पहारा सुरू झाला. संडासाच्या दाराला वरच्या बाजूने काच बसवलेली लहानशी खिडकी होती. सावरकरांनी आत शिरताच आपल्या ओव्हरकोटाने ती झाकून टाकली. पुढच्याच क्षणाला त्यांनी संडासाच्या पोर्टहोलमधून समुद्रात उडी मारली. मार्सेलिसचा किनारा गाठायचा अन बंदराला असलेली भिंत ओलांडून फ्रान्सच्या हद्दीत प्रवेश करायचा आणि ब्रिटिशांच्या बंदिवासातून मुक्त व्हायचे, अशी अतिशय धाडसी योजना त्यांनी आखली होती.
 अरुंद पाईपातून बाहेर पडावे लागल्याने ठिकठिकाणी त्यांचे शरीर खरचटुन निघाले होते. रक्त वाहणाऱ्या जखमांची समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे आग होत होती. तरीही समुद्र पोहून जाऊन ते फ्रान्सच्या भूमीवर पोहोचले. ते शहरात प्रवेश करणारच होते, की दुसऱ्या बाजूने आलेल्या पहारेकर्‍यांनी त्यांना अटक केली.
‘फ्रान्सच्या भूमीवर मला पकडण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही’ असे सावरकर ओरडून सांगत होते तरी त्यांना अटक करण्यात आली.
इंग्रज पहारेकर्‍यांनी जहाजावरून सावरकरांनी निसटलेल्या पुन्हा ताब्यात घेतले असले तरी सावरकरांचे हे अद्भुत साहत साहस जगाच्या इतिहासातील एक रोमांचकारी कृत्य नोंदले गेले.
अशा या धैर्यशील सावरकरांना माझा शतश: प्रणाम.
॥ जय हिंद जय भारत ॥

- अमेय प्रमोद परदेशी, १० वी, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे.