बंदिस्त काळ सुटीचा

दिंनाक: 18 May 2020 16:24:31


सुटी लागली की मुलांच्या आनंदाला उधाण येते. शेवटचा पेपर संपला रे संपला की मुलं सुटीत काय करणार हे ठरवायला मोकळी! कुणी मामाच्या गावाला जातात, कुणी थंड हवेच्या ठिकाणी सफर करतात तर कुणी नातेवाईक, मित्र मैत्रिणी यांच्याकडे जातात.
पण मुलांनो, यावर्षी हा आनंद गमावला. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ‘कोरोंना’ नावाच्या राक्षसाने हळूहळू आपले हातपाय पसरायला सुरुवात केली.
चीन, जपान, इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका अशा महाबलाढ्य देशातही तो घट्ट हातपाय रोवून बसला. पाहता पाहता हा राक्षस आपल्या देशातही डोकावू लागला व काही काळातच त्याने भारतालाही
विळख्यात घेतले. काळाची, धोक्याची पावले आपल्या भारत सरकारने ओळखली व त्याचा शिरकाव होताच संपूर्ण देश सीलबंद केला. फेब्रुवारी-मार्च या महिन्यात मुलांच्या परीक्षा असतात. त्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला. शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणे, व्यायामशाळा, उद्याने, पोहण्याचे तलाव येथे जाण्यास बंदी करण्यात आली. वर्षभर मुले शाळा, क्लास, होमवर्क याच चक्रात अडकलेली असतात. त्यामुळे सुटीत मुलांना पाठीमागे काहीही पाश नको असतात. सुटी मस्त मनाप्रमाणे आनंद लुटून मौजमजा करून घालवायची असते, पण या कोरोनाच्या भीतीने आमच्या मुलांच्या आनंदावर विरजण पडले. स्वच्छंदपणे बागडणारी; दंगामस्ती करणारी; मनसोक्त खेळणारी मुले आज घरात बंदिस्त आहेत.
मुलांनो, हा काळसुद्धा आपण सार्थकी लावू या. कोरोना या राक्षसाशी लढा द्यायचा असेल तर प्रथम “मीच माझा रक्षक” हा विचार आत्मसात करू या. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन तंतोतंत करायला हवे. पुढील आयुष्याचा आनंदमळा फुलवण्यासाठी मिळणारी सक्तीची सुटी ही पेरणीपर्व समजावे. नीरक्षीर विवेक वृत्तीने आपल्यातील कलेचा गुणांचा विचार करून, कलेला छंद बनवत त्या छंदाला अनुसरून कृती करायला हवी. शालेय पुस्तकांबरोबरच अवांतर वाचन करायला हवे. त्यातील महत्त्वाचे विचार, काव्यपंक्ती यांची नोंद करून ठेवावी. गणिताच्या नवीन पद्धती समजावून घ्याव्यात. हस्ताक्षर सुधारण्यासाठी रोज हिन्दी, मराठी, इंग्रजी क्रमिक पुस्तकातील परिच्छेद लिहावा. पत्र-लेखन करावे. बुद्धिवर्धक खेळ खेळावेत. आपल्या घरात कामाला येणारे मदतनीस बंद झाले आहेत, त्यामुळे आईला घरकामात मदत करा. स्वत:चे कपडे व्यवस्थित घड्या घालून ठेवा. घरातील छोटी छोटी कामे करा. यातूनच स्वावलंबन व स्वयंशिस्त लागेल. आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

मुलांनो २१व्या शतकाच्या उंबरठ्यापर्यंत संत-महन्त, साधू, ऋषी-मुनी महापुरुषांची एक दिव्योज्वल अशी अखंड मालिका आपल्या देशात निर्माण होत आली आहे. इतिहासाचे असे एकही शतक सापडणार नाही की ज्यात भरतभूमीत संत महात्मे निर्माण झाले नाहीत. सर्व काळात सर्व प्रदेशात निर्माण झालेल्या संतांनी भारतीय प्रादेशिक भाषात उत्तमप्रकारे साहित्य निर्माण करून ठेवले आहे. असे साहित्य या काळात घरात बसून समजावून घ्या.
आज जात-पात, धर्म, गरीब - श्रीमंत हा भेद बाजूला ठेवून एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. समाजातील दीनदु:खी जनतेला आलेल्या संकटातून दिलासा देणे सहानुभूती देणे व सांत्वन करणे गरजेचे आहे. म्हणूनच अध्यात्मिक नैतिक मूल्यांची जोपासना संवर्धन करणारी समाजरचना करायला हवी. आपल्याला जीवनाची बिकट वाटचाल करावी लागणार आहे.
शेवटी एकच सांगेन आजच्या परिस्थितीशी लढा देण्यास धैर्य संयम व दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर मनुष्य सर्व अडथळे पार करू शकतो.
मुलांनो, ‘बंदिस्त काळ सुटीचा' कसा घालवायचा हे आपल्याच हातात आहे.


- सुजाता भागवत