मराठी भाषेचा उपासक आज आपल्यातून निघून गेला. मराठी व्याकरण आणि शुद्धलेखनाचा दांडगा व्यासंग असणारे अरुण फडके सर यांचे आज निधन झाले. सरांचा मराठी भाषा, शुद्धलेखन आणि व्याकरण यांचा व्यासंग दांडगा होता. ते अक्षरश: चोवीस तास त्यातच असायचे किंवा तो त्यांचा श्वास होता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शुद्धलेखनातल्या प्रत्येक गोष्टीची सखोल मीमांसा, सकारण स्पष्टीकरण आणि ते समजावून सांगण्याची हातोटी यांमुळे ते मराठी लेखन-कोशाचे कोशकार किंवा मुद्रितशोधनातले अधिकारी व्यक्ती तर होतेच, पण त्याचबरोबर हाडाचे शिक्षकदेखील होते. सोप्या सोप्या उदारहरणांमधून, प्रश्न विचारत विद्यार्थ्यांना उत्तराकडे न्यायची त्यांची शैली जुन्या काळच्या तळमळीने आणि पोटतिडकीने शिकवणाऱ्या शिक्षकांची आठवण करून देणारी होती. अधिकारी आहे म्हणून मीच बरोबर हा दंभ त्यांच्यात नव्हता. आम्ही विद्यार्थ्यांनी काही सुचवलं, त्याला योग्य आधार असेल, कारण असेल तर तेही तितक्याच मोकळेपणाने स्वीकारायची त्यांची पद्धत होती. त्यांच्याशी बोलताना शंका समाधान तर व्हायचंच पण आणखी चार नवीन गोष्टी कळायच्या.

सर, शुद्धलेखन आणि मुद्रितशोधनाच्या कार्यशाळा घेत असत आणि त्यात भल्याभल्यांचे मराठी शब्दांविषयीचे, व्याकरणाच्या नियमांबद्दलचे गैरसमज तर दूर होतच असतच, पण लेखनाकडे आणि एकूणच मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलत असे, हे मी खूप जणांकडून ऐकले आहे. मी या कार्यशाळेत सहभागी व्हावं ही सरांची आणि माझीही इच्छा सरांच्या जाण्यामुळे अपूर्ण राहणार आहे. परंतु, माझी मैत्रीण आणि सरांची शिष्या उल्का पासलकर हे काम पुढे नेते आहे हे सरांना समाधान देणारे आहे आणि व्यक्तिशः माझ्यासाठी सरांचा आशीर्वाद मिळाल्यासारखेच आहे.
कै. अरुण फडके सरांचा आणि माझा संपर्क माझ्या मराठीभाषा या फेसबुकवरील उपक्रमामुळे आला. त्यांनी स्वतःहून संपर्क साधून या उपक्रमाविषयी जाणून घेतलं आणि मला वेळोवेळी प्रोत्साहन तर दिलंच, पण कान पकडून चुका दाखवून, त्या दुरुस्त करून घेऊन मार्गदर्शनही केलं. त्या वेळी बोलताना त्यांनी 'मराठी लेखन कोशा'चा आणि 'शुद्धलेखन ठेवा खिशात' या मोबाईल ऍपचा संदर्भ दिला. या कोशाची आणि ऍपची संकल्पना, रचना आणि त्याचे संपादनही सरांनीच केले आहे, हे विशेष. मराठीतल्या अनेक शब्दांचे अचूक लेखन कसे करावे आणि ते तसेच का करावे, यासाठी हा कोश माझ्याप्रमाणेच अनेकांना मार्गदर्शक ठरला आहे.

कॅन्सरशी इतकी वर्षे झुंज देत असतानासुद्धा सरांना कधीही हताश होताना, निराशावादी सूर लावताना आम्ही कुणीच पाहिलं नाही. 'काम आधी, बाकी सगळं नंतर' हाच त्यांचा ध्यास होता. त्यामुळे सगळी पथ्यं सांभाळून, इतर अडचणींवर मात करत कामे करत राहणे, आम्हांला मार्गदर्शन करणे हे सुरू होतेच. अगदी आत्ता-आत्तापर्यंत व्हाट्सएप समूहावरच्या शंकांना ते सविस्तर उत्तरे देत होते आणि आज अचानक ते गेल्याची बातमी आली, तेव्हा सुन्न व्हायला झालं.

पण माझ्यासाठी ते त्यांच्या कोश-वाङ्मयाने भरलेल्या बुकशेल्फमध्ये अजूनही आहेत, राहतील. त्यांच्या खास पद्धतीत टिपणे काढून ठेवलेल्या कागदांमधून, त्यांच्या आवडत्या युनिकोड आणि श्रीलिपीमधून आणि मराठी लेखन-कोशातूनही ते मला भेटत राहतील, कारण शुद्धलेखनाची सवय हा माझाही आग्रह असतो हे त्यांना माहिती आहे. हो ना सर?

सर, तुम्हाला मागे वचन दिल्यानुसार माझा मराठीभाषा उपक्रम मी अखंड सुरू ठेवेन, हे नक्की. आज हा उपक्रम मी पूर्णपणे तुम्हाला समर्पित करते आणि थांबते. माझ्याकडून हीच विनम्र आदरांजली.

- नेहा लिमये