स्वागत आहे

दिंनाक: 12 May 2020 23:12:37काय रे मुलांनो, ओळखले का मला? तुम्ही तर माझे प्रियजन. तुमच्याबरोबर खळखळून हसणारी मी. तुम्हाला ठेच लागली की कळवळणारी मीच. तुमच्या लुटूपुटूच्या लढाया संपविणारीही मीच. तुमच्याबरोबर नवनवीन जग पाहणारीही मीच. माझी ही नवलाई कुठे हरवली बरे? माझी ती सळसळती ऊर्जा कुठे गायब झाली?
काय म्हणताय! कोण बोलतंय? अरे माझ्या पायऱ्यांवर धाप लागेपर्यंत धावणारे तुम्ही! माझ्या भिंतींचे रंगबेरंगी फळे बनवणारे तुम्ही. माझ्या भोवताली किलबिलाट करणारे तुम्ही! असं सगळं सगळं मला आठवतंय, आणि तुम्ही म्हणतात मी कोण? आता सांगूनच टाकते, मी तुमची शाळा!
तुम्ही शिकलेल्या कविता आता मला ऐकू येऊ लागल्या आहेत.
"प्रेमळ तुमच्या करस्पर्शाने लागे जीव हसाया, नयनापुढती क्षणी उमलते नवरंगांची दुनिया।। तुमच्यावाचून जीवन माझे वाटे कारागार, मुलांनो तुमचाच मला प्रेमळ आधार।। "
अगदी अशीच अवस्था झाली आहे माझी. पण काय रे, तुम्हाला येते का माझी आठवण? मला तर खूप खूप गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी. सध्या माझ्या भिंती स्वतःच्या मालकीच्या असल्यासारखे वापरतात काही लोक. कोण म्हणून काय विचारता? अरे ती लांबच लांब मुंगीताईची रांग, तो स्पायडरमॅन लटकत असतो इकडे तिकडे, त्या पाल मॅडम आल्या की घाबरून पळतात सगळे. एकदा तर सरडा डोकावून पाहात होता. मैदानावर पक्ष्यांचे थवेच्या थवे उतरतात. तुम्हाला शोधत असतात बहुतेक. तुम्ही दिसत नाही म्हटल्यावर खूप कल्ला करतात आणि निघून जातात. तुमचे ते भू भू भुंकत बसतात दिवसभर. डोकं उठवतात माझं. त्यांची पण काय चूक म्हणा, तुमची आठवण येत असेल त्यांना. त्या चिमण्या आणि ते कावळे अगदी माझ्या नाकावर येऊन बसतात. तुम्ही इथे नाही म्हटल्यावर करावे लागते सहन. ती खारूताई, तिची तर काय हिंमत वाढली आहे, माहितीये? झाडावरच्या शेंगा, बिया आणून ऐटीत, आरामात पायऱ्यांवर बसून खात असते. मी केलेले शुकशुक तिच्यापर्यंत पोहचतच नाही. वारा नुसता सू- सू करत झाडांच्या मधून पळत सुटतो. तुम्ही नाही तर, इथे कोणाला शिस्त राहिली नाही.
मला कित्ती किती वाटतं की, तुम्हाला निरोप पाठवावा, तुम्हाला बोलावून घ्यावं. पण परवा वाॅचमन काकांचे बोलणे ऐकले आणि कळले की तुम्ही ही माझ्यासारखे आपापल्या घरी एक एकटे आहात. ना खेळायला जाता येत, ना मित्रांना बोलवता येत. एकटे राहूनच आपण सुरक्षित राहणार आहोत.
अरे हो, मला आठवले दर वर्षी तुम्ही मनापासून प्रार्थना करता, कधी पावसाला उशीर झाला की, कधी दुष्काळ पडला की, कधी खूप पाऊस पडला की, कधी देशावर संकटं आले की, आपले सैनिक शत्रूच्या हाती सापडले की या सर्वांसाठी तुम्ही केलेली प्रार्थना मी ऐकली आहे आणि तुमची प्रार्थना फळाला आलेली मी पाहिली आहे. तुमच्या प्रार्थनेची ताकद मी अनुभवली आहे. जसे तुम्ही आधी तुमच्या निरागस प्रार्थनेची ताकद सिद्ध केली आहे तशीच या महामारीच्या संकटातून सर्वांची लवकर सुटका कर अशी प्रार्थना करा. तुमचे मागणे निसर्ग लवकर मान्य करणार हे मी खात्रीने सांगते. त्यामुळे माझ्या लाडक्यांनो! नीट राहा, काळजी घ्या आणि लवकर मला भेटायला या! मी तयारच आहे तुमच्या स्वागताला!
कळावे
तुमचीच लाडकी
शाळा

 

 


  • सुनिता पुंडलिक वांजळे, शिक्षिका,
  • शिशुविहार प्राथमिक शाळा, विद्यापीठ शाखा,
  • पुणे, 9689913815