कुटुंब

दिंनाक: 12 May 2020 22:54:07संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेच आहे की ‘विश्वची माझे घर’ म्हणजे विश्वालाच एक कुटुंब मानले. अशा कुटुंबातही प्रत्येक सदस्याची त्याच आपुलकीने तशीच काळजी घेतली जाते.
जन्म, मरण, लग्नसोहळ्याचे प्रसंग एकत्र कुटुंबात समरसून साजरे होतात. एकमेकांना मानसिक आधार मिळतो. माणसाच्या उबेमुळे उदासीनतेवरची खपली नैसर्गिकरीत्या सहजपणे भरून काढता येते. व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षण वर्गाची गरजच भासत नाही. व्यावहारिक जीवनाचे खाचखळगे आपोआप आत्मसात केले जातात.
एकत्र कुटुंब म्हणजे, नैसर्गिक मानसोपचाराचे एक चालतेबोलते समुपदेशन केंद्रच. एकत्र कुटुंबात राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, घराला कधीच कुलूप लावले जात नाही. संशोधनाद्वारे भारतीय लोक सर्वात समाधानी संतुलित आणि बुद्धिमान असल्याचे लक्षात आले. या मागे ‘कुटुंब’ व्यवस्था असल्याचे लक्षात आले. ‘प्रेम, विश्वास आणि सुरक्षितता’ ही महत्त्वाची कौटुंबिक मूल्ये आहेत.
प्रत्येक कुटुंबात नव्या-जुन्या पिढीचे वेगवेगळे आनंदाचे विषय असतात. काही वेळा मनाचा एक कोपरा दुमडून एकमेकांच्या कौतुकात रमणं हेही आवश्यक असतं. आयुष्यातले नवे क्षण, नवे जुनं विसरून शक्य तर क्षमाशील राहूनच जगायचे असतात. स्वभावाच्या अनंत सद्गुण आणि त्रुटींचे संमेलन म्हणजे कुटुंब. कुणीच परिपूर्ण नाही पण एकमेकांची अपूर्णता एकमेकांच्या प्रेमळ सोबतीनेच भरून काढायची असे कुटुंब शिकवते.

१५ मे हा दिवस ‘जागतिक कुटुंब दिवस’ म्हणून साजरा केला जातो. जगात कुटुंबसंस्था ही समाजातील मूल घटकसंस्था मानली जाते. नव्या पिढीला विकासाच्या पैलतिरी नेण्याचे कार्य कुटुंब संस्था करते.
जगण्यातला पूर्ण सच्चेपणा माणसाला अमाप बळ देतो. हा सच्चेपणा कुटुंबाकडून मिळतो.
जागतिकीकरणाच्या ओघात बरेचसे बदल होतील, ते झालेच पाहिजेत पण जुन्याचा सन्मान व नाविन्याची कास धरूनच....


- स्वप्नील नंदकुमार गोंजारी
सहाय्यक शिक्षक
म.ए. सो. चे की. ग. भी. देशपांडे
माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय
बारामती