विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मराठी माध्यम आणि सेमीइंग्रजी माध्यम घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुट्टीचा खूपच छान उपयोग करून घेता येईल आणि तुमचा इंग्रजी विषयसुद्धा पक्का होईल असा छोटासा उपक्रम मी तुम्हाला सांगणार आहे. तो तुम्हाला नक्कीच आवडेल.
आपल्या घरात इंग्रजी गोष्टीचे पुस्तक किंवा इंग्रजी वर्तमानपत्र असेलच. जरी ते नसेल तरी आपले इंग्रजीचे पाठ्यपुस्तक असेलच, तर ते घ्या. रोज त्यातील एक paragrapha म्हणजेच उतारा घ्या आणि वाचायला सुरुवात करा. जे शब्द वाचता येणार नाहीत, समजणार नाहीत ते ओळीने वहीत लिहून ठेवा. त्यानंतर समोर डिक्शनरी घेऊन बसा आणि एक एक शब्दाचा अर्थ शोधा. त्याचा उच्चार आणि अर्थ, वहीत त्या त्या शब्दांसमोर लिहून ठेवा. आता परत तो परिच्छेद वाचा. आता न अडखळता तो तुम्ही वाचू शकाल.
असे रोज केल्याने तुमची इंग्रजी विषयाची लिहायची छान तयारी होईल आणि तो विषय नक्कीच आवडीचा होईल. आता तुम्हाला वाटेल की डिक्शनरीमध्ये शब्द कसा शोधायचा? किती अवघड आहे ते; खूप वेळ लागेल. तर त्यासाठी मी तुम्हाला सोपी आयडिया सांगते.
इंग्रजी वर्णाक्षरे लक्षात घ्या त्या नुसारच म्हणजे A, B, C, D, …….या प्रमाणेच डिक्शनरीमध्ये शब्द असतात. A पासून शब्द सुरू झाला की त्या पुढील शब्दही वर्णाक्षरानुसार असतो. उदा. About, Account असे. त्यामुळे वर्णाक्षरानुसार गेल्यास तुम्हाला शब्द शोधायला सोपे जाईल. मग करायची न सुरुवात आजपासून इंग्रजीशी मैत्री करायला.


- गायत्री जवळगीकर