जागतिक मातृदिन

दिंनाक: 10 May 2020 15:12:10


स्वामी विवेकानंद यांनी म्हटलेले आहेच, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ आणि हे अगदी तंतोतंत खरे आहे. ‘आई’ या शब्दांतच सारे विश्व सामावलेले आहे. ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. थोडक्यात ईश्वराचाही आत्मा असणारी ती ‘आई’. आपल्या जवळ खूप धन आहे पण जर मायाने डोक्यावर हात फिरवणारी ‘आई’ नसेल तर आपले जीवन आपल्याला व्यर्थ वाटेल.
जेव्हा लहान मूल बोलायला लागते. तेव्हा ते पहिले अक्षर उच्चारते आई. एकमेव आईच असते जी, आपण वयाने कितीही मोठे झालो तरी ती आईच असते जी आपली जीवापाड काळजी घेते. आपल्या कल्याणासाठी आई रागावते, पण त्या मागची भावना मात्र आपल्या हिताचीच असते. तिच्या मायेत एवढी ताकद असते कि तिच्या रागापेक्षा आपल्याला तिचे प्रेमच लक्षात राहते. जगातील कोणतीही जखम भरून काढता येईल पण आईच्या विरहाची जखम कधीही भरून निघू शकत नाही.
पण आताच्या आधुनिक जगात आपण इंटरनेट, सोशल मिडिया यांच्या जाळ्यात असे काही गुंतून पडलो आहोत की आपण आईवडिलांच्या प्रेमाकडे दुर्लक्ष करत आहोत. सोशल मिडीयावर happy mothers day म्हणत आईसोबत सेल्फी घेऊन अपलोड करतो पण आईला प्रत्यक्ष कृतीतून शुभेच्छा द्यायचे विसरून जातो.
२१ व्या शतकात स्त्रियाही नोकरी करून घर चालवण्यास हातभार लावत आहेत. बाबांबरोबर आईही नोकरी करते आणि त्याच वेळी घरही सांभाळते. घर, नोकरी, करियर, नाती हे सगळं आई लीलया पेलते. तिच्यात कुठून एव्हढी क्षमता येते याचा विचार केला आहे कधी? या लॉकडाऊनच्या काळात वर्कफ्रॉम होम करणारी आई घरही समर्थपणे सांभाळत आहे आणि म्हणूनच आपण सुखरूप घरात राहू शकतोय. आता आवश्यकता आहे तिलाही समजून घेण्याची तिला घरकामात मदत करण्याची.

आपण आपल्या जन्मदात्या आईप्रमाणेच आणखी एका मातेचे ऋणी आहोत. ती म्हणजे आपली मातृभूमी. एकीने आपल्याला जन्म दिला आणि एकीने आपल्याला अन्न आणि निवारा देऊन वाढवले. त्या आपल्या भारत्मातेचेही सतत स्मरण करून तिलाही वंदन करू या!

 

 

-गायत्री जवळगीकर