आई

दिंनाक: 10 May 2020 14:25:10

 


आज मदर्स डे आहे. म्हणजे परदेशात आज आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.आईला भेटणं,भेटवस्तू आणि फुलं देणं,एकत्र जेवणं असा हा दिवस आईबरोबर साजरा होतो. परदेशात मुलं मोठी झाली की ती स्वतंत्र राहायला लागतात. त्यामुळे मग आईला भेटणंही कमी होतं, कारण आई रोज बरोबर नसते नं! मग आजच्या दिवशी आईला भेटण्याचा विशेष कार्यक्रम केला जातो.
भारतीय जीवनात मात्र सर्वांनी कुटुंब म्हणून एकत्र राहण्याची पद्धती आजही दिसते आणि आईला देवासमान मानलं आहे आपल्या संस्कृतीत!
श्रावण महिन्यात आपण मातृदिन साजरा करतो हे खूप कमी मुलांना माहिती असेल.
गाय आणि तिचं वासरू हे आपल्या भारतीय जीवनात खूप महत्त्वाचं आहे.आपल्या देवघरात गाय वासराची पूजा होते.दिवाळीच्या दिवशी म्हणजे गोवत्स द्वादशीला आपण गाय आणि गोर्‍ह्याची पूजा करतो.
आपली आई जशी आपल्यासाठी महत्त्वाची असते तितकीच ती प्राणी आणि पक्ष्यांसाठीही महत्त्वाची असते.
फक्त प्राणी आणि पक्ष्यांपेक्षा आपलं वेगळेपण हे असतं की आपण आपली नाती कायम लक्षात ठेवतो. आपण आपल्या आई-बाबा, आजी-आजोबा यांच्याबरोबरच राहतो. पण प्राणी आणि पक्ष्यांमध्ये तसं नसतं! त्यामुळे बाळ मोठं होईपर्यंत ते आईला ओळखतं आणि नंतर विसरूनही जातं.
पेंग्विन पक्ष्यामध्ये तर आई अंडी घालून अन्न शोधायला जाते आणि लांबवर पसरलेल्या बर्फाळ प्रदेशात बाबा पेंग्विन अंड्यावर उभा राहतो. अंड्यातून पिलाचा जन्म होईपर्यंत बाबा पेंग्विन अंडे सांभाळतो. दोन महिन्यानंतर आई परत येते, तोवर इकडे बाळ अंड्यातून बाहेर आलेलं असतं.नंतर इतक्या सगळ्या पेंग्विनांच्या गर्दीतून आई आणि बाबा एकमेकांना आवाजावरून ओळखतात! आई येईपर्यंत बाळाच्या वाढीसाठी बाबा त्याला आपल्या शरीरातील द्राव भरवतात. म्हणजे बाळ जन्माला येताना त्याला आईऐवजी बाबाच आधी भेटतात. आहे की नाही गंमत!
पक्ष्यांमध्येही घरट्यात जन्माला आलेल्या पिलाला किडे आणून भरवणं, त्याला सांभाळणं आणि त्याला उडायलाही शिकवणं ही कामं आई करते. पिलू उडायला तयार नसेल तर मादी चक्क त्याला घरट्यातून बाहेर ढकलून देते जेणेकरून पिलाने स्वतः उडण्याचा प्रयत्न करावा.
माकडांच्या टोळीतही माकड आई आपल्या पिलाला पोटाशी धरून पिलू न पडेल अशा पद्धतीने पण बिनधास्तपणे या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहते.
माकडाची गंमत पाहिली तर ती पिलंही तुमच्यासारखीच मस्तीखोर असतात. मग त्यांची समोर बसलेली आई त्यांच्या मस्तीला आवरण्यासाठी पिलाला आपल्याकडे ओढते ही गंमत मी पाहिली आहे.
आपली आई आपली काळजी घेते तशाच सर्व आई घेतात. आमच्याकडे खारूताईचं घरटं आहे. त्यातून एक दिवस पिलू खाली पडलं. हआवाज कुठून येतोय म्हणून पाहिलं तर पिलू पडलेलं. त्याने अजून डोळे पण उघडले नव्हते. उंचावरून इतकं छोटं लेकरू पडलंय म्हटल्यावर त्याला लागलं तर असणारच.. आपण काय करू शकतो त्याला वाचवायला असा विचार करत असतानाच बाहेर झाडावर उनाडणारी त्याची आई चिं चिं करत आली आणि अक्षरशः डोळ्याची पापणी, पण लवण्याच्या आत पिलाला तोंडात धरून जिन्यावरून पसारही झाली! अशी असते आई!
यात अपवादही असतात ! कावळ्याच्या घरट्यात त्याला फसवून आपली अंडी ठेवून स्वतः पळून जाणारी कोकिळाही आपल्याला गोष्टींमध्ये भेटते! आणि तिची अंडी कावळीण उबवते.
हत्तीचं पिलूही आईच्या मागे लुटलुटू आपली छोटी शेपूट हलवत चालत असतं. बरेचदा ते आईच्या चार पायांमध्ये दिसतं कारण सुरक्षितता! हत्ती आईसुद्धा आपला गलेलठ्ठ देह सांभाळत आपल्या पिलाला छान शिकवत असते!
आईच्या पोटातल्या पिशवीत बसून सगळीकडे फिरणारं कांगारूचं पिलूही किती गोड दिसतं!
हे सगळं पाहिलं की मग समजतं की मातृदेवो भव म्हणजे आईला देव माना असं का म्हटलं जातं! आई ही पहिला गुरू असते.
यूट्यूबवर अशी पक्षी आणि प्राणी यांची आई आणि पिलांची गंमत दाखवणारे लघुपट आहेत. सध्या लाॅकडाऊनमुळे आपण सारखेच दूरदर्शन नाहीतर मोबाईल पाहतो आहोत. पण आज असा एखादं पक्षी-प्राणी पिलू आणि आईची गंमत पाहण्याची संधी नक्की घ्या मात्र आईला विचारूनच हं!

 

 

 

-डाॅ. आर्या जोशी