होतं ना असं कधीतरी, की ज्या व्यक्तीला तुम्ही कधी बघितलेलंही नसतं, कधीच बोललेला नसता आणि कदाचित ती व्यक्ती तुम्हाला ओळखतही नसतो तरीही त्या व्यक्तीला झालेला अपघात अथवा त्या व्यक्तीचं जग सोडून जाणं तुम्हाला धक्का देऊन जातं. होतं असं कधी कधी की, कोणतंही वैयक्तिक नातं नसताना वाटतं आपल्याला आपल्यातलाच एक माणूस गेल्यासारखं. वाटतं तो रोज आपल्या आसपास होता, पण होता तेव्हा कधीच जाणवला नव्हता आणि आज जेव्हा जाणवतोय, तेव्हा तो माणूस आपल्यात राहिलाच नाही. एका क्षणात आपल्याला कोणीतरी भेटलंय असं वाटलं आणि क्षणात तो माणूस आता नाहीच याची जाणीव झाली.

इरफान खान

मी वैयक्तिक नाही ओळखत तुम्हाला पण... जेव्हा जेव्हा तुम्हाला पडद्यावर पाहिलं तेव्हा तेव्हा, तुम्ही आमच्यातले वाटलात. कोणी तरी मोठा, लांब राहणारा सूर्य नव्हता, तुम्ही आणि आजही नाहीत. चंद्र आहात तुम्ही. चांदोमामा, जो प्रत्येकाला आपलासा वाटतो. कोणत्याही सिनेमामध्ये तुम्ही कोणतीही भूमिका केली तरी ती लांबची वाटत नाही. भलेही त्याची पार्श्वभूमी काहीही असो. असंख्य expressions देऊन कधीच बोलला नाहीत, तुम्ही की कधी तुमच्या आवाजाची पट्टी जास्त चढली नाही. तुमचा स्वतःचा एक वेगळा बाज होता. आवाज न चढवता, मोठे expressions न देता मनं जिंकलीत तुम्ही आमची कायमच. तुमचे डोळे कायम भिडत राहिले आमच्या मनाला, अगदी आजही जेव्हा ते शांत आणि बंद झाले आहेत कायमचे तेव्हाही.
Life of pi चा आणि आमच्या आयुष्याचा काहीच संबंध नव्हता. घरात किंवा शहरात सुरक्षित असणाऱ्या माणसाला तो pi आपलासा वाटला कारण तुम्ही तो आमच्या काळजापर्यंत नेला. त्यातलं एक वाक्य आज सगळे म्हणत आहेत. “I suppose... In the end the whole of life becomes an act of letting go. But what always hurts the most...Is not taking a moment to say good bye..." आज खरंच जाणवलं, वाटलं एक क्षण जर शेवटचं भेटता आलं असतं? क्षणभर जर शेवटचं. तुम्ही पुन्हा पडद्यावर आला असता; कायमचं जाण्यासाठी...? तर धन्य झाला असता हा पडदा. पण गेलात तुम्ही आमच्या सगळ्यांच्या मनात एक मोठी पोकळी सोडून. या देशाच्या, या जगापेक्षा खूप लांब.. २०१८ ला जेव्हा तुम्हाला कॅन्सर झाला, तेव्हा आम्हाला कुणकुणही नाही लागली. ते माहिती असतं तर कदाचित मनाची तयारी केली असती आम्ही; जशी तुम्ही करून ठेवली होती. तरीही याचा परिणाम तुमच्या सिनेमांवर कधीच नाही झाला. कारवान, हिंदी मिडीयम, ब्लॅकमेल, अंग्रेजी मिडियम यांपैकी कोणत्याच सिनेमात आम्हाला तुम्ही एका मोठ्या आजाराशी झुंजत आहात असं वाटलंच नाही. आज तुमच्या अभिनयामधली सत्यता समोर आल्यासारखं वाटलं.
खरं सांगू? मी तुमचा प्रत्येक सिनेमा पहिला नाहीये, पण बरेच सिनेमे हे मी केवळ तुम्ही आहात म्हणून पाहिले आहेत हे ही तितकंच खरं. पण आज ती पोकळी भरून काढावी वाटत आहे. आता वाटतंय तुमचे सगळे सिनेमे पुन्हा एकदा बघावे केवळ तुम्हाला पुन्हा एकदा बघण्यासाठी. तुमचं अजून एक वाक्य आज खूप वेळा कानांवर आलं. “सिर्फ इन्सान गलत नहीं होता, वक्त भी गलत हो सकता हैं" खरंय तुम्ही कधीच चुकीचे नव्हता, पण काळाने मात्र घाला घातला... तुम्ही ही तेवढ्याच धीराने सामोरे गेला असला काळाला पण या असाध्य रोगाने फक्त तुमचं शरीर तुमच्यापासून हिसकावून घेतलं. तुम्ही, तुमचा आत्मा आज ही इथेच आहे.... तुमच्या अनेक सिनेमांच्या रूपाने.

- गायत्री जोशी