गोट्या

दिंनाक: 09 Apr 2020 22:36:47

 


ओंकार हातपाय धुवून  स्वयंपाकघरात आला, तेव्हा आंबेमोहोर तांदुळाच्या भाताचा सुगंध दरवळत होता. मिरगुंड, काकडीची चटकदार कोशिंबीर, श्रावण घेवड्याची भाजी, केळ्याचं शिकरण, दारातल्या शेवग्याची आमटी. ओंकारला सपाटून भूक लागली होती. आजी पण आग्रहाने वाढत होती. गप्पा मारत मारत जेवणं झाली आणि परत ओंकार झोपाळ्यावर आडवा झाला. छान झोप झाल्यावर आजीने ओंकारला उठवलं. दोघ जणं गावातल्या राधाकृष्णाच्या देवळात जाऊन आले. आमराईत जाऊन आले. ओंकारला मोकळ्या हवेत मनसोक्त हिंडताना, आजीबरोबर गप्पा मारताना खूप छान वाटत होतं. संध्याकाळी सुमती आजीबरोबर तिच्या गोड आवाजातली स्तोत्रं, भजनं आणि आरत्या, गोष्टी ऐकता ऐकता कसा वेळ गेला ते ओंकारला कळलंच नाही.

दुसऱ्या दिवशी पक्षांच्या किलबिलाटाने ओंकारला जाग आली.  

"आजी, किती मस्त वाटतंय गं इथे. पक्षांच्या किलबिलाटाचा केवढा आवाज येतोय. आणि निरनिराळे पक्षी आहेत. भारी वाटतंय एकदम. मुंबईला फक्त शाळेच्या व्हॅनचे हाॅर्न, गाड्यांचे आवाज. बोअर", आळस देत देत ओंकार अंगणातल्या

पायऱ्यांवर बसला.

"मग, गोट्या. गावाचं वैशिष्ट्यच आहे हे. पक्षी, प्राणी सुद्धा इथे मनसोक्त राहतात, बागडतात. गोट्या, चल आता. सकाळी सकाळी आळस देऊ नकोस. तोंड धुवून घे. दूध पी. अंघोळीचं पाणी काढायला सांगते. चल गोट्या उठ", असं बोलत बोलत आजी अंगणातली रांगोळी पूर्ण करून आत गेली. "आजी, काय गं सारखं गोट्या गोट्या. मी काय आता लहान आहे का ?" कपाळावर आठ्या घालत ओंकार आजीच्या पाठोपाठ आत गेला.

"असू दे रे. माझ्यासाठी लहानच आहेस तू. माझ्या तोंडात गोट्याच येतं. असू दे. चल हे घे. दूध पी आणि मागच्या परसात ये अंघोळीला. "आजीने दिलेल्या दुधाला वेगळीच गोडी होती.

ओंकार परसात गेला, तेव्हा आजी बंबातून अंघोळीचं गरमगरम पाणी काढत होती. शेजारीच एक मोठ्ठा चौकोनी दगड होता.

"हममम्, ये इथे दगडावर बस. चांगली चोळूनमोळून अंघोळ घालते तुला."

"इथे? उघड्यावर?" डोळे मोठे करत ओंकार म्हणाला.

"हो मग! अरे बघ किती भारी वाटतं ते. चल काढ टी-शर्ट आणि चड्डी. आतली चड्डी राहू दे वाटलं तर ." बादलीत विसण घालता घालता आजी मिश्किलपणे म्हणाली तसं ओंकार दचकलाच.

"आजी ऽऽ. मी करतो अंघोळ माझी माझी. तू जा आत. मला लाज वाटते."

"गोट्या, लाजायला काय मुलगी आहेस का तू ? काढ पटकन कपडे." आजी आपल्या  दिशेने येताना बघून ओंकार पळणार इतक्यात आजी हसतहसत म्हणाली, "बरं बरं. कर तू"

ओंकारची अंघोळ झाल्यावर आजीने शेजारच्या दामूला ओंकारशी खेळ खेळायला बोलवले.  दोघांची ओळख झाली.  एकाच वयाचे असल्याने दोघंही खेळण्यात रमून गेले.

सकाळ संध्याकाळ आजीच्या हातचा चविष्ट  नाष्टा, सुग्रास जेवण खाऊन ओंकार तृप्त होत होता.  

रात्र झाली तशी आजीवरच्या मजल्यावर तिच्या खोलीत निघाली.

"गोट्या, मी जाते रे. तू ये दामूशी गप्पा मारून झाल्यावर. या जिन्यातून सावकाश ये रे. दिवा नाहिये इथे. फार उशीर करू नको. "थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर दामू त्याच्या घरी गेला आणि ओंकार झोपायला निघाला. आजीची खोली वरच्या मजल्यावर होती. घराच्या उजव्या बाजूला एक चिंचोळा जीना होता. सावकाश ओंकार जिन्यावरून वर चालला. दोन तीन पावलं टाकल्यावर ओंकारच्या लक्षात आलं की आपल्या मागून अजून कोणाच्या तरी पावलांचा आवाज येतो आहे. ओंकार घाबरला . त्याने झटकन मागे वळून पाहिले. पण अंधारात त्याला कुणीच दिसलं नाही. ओंकार भराभर जीना चढू लागला. तसा मागच्या पावलांचा आवाजही वाढत होता. ओंकार कसाबसा खोलीपर्यंत गेला. खोलीचं दार लावून घेतलं आणि डोक्यावर पांघरूण घेऊन झोपून टाकलं. सकाळी प्रसन्न वातावरणात ओंकारला जाग आली. आजी कधीच उठून खाली गेली होती. ओंकार खाली आला. झोपाळ्यावर बसून कालचा अनुभव आजीला सांगावा की नाही या विचारात असतानाच आजीची हाक ऐकू आली.

"गोट्या, उठलास का ? दामू येऊन गेला रे तुझ्याकडे. तो आज तुला जवळच्या टेकडीवर घेऊन जाणार आहे. तुझं आवरून झालं की जा त्याच्याकडे. इथे जवळच राहतो तो. आल्यावर त्यालाही जेवायला इकडेच घेऊन ये ." आजीचं बोलणं ऐकून ओंकार पटकन आवरून तयार झाला आणि दामूकडे गेला. संध्याकाळी झोपाळ्यावर गप्पा मारत ओंकारला वेळ कसा गेला तेच कळलं नाही. आजी कधीच झोपायला वर गेली होती.  ओंकार घाबरत घाबरत जिन्याने वर जाऊ लागला. पावलांचा आवाज आणि छातीतली धडधड वाढत होती. ओंकार भराभर जीना चढू लागला. तो निम्मा जिना चढला आणि अचानक त्याच्या लक्षात आलं त्याचा टी-शर्ट मागून कुणीतरी ओढतंय. ओंकारला घामच फुटला. आजीला हाक मारावी तर तोंडातून आवाज येईना. तो परत वर जायचा प्रयत्न करू लागला. पण त्याला हलताच येईना. शेवटी घाईघाईने ओंकारने अंगातला  टी-शर्ट काढला आणि तो पळत पळत खोलीत आला. खोलीचं दार घट्ट लावून घेतलं. अंगातला  बनियन घामाने चिंब भिजला होता. ओंकार अंथरुणावर पडला. डोक्यावरून पांघरुण घेतलं आणि तो झोपायचा प्रयत्न करू लागला. आजीला झोप लागली होती. कधीतरी मध्यरात्री ओंकारला झोप लागली. सकाळी उन्हं वर आली तरी ओंकार उठला नव्हता. तशी आजी त्याला उठवायला वर गेली .

"गोट्या, ए गोट्या आज काय आळस आलाय की काय. उठायचं नाही का?", आजीने ओंकारच्या अंगाला हात लावला तर ओंकार तापाने फणफणला होता.

"अगं बाई, काय झालं रे बाळा.  सोसलं नाही काय तुला टेकडीवरचं वारं? ए गोट्या.  ₹उठ जरा. बघू किती ताप आहे.  कुसुममावशी तो थर्मामीटर द्या माझ्या कपाटातला. किती गरम लागतंय रे अंग! अगं बाई , ताप पण खूप आहे. तुम्ही त्या जोशी डाॅक्टरला घेऊन या. पण थांबा आधी मला मीठपाण्याच्या पट्ट्या आणून द्या. माठातलं घ्या पाणी."

आजी ओंकारच्या डोक्यावर पट्ट्या ठेवत होती तेवढ्यात डाॅक्टर आले. "काय रे मित्रा, काय झालं? आजी , सर्दी खोकला काहीच नाहीये. तसं ताप येण्याचं काही कारण नाही."

"गोट्या, काय होतंय रे?" आजीने काळजीने विचारलं. ओंकारने जिन्याकडे बोट दाखवलं आणि तो रडायलाच लागला. आजीचा हात त्याने घट्ट धरून ठेवला होता.

"आजी, मला वाटतं तो कशामुळे तरी घाबरलाय. मी ताप उतरण्याची औषधं देतो."

"गोट्या, काय झालं रे ? तू कशाला घाबरला आहेस का ? मावशी, दामूला बोलवा जरा आणि भाताची पेज करून आणा येताना."

आजीने दामूकडे चौकशी केली.पण शाळेतल्याच गमतीजमती आम्ही बोलत होतो, बाकी काही नाही असं दामूनं सांगितल्यावर आजीचा जीव भांड्यात पडला.  

भाताची पेज खाऊन झाल्यावर ओंकार उठून बसला. आजीने डाॅक्टरांनी दिलेली औषधं ओंकारला दिली.

"काय रे बाळा, बरं वाटतंय नं तुला. टेकडीवर जाण्याचा ताण पडला की काय तुला?", आजीने काळजीने विचारलं.

"आजी, मी मुंबईला जातो. मला खूप भीती वाटतेय."

"अरे कशाची भीती? काय झालं तरी काय असं? कालपर्यंत तर खुशीत होतास!" ओंकारला आजीच्या बोलण्याने रडायलाच यायला लागलं. आजीने त्याला जवळ घेतलं.

"आजी , काल मी वर खोलीत येत होतो नं तेव्हा जिन्यात कुणीतरी मला पकडलं. माझा टी-शर्ट इतका घट्ट धरला होता की मला पुढे जाताच येईना. तुला हाक मारायला गेलो तर तोंडातून आवाजच फुटेना. आजी , आईबाबांना बोलवं ना. मी जातो मुंबईला परत. प्लीज."

"काय? अरे जिन्यात कोण पकडणारे तुला? जिना तीनही बाजूनी बंद आहे गोट्या."

"अगं परवा पण मी जीना चढायला लागलो,तर मागून कुणाच्या तरी पावलांचा आवाज यायला लागला. मी मागे वळून पाहिलं तर कुणी दिसलंच नाही ." ओंकारच्या बोलण्यात चांगलीच भीती जाणवत होती." अरे वेडा की काय तू ? हा खोलीत येणारा जीना तीनही बाजूंनी बंदिस्त आहे नं त्यामुळे आपण जीना चढायला लागलो की आपल्याच पावलांचा आवाज येतो आपल्याला. प्रतिध्वनी नाही का येत तसं ."

"आणि काल माझा टी-शर्ट धरला तो? "

"अहो ओंकारदादा. हा बघा तुमचा टी-शर्ट. जिन्यातल्या खुंटीला अडकला होता." कुसुममावशी तोंडावर पदर घेऊन हसू लागल्या.  

 

- स्वाती देवळे