सुट्टी चा आनंद

दिंनाक: 07 Apr 2020 12:20:19


 

शाळा नाही, परीक्षा नाही. पहिले एकदोन दिवस फार भारी वाटलंही असेल, पण आता मात्र अगदी कंटाळा आला असेल ना छोट्या दोस्तांनो? दर वर्षीच्या उन्हाळी सुट्टी किंवा दिवाळी सुट्टीपेक्षा जास्त वेगळी मिळालेली ही अवकाळी सुट्टी तुम्हाला फारशी आवडत नसणार, कारण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण सर्वांनी घरातच राहणे बंधनकारक आहे नि योग्य ही. चला तर मग आपल्या व आपल्या घराच्या दृष्टीने काहीतरी छान नवे प्रयोग करून स्वतःला गुंतवून ठेवू या व आनंद ही लुटू या. अगदी लहानथोर सगळे मिळून काय काय करू शकतील याचा विचार करून अगदी साध्या सोप्या गोष्टी करून बघू या. छोट्या दोस्तांनो एरवी तुमची कामातली लुडबुड आईला काही फारशी आवडत नसेलही पण आता तुम्ही घरातच राहणार तर जीवनव्यवहाराचे हे शिक्षण सुरू करा आई बाबांच्या मदतीने. काही सोपे प्रयोग करा ज्याने आईला मदतही होईल नि तुम्हाला शिकणे व नवनिर्मितीचा आनंदही मिळेल. जसे की -
दुधाला विरजण लावणे : मस्त कोमट दूध एका छान भांड्यात घेऊन चमचाभर दही त्यात घाला,तुमच्या आवडीचे गाणे गुणगुणत तो चमचा १५ ते २० वेळा त्या दुधातून फिरवा, नंतर कट्ट्यावर ठेवून झाकण घालून सहा-सात तास भांडे न हलवता तसेच राहू दे. (फ्रीजमध्ये टाकायचे पण त्या सहा-सात तासांनंतर दही सेट झाल्यावर)आता सात तासांनी तुम्ही ते झाकण काढून पाहिले तर मस्त वडीदार दही तयार झाले असेल. मग काय पुढचा प्रयोग रवीने दही घुसळून ताक बनवा, त्यात मीठ, जिरेपूड, हिंग घालून मसाला ताक बनवून द्या सर्वांना किंवा तुम्हाला आवडत असेल तर दहीसाखर पण खा .
असाच आणखी सोपा प्रयोग म्हणजे घरात उपलब्ध असलेले मूग, मटकी, हरभरा असे कोणतेही कडधान्य घ्या एक वाटीभर, कुकरच्या डब्यापेक्षा मोठ्या आकाराच्या पातेल्यात त्यात पाचपट पाणी घालून धुवून घ्या व परत तेवढेच पाणी घालून झाकून ठेवा, सहा-सात तासांनी ते पाणी कुंडीतील झाडांना घाला व कडधान्य स्टीलच्या चाळणीत काढून घ्या, आता त्यावर एक स्वच्छ फडके टाका व ताटली किंवा फडक्याने ते झाकून टाका ,सकाळी उठून पाहाल तर रात्री झाकून ठेवलेल्या कडधान्याला मस्त मोड आले असतील त्याला आलेले मूळ पाहणे त्यांचे निरीक्षण करणे हा एक मजेशीर प्रयोगच आहे ना मग काय आईला सांगून मस्त त्याची उसळ खा,भेळ बनवा किंवा छान चाट कोशिंबीर! काहीही केले तरी तुम्हाला ते छानच लागणार कारण तुम्ही कडधान्याला मोड आणलेत ना.घरातील मोठ्या माणसांच्या मदतीने अजून ही काही गोष्टी शिकू शकाल. घरातील बाल्कनीत किंवा टेरेसवरच्या कुंड्यात दोन मुठी धने पेरा रोज आठवणीने त्यावर पाणी शिंपडा खूप चिखल नको व्हायला. दहा-बारा दिवसात घरची कोथिंबीर तयार होईल कुंडीत.
शिवाय तुम्हाला रोज निरीक्षण करून बघता येईल कोथिंबीर कशी वाढते ते. एकदा का हे जमलं की मग मेथीचे दाणे ही पेरून बघा. या शिवाय उकडलेले बटाटे सोलणे, भाजी निवडणे,केळ्याचे शिकरण बनवणे, लिंबाचे सरबत बनवणे, एखादी कोशिंबीर बनवणे, भेळ तयार करणे या गोष्टी तुम्ही अगदी सहज करू शकता, यातील कितीतरी गोष्टी तुमच्या अभ्यासाच्या पुस्तकात ही आहेत उपक्रम म्हणून.
हे आईलाही नक्की सांगा. मुख्य म्हणजे या गोष्टी करताना पसारा,कचरा झाला तरी तो सुद्धा तुम्हीच आवरा. हो आणि खाऊ तयार करण्यासारखी अजून काही छोटी छोटी कामे तुम्ही नक्कीच करू शकता जसे की केर काढणे,छोट्या कपड्यांच्या घड्या करणे,आपली पुस्तके घरातील वर्तमानपत्रे नीट लावणे, कप बशा विसळणे, जेवणाच्या वेळी ताट, वाट्या पाणी टाकून स्वच्छ नॅपकिनने पुसून देणे, देवासमोर किंवा घरातील उपलब्ध जागेत छोटी रांगोळी काढणे सध्या एवढं करायला लागू या. मग पुढे आणखी काही छान छान गोष्टी पण करायला शिकू या, ज्यातून तुमच्या एनर्जीला योग्य वाव मिळेल. बघा छोट्या दोस्तांनो तुम्ही केलेल्या या छान पदार्थांचे प्रयोगांचे फोटो काढा नि मित्रमैत्रिणीना पाठवा म्हणजे तेही तुमच्याकडून शिकतील. सारखं टी.व्ही., मोबाईल बघत राहण्यापेक्षा या कामांना लागलात तर तुम्ही फ्रेश आनंदी राहाल. स्वस्थ राहा नि स्वतः बनवलेला मस्त खाऊ खा, आई-बाबांना मदत करून सर्वांची शाबासकी मिळवा.


-अर्चना देव शिक्षिका,
नवीन मराठी शाळा पुणे