नित्यनेमाने पाहिली आहे मी मुलांची शाळा भरताना,
उडायची धांदल सर्वांचीच त्यांची ने-आण करताना. 
 
वर्गांमधून ऐकू यायचा बडबडगीतांचा किलबिलाट,
तर कधी मैदानावरचा कलकलाट, 
क्षणात थिजले सारे, थांबली सारी जगरहाट. 
 
पाहते आता नवीन शाळा माझ्याच अंगणात भरताना,
धकाधकीच्या जीवनात कधीच दिसला नव्हता हा नजराणा. 
 
घंटा होते शाळेची ऐकून कोकिळेच्या मधुर ताना, 
मग पाहते मी चिऊताईंना घाई गडबड करताना.
 
नेहमीप्रमाणेच उशीर झालेला असतो कावळेदादांना,
तोपर्यंत सुरू झालेली असते पोपटराजांची प्रार्थना. 
 
त्रेधा उडते खारूताईची सर्व पक्ष्यांना शिस्त लावताना,
करडी नजर ठेऊन असते घार आभाळात उंच उडताना.
 
परतताना घरी वटवाघळे बंद करतात दारे शाळेची,
निजतात सारे आपल्या घरट्यात काळजी न करता दुसऱ्या  दिवसाची.
 
घुसमटलेल्या वातावरणात कोंडी झाली होती स्वातंत्र्याची,
पाहिली नव्हती कधीच अशी शाळा भरताना पक्ष्यांची. 
 
मनिषा संदीप कुतवळ