आप्पे

दिंनाक: 29 Apr 2020 22:06:22


 

मधुरा म्हणजे अखंड उत्साहाचा झराच, आवड तर सगळ्याच गोष्टींची नट्टापट्टा, नाच, गाणे, उपक्रम, गप्पा मारणे, अभ्यास, सल्ले... सल्लेसुद्धा भन्नाटच मैत्रिणींचे भांडण सोडवण्यात तरबेज अन् वरून पटवून देण्यात मधुबाई एकदम सगळ्यांची बाईच होते बरं!. सगळंच आवडतं तिला करायला. शाळेत आल्यापासून ते घरी जाईपर्यंत एकदम जोश टिकून अखंड बडबड आणि आईबद्दल तर फार भरभरून बोलते ती, तिची आईसुद्धा तितक्याच उत्साहाने आपल्या व्यग्र दिनक्रमातून तिच्यासाठी क्वालिटी टाइम देते. आता मधुरा एवढी क्रियाशील आणि तिला वेळच वेळ आहे मग शांत थोडीच बसणार आहे ती? तिच्याकडून जाणून घेऊ या रेसिपी तिच्याच शब्दात.
नमस्कार, मी मधुरा आज आई आणि मी आप्पे बनवणार आहोत, खूप सोप्प आहे. ३ वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ भिजत घालायची, छान भिजली की मग बारीक वाटून घ्यायची आणि थोडस पाणी घालायचं आणि ४ ते ५ तास झाकून ठेवायचं. मग ना त्या पिठात पौष्टिकता वाढविण्यासाठी ओला नारळ, किसलेलं गजर, कांदा, हिरवे वाटाणे, मका, सिमला मिर्च, आलं चिरून टाकू शकता म्हणजे वन डिश मिल तयार होईल आणि चवपण छान लागेल. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिमुटभर सोडा टाका आणि आप्पे पात्र गॅसवर ठेवा आणि गोल चमच्याने त्या पात्रात ते मिश्रण टाका. वरून झाकण ठेवायला विसरू नका बरं! छान मऊ होईल.

आता चटणी - शेंगदाणे, डाळव, ओला नारळ. सारख्या प्रमाणात घ्यावे लसूण, हिरवी मिरची, जिरे, हिंग, मीठ इ. तेलात छान भाजून घ्यायचं आणि पाणी टाकून वाटून घ्यायचं. एकदम बारीक! वर तडका द्यायचा कडीपत्ता आणि मोहरीचा. बस्स! झाली तयार चटणी.

 

-मधुरा बर्दापुरकर 

श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय,अंबाजोगाई जि.बीड.