स्त्री शक्ती

दिंनाक: 28 Apr 2020 22:19:11


 

प्रत्येक आईला वाटत असते की आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हावे आणि ते मूल चांगल्या रीतीने घडवावे. आपण ज्या प्रकारे आपल्या बाळावर संस्कार करत असतो ती पद्धत प्रत्येकालाच योग्य वाटत असते. आई आणि वडील म्हणून हा विचार मनात येणे चुकीचं ही नाही. फक्त हे करत असताना स्वतः आपण कितपत या गोष्टी पाळत आलोय आणि पाळतोय हे पडताळून पाहणे आज गरजेचे आहे. संध्याकाळी दिवेलावणीच्या वेळेस आपल्या मुलाने शुभंकरोती म्हणावं असे वाटणारे अनेक पालक मी पाहिलेत पण स्वत: शुभंकरोती म्हणणारे आई बाबा क्वचितच पाहायला मिळतात. त्यांचंही योग्य आहे हो, नोकरी व्यवसाय हीच खरी शुभंकरोती. आणि तशी काळाची गरजच आहे. पण तसे करीत असताना शिवाजी महाराज पुनः जन्माला यावे अशी अपेक्षा करणं चुकीचं का? तर नाही .. जरूर करावी अपेक्षा पण माझ्या मते प्रत्येक आईने आधी झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजाबाई , सावित्रीबाई फुले ह्यांचा आदर्श ठेवून स्वतःला घडवायला हवे. आज कितीही व्यापात असलो तरीही आई म्हणून असणाऱ्या कर्तव्यास कमी पडू नये. हातात कामरूपी शस्त्रे आणि प्रेमरूपी ढाल जोपर्यंत असेल तोपर्यंत एक नाही तर असे कितीतरी शिवराय, टिळक, सावरकर जन्माला घालून या देशाला अर्पण करू शकतो. हे सामर्थ्य फक्त आणि फक्त स्त्रीमध्ये आहे, तिने ते ओळखावे आणि आपले आयुष्य ह्या देशाला आपल्या मातृभूमीला अर्पण करावे. एक जबाबदार नागरिक, देशभक्त घडवणे ही सुद्धा देशभक्तीच नाही का ?

 

- शुभ्रा भट