कोरोनाने आज अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. कोरोना ही कोण्या एका राज्याची, देशाची समस्या राहिली नसून ती संपूर्ण जगाची समस्या झाली आहे. आज संपूर्ण जग या रोगाच्या झळा सोसते आहे.

अशा या कोरोना महामारीच्या निमित्ताने काही बऱ्यावाईट गोष्टी  समोर आल्या आहेत. चांगल्या गोष्टींचा विचार केला तर असे दिसते की, माणूस स्वच्छतेला आज पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व द्यायला लागला आहे. संकटात सापडलेल्या माणसाला मदत केली पाहिजे, ही संवेदनशीलता आज माणसामध्ये प्रकर्षाने जाणवायला लागली आहे. आपल्या प्रजेतील एकही जीव या रोगाचा बळी पडू नये यासाठी राज्य आणि केंद्र सरकार यांनी वेळीच कठोर पावले उचलल्यामुळे जगातील अनेक प्रगत राष्ट्रांपेक्षा आपण या रोगावर चांगले नियंत्रण मिळवले आहे. म्हणून या बाबतीत दोन्ही सरकारची कर्तव्यकठोरता, कार्यतत्परता या दोन्ही गोष्टी समोर आल्या आहेत. पोलीस, प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या नावाने लोक नेहमीच खडे फोडतात, पण या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्याचे प्राण वाचवणारे पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांचे लोक आता तोंड भरून कौतुक करत आहेत. या लढाईत कोरोनाला हरवायचे आणि आपण जिंकायचेच या जिद्दीने लॉकडाऊनमध्ये शिस्तीत वागणारी जनताही प्रशासनाला सहकार्य करताना दिसत आहे.

या कोरोनाच्या निमित्ताने काही वाईट गोष्टीही समोर आल्या आहेत. उदा., काही लोकांना धर्मांधतेमुळे या समस्येचे गांभीर्य लक्षात आलेले नाही. सरकारने सांगितलेल्या गोष्टींच्या नेमके उलटे वर्तन त्यामुळे काही लोकांकडून घडत आहे.

आपली अर्थव्यवस्था संकटात सापडलेली दिसत आहे. काही कुटुंबातील कर्ती माणसे या रोगाचा बळी ठरत आहेत. मुंबई सारखे देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर या कोरोनामुळे भयभीत झालेले दिसत आहे.

अशा या अनेक बऱ्या-वाईट गोष्टी कोरोनाच्यानिमित्ताने समोर आल्या असताना आपण मात्र सकारात्मक विचार करून चांगल्या गोष्टीही समोर आल्याचे समाधान मानू या. सरकारने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करू या. जे जे आपल्या परीने सहकार्य करता येईल ते करू या आणि कोरोन रूपी दुष्ट शत्रूचा आपण एकजुटीने पाडाव करू या

लॉकडाऊनच्या काळात घरीच राहू, सुरक्षित राहू!

- बबन गायकवाड

केशवराज विद्यालय, लातूर