'सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे’ या सुविचाराप्रमाणे आपल्या सर्वांनाच वाटते की आपले अक्षर सुंदर असावे. विद्यार्थ्यांचे अक्षर कसे सुंदर होईल यासाठी आम्ही सर्व शिक्षक सतत प्रयत्नशील असतो.

हस्ताक्षर सुधारण्याच्या दृष्टीने मी केलेला हा छोटासा प्रयत्न.

शाळा पातळीवर, वर्ग पातळीवर विविध स्पर्धा नेहमी होत असतात. सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रथम तीन क्रमांक काढून त्यांना बक्षीस देतो. स्पर्धा संपली की तिथेच विषय संपतो. आता स्पर्धा पुढच्या वर्षी, पण इतर जे सहभागी विद्यार्थी की ज्यांचे क्रमांक आले नाही अथवा ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला नाही त्या विद्यार्थ्यांमध्ये कोणताही नून्यगंड निर्माण होऊ नये यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हेही एक आव्हान असते.

सगळ्यांना प्रवाहात आणण्यासाठी या अनोख्या स्पर्धेचा विचार माझ्या मनात आला. सर्वच विद्यार्थी पुढे आले पाहिजेत, कोणी मागे राहायला नको ही माझ्या मनातील भाबडी जिद्द. आपल्याला काही येणार नाही किंवा काही जण तसा प्रयत्नही करताना दिसत नाही हा त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या मनातून काढण्यासाठी अनोख्या स्पर्धेचा प्रयत्न मी यावर्षी केला. त्यात इयत्ता १ ली म्हणजे नुकतीच लिहायला वाचायला मुले शिकत असतात. पण वेळीच अक्षर वळणदार असणे तितकेच महत्त्वाचे. पुढे अभ्यास वाढल्याने या विद्यार्थ्यांचे छोटया गोष्टीकडे दुर्लक्ष होते.

२३ जानेवारी हस्ताक्षरदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना साधी दोन वाक्य लिहायला सांगितली. त्यांच्या अक्षरांचे वळण, आकार,  नीटनेटकेपणा पाहिला. नंतर त्यांच्या वह्याही पाहिल्या, कारण अक्षर स्पर्धेवेळी सुवाच्च काढायचे आणि इतर वेळी कसेतरी काढायचे, असे न करता रोजच अक्षर व्यवस्थित काढून वही देखील नीट ठेवायची.  त्यातून काही क्रमांक काढले. सर्वच प्रथम बरं का! या सर्व मुलांचे कौतुक करून छोटेसे बक्षीस दिले. यांच्या वह्याही इतर विद्यार्थ्यांना दाखविल्या.

पुन्हा पंधरा दिवसांनी पहिल्या वेळेस स्पर्धेत जे क्रमांक काढले होते, त्या विद्यार्थ्यांना बाजूला काढून उरलेल्या विद्यार्थ्यांची परत स्पर्धा हस्ताक्षर घेतली व त्यातून काही विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक दिले. त्यांनाही बक्षीस दिले.   पुन्हा पंधरा दिवसांनी स्पर्धा होईल असे सांगितले.

याचा फायदा असा झाला की सर्वच विद्यार्थी आपले अक्षर  व वही याकडे जातीने लक्ष देऊ लागले. सर्वजण चांगले हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न करू लागले. दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला स्पर्धा असल्याने आता आपण बाईंच्या हस्ते बक्षीस मिळवायचे अशी जिद्द त्यांच्या मनात नकळत उभी राहिली. यातून नक्कीच एक फायदा झाला की त्यांना कळलेच नाही की आपण आपले अक्षर छान काढू लागलो आहोत. प्रत्येक अक्षराच्या वळणाकडे लक्ष देत आहोत.

 मुलांमध्ये मीही काहीतरी करू शकतो, माझे अक्षर छानच काढणार, किंवा मी तसा प्रयत्न करणार हा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी ही अनोखी स्पर्धा नक्कीच उपयोगी पडली.

यातून मुलांना म्हणावेसे वाटते, 

||अक्षरातून उमटे आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा

  वेळ नका घालवू घ्या उत्कृष्ट लेखनचा वसा ||

असा हा सकारात्मक दृष्टिकोन  विद्यार्थ्यांमध्ये आला की नक्कीच हे विद्यार्थी पुढे कोणत्याही गोष्टीचे आव्हान नक्कीच पेलतील असा मला निश्चित विश्वास वाटतो.

 

             - मनिषा कदम,सहशिक्षिका

                  नवीन मराठी शाळा, पुणे