वाचनाची सवय

दिंनाक: 02 Apr 2020 21:52:45


मुलांना वाचनाची सवय कशी लावावी? हा खरे तर प्रश्नच नाहीये. सवय लावावी लागत नाही ती लागतेच. काय म्हणताय? पटत नाहीये? चला मी सांगते तुम्हाला....
सध्या आपण घरीच आहोत. भरपूर वेळ हाताशी आहे. टीव्हीवरच्या बातम्या बघून व्हाटस्अप्चे संदेश पाठवून कंटाळा आला आहे. सारखे समोर बसून बोलणार तरी काय न किती?
अगदी हीच स्थिती घरोघरी आहे. मग काय करणार तरी काय? पण थोडा वेळ जरी विचार केला आणि सकारात्मकतेने पाहिले तर हीच ती वेळ आहे आपल्या मुलाला वाचनाची सवय लावण्याची.
खरे तर मूल सात आठ महिन्यांचे झाल्यापासूनच त्याला छान रंगीत चित्रे असणारी बडबडगीतांची गोष्टींची पुस्तके आणायला हवीत. बाळाला भरवताना गाणी गोष्टी सांगत भरवल्यास बाळ छान जेवते. मानसिक पोषणही होते. पुस्तकांच्या पसाऱ्यात रमलेले मूल हे फार सुंदर चित्र आहे. घरात आई-बाबा, आजी-आजोबा जर वाचन अभ्यास करत असतील तर मूल आपसूकच वाचन करण्यास उद्युक्त होते. अशा वेळी कौतुक करायला हवे. मुलाने पुस्तकावर रेघोट्या ओढल्यास रागवू नये. नाहीतर मूल पुस्तकाला हात लावायला धजणार नाही. अशा वेळी संयम फार महत्त्वाचा आहे.
पुढे मूल थोडे मोठे झाल्यावर वाचन करणे व त्यावर सदस्यांनी चर्चा करणे ह्या गोष्टींनी मुलाला आपली मते मांडायला योग्य शब्दरचना करणे सहज जमू लागते. हा दुहेरी फायदा होतो. रात्री झोपताना गोष्ट सांगतो तेव्हा पुस्तक हातात असेल तर मुलाच्या मनात ठसते की ही गम्मत या पुस्तकात दडलेली आहे.
लहानपणी शक्य झाले नसले तरी its never too late! आता प्रयत्न करायला काय हरकत आहे? आता आपण अधिक समंजसपणे ही वाचनाची सवय रुजवू शकतो.
आजपासून एक ठराविक वेळी ठराविक जागी आपण आपल्या मुलाला घेऊन बसायचे. अवतीभवती पुस्तके असू द्यात. तुम्ही स्वत:ही काही पुस्तके मुलांना वाचून दाखवा. आशयानुरूप हावभाव करीत कधी मध्येच थोडंसं समजावून देत हे वाचन करू या. मुलांच्या वयाला साजेशा गोष्टी, गाणी तुम्ही निवडलीत तर मुलांना गंमत वाटेल. या वाचनाचा सुरुवातीला एखादा व्हिडिओ बनवा तो तुमच्या मुलाच्या मित्रांना पाठवा. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीही पुन्हा हेच करा. चार दिवसातच मूल तुमच्या पाठीमागे लागेल चला वाचायला म्हणून. आता तुमच्यासमोर मुलाला वाचायला लावा. त्याचे वाचन उच्चार स्पष्ट येत आहेत की नाही हे समजावून सांगण्यासाठी त्याचा व्हिडिओ घ्या. तो कुठेही पाठवू नका. फक्त त्यालाच दाखवा. त्यातील चुका त्याला समजावून सांगितल्यास त्याचे वाचन सुधारेल. त्यातली गंमत त्याला समजू लागेल. आता त्याचा विडिओ करून तो पाठवा म्हणजे मुलाला प्रोत्साहन मिळेल. त्याचा उत्साह वाढेल.
आपले मूल हे आपले असते. त्याचे बरे वाईट गुण हे आपल्यावर अवलंबून असतात. पण शेवटी त्यालाही त्याच्या स्वतंत्र आवडीनिवडी असणार हे मनाशी लक्षात ठेवल पाहिजे. जबरदस्ती करू नये. वाचाल तर वाचाल हे वाक्य आपल्याला माहिती आहेच. या वाक्याची चर्चा घरात मुलांशी केल्यास त्यांना नक्की समजेल आपण का वाचले पाहिजे ते. वाचणे या शब्दाचे दोन अर्थ त्यांना विचारा.
जिथे पुस्तक प्रदर्शन असेल तिथे मुलांना जरूर घेऊन जा. त्यांना हवी ती पुस्तके हाताळू द्या. खरेदी करू द्या. मुलांच्या नावाने वाचनालयाचे सभासदत्व घ्या. पुस्तके बदलून आणणे हे काम तुमच्यासोबतीने करू द्या. अभ्यासपूर्ण वाचन, समजून घेऊन वाचन या अभ्यासताल्या बैठकीसाठी आवश्यक गोष्ट वाचनाच्या सवयीने साध्य होतात.
सततचे प्रयत्न व संयमाने ही सवय आपण मुलांना नक्कीच लावू शकतो.
किमान या एकवीस दिवसात आपण तिची पायाभरणी नक्कीच करू शकतो. सर्वांना वाचनाच्या शुभेच्छा!!!


- स्वाती यादव.