बागेतील फुले

दिंनाक: 02 Apr 2020 15:39:26


 

बागेतील फुलेनव्यानेच चालू झालेल्या भजनी मंडळात खूप मैत्रिणी झाल्या.त्यातील एक करुणा नावाची मैत्रीण खूप जवळची, शंखवादन,सामाजिक कार्य करते.
सहजच एक दिवस तिच्या घरी जाण्याचा योग आला. चहा आणि गप्पा झाल्या. तिच्या टेरेसवरच्या बागेने आमची मैत्री अधिकच दृढ झाली. फळ, फुले, भाजीफुलांचे तर असंख्य प्रकार पाहून मी थक्क झाले. फळांचे प्रकार आणि भाज्या पाहून मी खूप आनंदित झाले.
ह्या सर्व फळभाज्या, फुले, फळे केवळ कुंड्यामध्ये आलेले. मी निसर्ग नेत्रसुख घेतले आणि तिला कौतुकाची थाप मारली.
हे सर्व तू कसे करतेस तिच्याकडून सविस्तर सर्व माहिती घेतली. त्यातून घरच्या घरी कसे खत तयार करते ते सांगितलं आणि रोजच या बागेच्या सेवेसाठी तीन तास राखीव ठेवते असे सांगितले. मलाही फुलझाडांची खूप आवड पण ते कसे वाढवावे याचे ज्ञान नव्हते, मी ही जवळजवळ ३५ प्रकारची फुलझाडे लावली आहेत. पण फुलांना बहर कमी असायचा, तिचे हे निसर्ग वैभव पाहून निश्चय केला आपली बाग फुलवायची. आणि लागले कामाला.
मध्यंतरी वाईला जाण्याचा योग आला, तेव्हा तिथून शेतजमिनीची माती आणली. करुणाने सांगितल्याप्रमाणे घरीच खत तयार केले. लहान बाळाची काळजी घ्यावी तशी काळजी घेतली आणि रोजचे २ तास बागेला दिला.
आणि काय आश्चर्य !!! म्हणतात ना, 'पेरावे तसे उगवते' मन लावून,प्रेमाने या फुल झाडांना योग्य प्रमाणात खत, प्रमाणात पाणी दिले, छान देखभाल केली.
सद्य परीस्थितीत बाहेर पडू शकत नाही याचे काही वाटले नाही कारण मी माझी फुलबाग वाढवत होते.
इतके दिवस रोज फुले मंडईतून विकत घेऊन देवाला वाहत होते.सद्य परिस्थितीत बाहेर जाऊ शकत नाही आणि फुले विकत आणू शकत नाही आणि याच काळात माझ्या या टेरेसबागेतील फुले उमलू लागली.
टेरेसची फुलबाग बहरलेली पाहून मनस्वी खूपच आनंद मिळाला.रोजच ताट भरून वेगवेगळी फुले,तुळस, बेल देवांसाठी बहरू लागले. देवघरात फुले वाहिली आणि सद्य वातावरणाचे मळभ दूर झाले. सकारात्मक भाव हृदयी येऊ लागले.
आज श्रीरामनवमी, प्रभूंच्या सेवेसाठी हा निसर्ग टेरेसमध्ये फुलांच्या माध्यमातून डौलात उभा आहे. हा विचार मनात येऊन गेला.
पण खरंच अशा बिकट प्रंसगी ह्या निसर्गाने फुलांच्या माध्यमातून अलौकिक साथ दिली. त्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी वाटते.
आज हिच प्रभू श्रीरामाची पूजा. चराचरात असलेल्या या प्रभूंचे दर्शन या फुलांनी दिले याचे समाधान. कारण देव भावाचा भुकेला.
देशावरील आलेले संकट लवकर दूर होवो हीच प्रार्थना.!!!

 

- आशा कुलकर्णी