१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यापूर्वी सुमारे दीडशे वर्ष आपल्यावर इंग्रजांचे राज्य होते. या स्वातंत्र्ययुद्धात ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली त्यात काही कोवळी तरुण मुलेही होती. त्यांच्यातलेच एक म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे.
जॅक्सन नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याचा गोळ्या घालून झाडून त्यांनी वध केला. यासाठी अनंत कान्हेरे यांना फाशी देण्यात आली.
जॅक्सन नाशिक जिल्ह्याचा कलेक्टर होता. तो फार चतुर होता. जॅक्सन घोड्यावर बसून गावात चक्कर मारी; लोकांची विचारपूस करीत लोकांशी मराठीत बोले. तो संस्कृतही शिकला होता, पण जे जाणकार होते ते जॅक्सनला चांगले ओळखून होते. जॅक्सनचे अत्याचार त्यांना माहीत होते. ‘वंदे मातरम’ असे म्हणणारे तरुण त्याला गुन्हेगार वाटत.
विनायक दामोदर सावरकर यांचे वडीलभाऊ गणेश दामोदर सावरकर म्हणजेच बाबाराव नाशिकमध्ये राहत. बाबाराव सावरकर म्हणजे देशभक्त तरुणांचे वडीलधारे मार्गदर्शक होते. गोविंद त्र्यंबक दरेकर या तरूण कवीच्या कविता बाबारावांनी छापून प्रकाशित केल्या. त्या देशभक्तीपर होत्या म्हणून छापल्यानंतर त्यांचा झपाट्याने प्रसार होणार होता. त्यामुळे इंग्रज सरकारने या प्रकाशनावर बंदी घालून बाबारावांवर देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांच्यावर खटला भरला. त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावून अंदमानला पाठवण्यात आले.
औरंगाबाद येथे राहात असलेल्या अनंत कान्हेरे या कोकणातील अठरा वर्षाच्या कोवळ्या तरुणालाही या वार्ता वाचून अतिशय संताप येत होता. औरंगाबादमध्ये ज्यांच्या घरात अनंत कान्हेरे राहत असत, त्या गंगाराम मारवाडी सराफाने त्यांना क्रांतीकार्याची गुप्त शपथ दिली. औरंगाबादमध्ये नाशिकच्या गणु वैद्य यांच्याशी अनंत कान्हेरे यांची गाठ पडली. ते क्रांतिकारक संस्थेचे सभासद होते. अनंत कान्हेरे यांनी त्यांच्याकडे जॅक्सनला मारायची तयारी दर्शवली. वैद्य यांनी अनंत कान्हेरे यांची भेट विनायक नारायण देशपांडे आणि अण्णा कर्वे यांच्याशी घालून दिली. देशपांडे यांनी अनंत कान्हेरे यांना एक पिस्तूल दिले. दोन दिवस त्यांनी झाडावर नेम धरून पिस्तुलातून गोळ्या झाडण्याचा सराव केला. त्यानंतर कलेक्टर कचेरीत जाऊन त्यांनी तिथे जॅक्सनला नीट बघून घेतले.
जॅक्सनची नाशिक येथून मुंबईला बदली झाली. जॅक्सन एकदा नाशिक सोडून गेला म्हणजे मग त्याला मारणे कठीण होईल हे कर्वे यांना जाणवले मग त्यांनी त्यांच्या वधाची योजना आख़ली. अनंत कान्हेरे यांच्यावरच त्यांनी ही कामगिरी सोपवायचे ठरवले. जॅक्सनच्या वधाचा मुहूर्तही त्यांनी नक्की केला. ’२१ डिसेंबर १९०९, मंगळवार रात्री नऊच्या सुमारास नाशिक इथल्या विजयानंद नाट्यगृहात’.
विजयानंद नाट्यगृहात बालगंधर्वांचे ‘शारदा’ हे नाटक बघायला जॅक्सन आला की त्याच्या सत्कार कार्यक्रमातच त्याला या जगातून कायमचा निरोप देण्याचा विचार कर्वे यांनी करून ठेवला.
नाटक रात्री नऊ वाजता सुरू झाले. तेढ्यात जॅक्सनची घोडागाडी थेटरपाशी येऊन पोहोचली. त्याचे स्वागत करण्यासाठी लगबगीने सरकारी अधिकारी त्याला सामोरे गेले. जॅक्सन आपल्या खुर्चीकडे जात असताना अनंत कान्हेरे यांनी चपळाईने जॅक्सनच्या पुढे जाऊन त्याच्या छातीवर आपल्या पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. जॅक्सन रक्तबंबाळ होऊन खाली मरून पडला. बाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांनी अनंत कान्हेरे यांना पकडले.
अनंत कान्हेरे यांचा भाऊ तुरुंगात त्यांना भेटला आणि वकिलाची व्यवस्था करतो म्हणाला. पण अनंत कान्हेरे यांनी वकील घेण्याचे नाकारले. या अठरा वर्षाच्या मुलाने आपली बाजू कोर्टात स्वतःच मांडली. सरकारी साक्षीदारांची उलट तपासणी ही स्वतःच घेतली.
दि. १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाणे येथील तुरुंगात सकाळी सात वाजता अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे, विनायक देशपांडे यांना फाशी देण्यात आली. तिघेही भगवतगीतेची प्रत हातात घेऊन आनंदाने फाशी गेले.
अशा या शूर हुतात्म्याला शतशः प्रणाम.


- अमेय प्रमोद परदेशी
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे.