बाप्पा

दिंनाक: 19 Apr 2020 22:28:30


आई बाबा तुम्ही घरी कसे ? ऑफिस ला तुमच्या सुटी लागली?
शाळा आणि आजोळ ही बंद आहे.. बाप्पाने माझी प्रार्थना ऐकली

कोणी घरातून बाहेर पडत नाही।.. म्हणतात बाहेर जंतू आहे...
नक्की प्रॉब्लेम काय असावा?.. मनात माझ्या किंतू आहे

खाण्यापिण्याची नुसती चंगळ चालू आहे
रोज नवीन पदार्थ अता घरी बनत आहे

कामवाल्या मावश्या पण बहुतेक सुट्टीवर आहेत...
कारण त्यांची काम आता घरातलेच करत आहेत

जाऊ देत ना... असेल काहीतरी प्रॉब्लेम मला काय त्याचं...
पण आता एवढा वेळ आहे ।... करायचं काय ह्याचं?

चित्र काढली.. डान्स केला.. खूप खूप टीव्ही बघितला...
शहाण्या मुलासारखा वागता वागता घरच्यांना थोडा त्रासही दिला

आता जरा अजबच वाटत आहे मला ही सुट्टी
बाकीच्यांनी जणू घेतली आहे आमच्याशी कट्टी

कोणी घरी यायचं नाही, आपण कुठे जायचं नाही
एवढच काय .. बाहेरून आणलेल्या सामानाला हात देखील लावायचा नाही

म्हणतात फक्त सगळे.. चला एकत्र बसून बोलू
थोड्यावेळाची नाटकं नुसती... सारखा तो मोबाईल चालू

खरं सांगू... असली सुट्टी मला फार काही आवडली नाही
पण सांगू कोणाला?? माझा हा प्रॉब्लेम कोणालाच कळणार नाही

मित्रांची माझ्या मला खूप आठवण येतेय आता
खरं खरं सांग बाप्पा... कधी येईल बाहेर जाता

निळं निळं आकाश खिडकीतूनच बघू?
बंद घरात घुसमटत किती दिवस जगू?

बाप्पा तुझी जादूची कांडी लवकर फिरू दे..
बाहेरच्या मोकळ्या हवेत मला खेळायला जाऊ दे....

 

 

---सौ. मानसी कुलकर्णी