शिवाजी महाराजांचा स्फूर्तिदायक आणि रोमहर्षक इतिहास माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही सापडणे अवघडच. जगभरातील वाचक आणि संशोधकांनाही शिवाजीच्या गनिमी काव्याची (gorilla war) भुरळ पडलेली दिसते.

मूठभर सैनिकांच्या जिवावर अवाढव्य व बलाढ्य मुघल सैन्याशी केलेल्या विजयी लढाया हा अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे.

महाराष्ट्रातील डोंगरदऱ्यांचा  वापर करून खडानखडा माहिती काढून आडवळणाच्या वाटेवर शत्रूला आणून अगदी मोजक्या सैन्यानिशी हजारोंच्या शत्रूला जेरीस आणून पळवून लावलेल्या अनेक लढाया शिवाजींनी आपल्या जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या आणि साथीदारांच्या साह्याने लढल्या. त्यातलीच एक गाजलेली लढाई म्हणजे पावन झालेल्या घोडखिंडीतील लढाई.

पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जाताना घोडखिंडीत बाजींनी गाजवलेल्या शौर्याची कमाल!  त्यांनी शिंपलेल्या रक्ताने घोडखिंड पावन झाली आणि पावनखिंड म्हणूनच इतिहासात अजरामर झाली.

सिद्धी जौहरच्या वेढयातून सुटून भर पावसाळी रात्री अंधारात जिवावर उदार होऊन लढणाऱ्या वीरांच्या साक्षीने महाराजांनी हा धाडसी बेत आखला आणि योजनेबरहुकूम पारही पाडला. पण त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली. बाजी आणि फुलजी हे खंदेवीर, सख्खे भाऊ, स्वराज्याचे आधारस्तंभ राजांना गमवावे लागले.

एका डोळ्यात आसू अन दुसऱ्या डोळ्यात हासू अशी महाराजांची स्थिती होती. अशा या अनमोल रत्नांच्या महान त्यागातूनच स्वराज्याचे महान कार्य राजांनी उभारलेले होते. सर्वसामान्यांना सुखी जीवन जगता यावे यासाठी सातत्याने चाळीस वर्षे त्यांनी लढा देऊन स्वराज्य नावारूपास आणले.

रणजीत देसाई हे अत्यंत नावाजलेले लेखक. त्यांची ही कादंबरी वाचताना एकदा पुस्तक हातात घेतले की पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही खाली ठेवणारच नाही.

बाजीप्रभू देशपांडेंची पूर्ण ओळख तुम्हाला या पुस्तकातून होईल. इ.६ वीला जुन्या अभ्यासक्रमात हा धडा पाठयपुस्तकात होता. पण नवीन अभ्यासक्रमात तो वगळला गेला.

पण या पुस्तकाच्या वाचनातून तुम्हाला नक्कीच स्फूर्ती आणि आनंद मिळेल.

तर बाळमित्रांनो, वाट कशाची पाहताय? मिळवा हे  पुस्तक आणि वाचल्यानंतर ते कसे वाटले हे आपल्या  शिक्षणविवेकला नक्की कळवा.

- स्वाती गराडे