वाचन वेग

दिंनाक: 16 Apr 2020 21:00:50

 


विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,  आपल्याला ही सुट्टी मिळाली आहे तर या सुट्टीचा काही सदुपयोग करण्यासाठी एक छोटासा उपक्रम मी आपल्याला सांगणार आहे.

आपण सर्वजण पुस्तकं वाचत असलाच! एखादं पुस्तक काही जण एका रात्रीत वाचून काढतात तर काही जण म्हणतात दोन दिवस लागले. काही जण म्हणतात नाही बाबा, मला तर आठ दिवस लागतात. असे का होतं? एकच पुस्तक काही जण एका रात्रीत वाचतात तर काही जणांना वेळ लागतो. यामागील कारण एकच आहे, प्रत्येकाचा ‘वाचन वेग’. हाच वाचन वेग कसा काढायचा हे मी आपल्याला सांगणार आहे.

सामान्यतः हा वाचनवेग १ मिनिटांत २०० शब्द असा असतो. काही विशेष, बुद्धिमान व्यक्तींचा वाचनवेग १मिनिटात  १०००हून सुद्धा जास्त असू शकतो. जसं की स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वाचनवेग हा असामान्य होता.

 आता हा वाचनवेग काढणासाठी काय करावं  लागते हे मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम घड्याळात किंवा मोबाईलमध्ये १ मिनिटाचा टायमर लावायचा त्याआधी  आपल्याकडे असलेलं पुस्तक किंवा वर्तमानपत्र यापैकी काहीही घेऊन तयार राहायचं मग १ मिनिटाचा टायमर लावून त्यातील एक उतारा वाचायला घ्यायचा. वाचन सुरू केल्यापासून बरोबर एक मिनिटाने वाचन थांबवायचं आणि आपण एका मिनिटात किती शब्द वाचले ते मोजायचं. ती संख्या लिहून ठेवायची. कोणाचे १५० कोणाचे १८० तर कोणाचे १९० असे शब्द येतील. अगदी १०० पर्यंत शब्द आले तरी चालतील पण त्यापेक्षा कमी आले तर नक्कीच वाचनवेग वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

या उपक्रमाचा उपयोग आपल्याला अभ्यासासाठी नक्कीच होईल. त्यामुळे हा प्रयोग आपण नक्की कराल आणि मला कळवाल अशी अपेक्षा आहे.

- गायत्री जवळगीकर