खूपच छान वाटतं....
कारण मी शिक्षक आहे

गोंडस अशा मुलांसोबत
जेव्हा मी सार विसरून मूल होते...
त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने अवघे टेंशन दूर होते...
खूप छान वाटतं ...की मी शिक्षक आहे

नवीन काही शिकताना ...
मुले आनंदाने समरस होतात
स्वत:हून जमलं काही की
की डोळे त्यांचे चमकतात
खूप छान वाटतं...की मी शिक्षक आहे

लाजणारे मूल जेव्हा धिटुकले बनते...
अबोल कळी जेव्हा एखाद्याची खुलते..
खूप छान वाटतं...की मी शिक्षक आहे

आपल्यामुळे लागते एखादी चांगली सवय..
बदलून जाते जेव्हा एखाद्या मुलाचे अवघे आयुष्य...
खूप छान वाटतं ...की मी शिक्षक आहे

शिकवते मी पण जेव्हा मुलांकडून काही शिकते..
माझ्या शिष्याची गरुड़भरारी
पंखाना माझ्या जेव्हा बळ देते
खूप छान वाटतं... की मी शिक्षक आहे

पुस्तकातले ज्ञान जेव्हा कोणी जीवनात जगते
माणूस म्हणून दुसऱ्यासाठी थोडं तरी जेव्हा करते
खूप छान वाटतं... की मी शिक्षक आहे

उत्साहाने अन मुक्तपणे मुले जेव्हा बहरती
आत्मविश्वास अन धाडसाने सहज अगदी जेव्हा वावरती..
खूप छान वाटतं.. की मी शिक्षक आहे

जातात खूप दूर पाखरे पण
जेव्हा कधी आपल्याला स्मरती
आपुलकीने स्नेहाची ही नाती जेव्हा जपती
खूप छान वाटतं... की मी शिक्षक आहे

जगणे रोज नव्याने नव्या फुलांसोबती
आपल्या स्वप्नांना जेव्हा ही मुले साकारती
खूप छान वाटतं... की मी शिक्षक आहे

खरे श्रीमंत आपण कारण ही राष्ट्राची सारी संपत्ती
आपल्या पेशात कीर्तीचे अनमोल मोती जेव्हा सांडती
खूप छान वाटतं... की मी शिक्षक आहे

                                                              - सुवर्णा सातपुते