झंप्या पहिलवान

दिंनाक: 11 Apr 2020 17:20:58


 

तसं बघितलं तर झंप्या म्हणजे काडीकिडा. फुंकर मारली तर उडून जाईलसा. शाळेतले त्याचे मित्र सतत मस्ती करत असतात पण हा आपला कोपऱ्यात उभा अंगठा चोखत. शाळेचं दप्तर पण पाठीवर झेपत नाही त्याला आणि ते पाठीवर घेतलं की इतका वाकतो की दिसतच नाही कोण चाललंय. सगळे मित्र त्याला काडीकिडा असंच म्हणू लागले हळूहळू.  
शाळेत तेच आणि घरातही तेच सोसायटीतले मित्र त्याला खेळायला बोलावतात, खेळता खेळता झंप्या पडतो मग मुलं हसतात मग झंप्या रागावतो दांत ओठ खात बघून घेतो तुमच्याकडे असं म्हणत डोळे मोठे  करत निघून जातो. मग सगळी मुलं अजून हसतात. घरी आई पण सारखी ओरडते, ”बाळा सारखे वेफर्स आणि मॅगी नको मागत जाऊस. काहीतरी पौष्टिक खात जा बरं अंगात शक्ती कशी येणार?” पण झंप्या काही ऐकत नाही. काय करणार? त्याला भाज्या आवडत नाहीत. फळं, कोशिंबिरी काहीच आवडत नाही. जेवण पण नकोच असते. त्याऐवजी काहीतरी चटकमटक द्या आवडीने खाईल असा हा काडीकिडा. एकदा असाच सोसायटीतल्या मित्रांशी भांडून चिडून रागवून सगळ्या मित्रांना सोडून एकटाच घरी जायला निघाला. वाटेत दगड तुडवत तुडवत त्याच्या बिल्डिंगपाशी  जाऊन पोहोचला तेवढयात त्याला शेजारच्या बंगल्यातले शास्त्रज्ञ काका गॅलरीत उभे असलेले दिसले. ह्या काकांचं  नाव होतं  चं.बू. गबाळे काका. सगळे त्यांना असंच म्हणायचे.  पण झंप्याला मात्र आईने सांगितले होते त्यांना शास्त्रज्ञ म्हणायचे ते खूप हुशार आहेत, त्यांना त्यांच्या नावावरून हसत जाऊ नको.
तर हे चं.बु. गबाळे काका, सॉरी शास्त्रज्ञ काका खूप म्हणजे खूपच मजेशीर होते. गळ्यात एक मळका अॅप्रन आणि हाफ चड्डी, कपाळावर आठ्या, जाडजूड मिशा आणि चष्मा यात त्यांचा खरा चेहरा कळायचाच नाही, त्यांच्याशी बोलताना तर फार मजा यायची. त्यांना काही प्रश्न विचारला की आधी ते दोन बोटांनी चष्मा सावरायचे आणि डोळे बारीक करून विचारायचे,"काय?”  यांना नीट ऐकू यायचं बरं का! पण सवयच काsss य असं  विचारायची. मग मुलं हसायची. खूपच गमतीशीर होते हे चं.बू. गबाळे काका म्हणजे शास्त्रज्ञ काका तर झंप्याला हे काका गॅलरीत उभे असलेले दिसले. त्याने विचार केला जरा काकांकडे जाऊन गप्पा मारू या. इतक्या घरी जाऊन तरी काय करायचेय? तो सपसप त्यांच्या बंगल्याच्या पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर गेला. दार उघडंच होतं. खरं म्हणजे काका काहीतरी काम करत बसले होते. मध्येच कंटाळा आला म्हणून गॅलरीत उभे राहिले असावेत मगाशी. त्याला बघताच काकांनी विचारले, "काय? भांडलास काय मित्रांशी?" अॅ....  आ...  मला वाटलंच. बस जरा मी माझं काम करतोय.
काकांची ही खोली म्हणजे मस्त मोठी प्रयोगशाळा होती. स्वयंपाकघरात असतात तसे मोठे मोठे मोठे मायक्रोस्कोप, काचेच्या नळ्या, बाटल्या, प्लॅस्टिकचे डबे, त्यावर कसली लेबल लावलेली गॅसच्या मोठ्या मोठ्या शेगड्या आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कसलातरी वास. तो वास खोलीभर पसरलेला असे. पण झंप्याला फार कुतूहल असे म्हणून काकांकडे जायला आवडायचे. आज पण असंच झालं काकांच्या प्रयोगशाळेत काहीतरी रसायन गॅसवर उकळत होतं त्याचा विचित्र वास येत होता. झंप्या ओट्यापाशी  गेला तर गॅसजवळ एक वाटीत मस्त वासाची पावडर ठेवली होती. शेजारी एक मोठा लाल पिवळ्या रंगाचा प्लास्टिकचा डबा!  त्यात पण तीच पावडर असावी तो डबा उघडाच होता त्यामुळे झंप्याने डब्यात डोकं खुपसून त्या पावडरचा वास घेतला. अहाहा! त्या गोड वासामुळे त्याला काय वाटलं कोणास ठाऊक चांगल्ली चमचाभरून पावडर त्याने खाऊन टाकली. “अरे ए sss काय करतोयस?” काका पळतच आले आणि ओरडले. “काही नाही काका, यातली गोड पावडर खाल्ली. काकांनी घाईघाईने डब्याचे झाकण घट्ट लावले आणि वर ओरडलेच. "अरे किती खाल्लीस पावडर?” प्राण्यांच्या स्नायूंवर प्रयोग चालू आहेत या पावडरचे...”
"अरे बाप रे!" झंप्या घाबरलाच. “ख ख खूप थोडी  प .. प.. पावडर ख ख खाल्ली काका. च..च... चमचाभर क का काय होईल आता काका?”
“अरे बाबा इथे खाण्यापिण्याचे काहीही पदार्थ नसतात. थोडीच खाल्लीस ना पावडर? ठीक आहे जा चूळ भर आणि पाणी पी.” काका म्हणाले. काकांनी सांगितले तसं झंप्याने केलं आणि तो घाबरून घरी आला. जेवायची इच्छा नव्हतीच नेहमीप्रमाणे त्यामुळे तसाच झोपी गेला, न जेवताच.
दुसऱ्या दिवशी उठल्यावर झंप्याला वेगळंच काहीतरी वाटू लागले. अचानक व्यायाम करावासा  वाटू लागला. दादा घरी वजन उचलतो तशी आज झंप्याही उचलू लागला. आधी दादाला हसू आलं, पण नंतर बघतो तर झंप्याने सहज वजन उचलले. शाळेत गेला तर काय मधल्या सुट्टीत रोहनच्या डब्याचे झाकण उघडत नव्हते. सगळे मित्र प्रयत्न करून थकले. शेवटी झंप्याने एका झटक्यात झाकण उघडून दिले. सगळी मुलं आ वासून बघत राहिली. शाळा सुटल्यावर मुलं बाहेर पडत असताना दोन मुलं मारामारी करत होती. एकाने दुसऱ्याची कॉलर पकडली होती. झंप्याने नुसता धक्का दिला तर तो मुलगा पांच फुटांवर जाऊन पडला. मुलं आश्चर्याने बघतच राहिली. थोड्याच दिवसात झंप्याची  कीर्ती सर्वत्र पसरली.
त्याला काडीकिडा म्हणणारे त्याचे मित्र आता त्याला घाबरू लागले. आता ऐटीत शाळेत प्रवेश करतो ऐटीत घरी येतो आणि त्याचे मित्र त्याला सन्मानाने खेळायला बोलावतात.
काडीकिडा म्हणणारे हेच मित्र आता त्याला  पहिलवान म्हणू लागले आहेत.
"काय मित्रांनो? तुमच्या लक्षात आला का झंप्या कसा पहिलवान झाला ते?"

 


- अश्विनी आंबिके