आपणा सर्वांना गृहबद्ध होऊन राहणे सध्या भाग आहे. एकांत आपल्या सगळ्यांवर कोसळला आहे. आपण सुदैवाने कुटुंबीयांसोबत आहोत, परंतु समाज, रोजचे मिसळणे हे आपण हरवून बसलो आहोत. या एकांतात आपण कृतिशील राहू शकतो का? काही घडवू शकतो का? याचा विचार केला पाहिजे.
असाच आपल्या राजाच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या अत्यंत प्रिय अशा भाषांनादेखील मुकलेला आणि स्वतः होऊन एकांतात गेलेला गुणाढ्य याची कथा आपण वाचू या.

शालिवाहन वंशाचा राजा सातकर्णी याच्या शयनकक्षात राजवैद्य चिंताक्रांत होऊन बसले होते, कारण राजाची प्रकृती बिघडण्यामागचे कारण खूपच विचित्र होते. राजाचे अतिशय आवडते मांस त्याच्या प्रकृतीत उदासीनता आणत होते. त्यांनी प्रमुख आचाऱ्याला विचारले, "महाराजांना मोराचे, हरिणाचे मांस कुठून प्राप्त होते?" तेव्हा विंध्य पर्वतातील दोन आदिवासींना बोलवण्यात आले. आदिवासींनी सांगितले, "हे आम्ही तर अनेक वर्षांपासून याच भागातील हरीण व मोर महाराजांसाठी आणून देत असतो. मात्र सध्या सगळेच प्राणी एका साधूबाबाची गोष्ट ऐकत बसलेले असतात आणि त्यामुळे ते एका जागी बसतात, हालचाली करत नाहीत."

हे ऐकून राजा स्वतःच आदिवासींसोबत जायला निघाला. एका मोठ्या शिलेच्या आडून त्या आदिवासींनी राजाला तो साधूबाबा दाखवला. राजाने बघितले - शुभ्र दाढी वाढलेली एक ऋषीसारखी तेजःपुंज व्यक्ती हातातील भूर्जपत्र वाचत आहे. भोवती आदिवासी आणि जंगलातील पशू-पक्षी बसलेले आहेत. ते सारे जग विसरले आहेत.

राजा हळूहळू पुढे गेला. पाहतो तो वाचलेले भूर्जपत्र त्या साधूने समोर पेटवलेल्या यज्ञकुंडात टाकले.

राजा पुढे सरसावला आणि त्याला ओळख पटली!! तो राजाच्या दरबारातील मंत्री गुणाढ्य होता. राजाने त्याच्या हातातील इतर सर्व भूर्जपत्रे आपल्या जवळ घेतली आणि त्यांना परत दरबारात येण्याची विनंती केली. गुणाढ्याच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले आणि राजाच्या डोळ्यासमोरून भूतकाळ झरझर झरझर जाऊ लागला.

नुकताच राणी नागनिकेशी राजाचा विवाह झालेला होता. राणी तपोवनात शिक्षण घेतलेली होती. राजा मात्र लहानपणी कुंभाराच्या घरात आई गौतमीसह भूमिगत होऊन राहिल्याने, त्याचे शिक्षण झालेले नव्हते. एके दिवशी जलक्रीडा सुरू होती. राजा पाणी उडवीत होता आणि राणी म्हणाली, "मोsदक मोsदक".. राजाला वाटले, राणीला लाडू हवेत. कारण संस्कृतात लाडूला मोदक म्हणतात. त्याने लगेच सेवकांना सांगितले की "जलक्रीडा होईपर्यंत लाडू तयार ठेवा." मात्र राणी खो खो हसू लागली. राजाला म्हणाली,"महाराज, मी 'मा उदक' असे म्हणाले, म्हणजे पाणी उडवू नका.. आणि तुम्ही मात्र मोदक समजलात. उच्चारण वेगवेगळे असते त्यांचे."

राजाला हा अपमान सहन झाला नाही. त्याने विद्वानांना बोलावले व विचारले की "संस्कृत शिकायला किती दिवस लागतील?" गुणाढ्य हा संस्कृत पंडित म्हणाला, "किमान सहा वर्षे!" हे म्हणताना त्याच्या मनात वेद, वेदांग, उपनिषदे इत्यादी होते, तर विष्णुशर्मा म्हणाला, "सहा महिन्यांत मी शिकवू शकतो." त्यावर गुणाढ्य म्हणाला, "सहा महिन्यांत अशक्य आहे. असे झाले, तर मी संस्कृतच काय, पण प्राकृत बोलणेही सोडून देईन."

सहा महिन्यांनी राजाने दरबारात अस्खलित संस्कृतात भाषण केले. दरबारात जयजयकार झाला. भाषा बोलता येणे आणि भाषेचे ज्ञान असणे या भिन्न बाबी! पण राजाचा अपमान करणे गुणढ्याच्या स्वभावात नव्हते. गुणाढ्य उठून उभा राहिला आणि प्रणाम करून न बोलता निघून गेला.

विंध्य पर्वताच्या पायथ्याशी आदिवासी बांधवांसह तो राहू लागला. त्यांची 'पैशाची' नामक भाषा शिकला. त्या भाषेत रसाळ कथा रचून वाचू लागला आणि मग त्या कथांच्या परिणामाने राजाचा उत्साही क्षत्रिय स्वभाव जाऊन तो उदासवाणा राहू लागला, कारण हरीण, मोर उदास होते.

पुढे राजाने त्या भूर्जपत्रांवर लिहिलेल्या कथा संस्कृतात अनुवादित करवून घेतल्या. त्याच 'बृहद्कथामंजरी' होत! 'कथासरित्सागर' असेही त्यांचे एक नाव. या कथा जगात सगळीकडे पसरल्या. या बृहद्कथांना जगातील बहुतेक सर्व कथांची प्रेरणा मानले जाते. सर्व विद्वान एकमुखाने मान्य करतात. आपला एकांतवास, अज्ञातवास इतक्या सुंदर रितीने भरून काढणारा गुणाढ्य आज आपला आदर्श आहे!

- रमा गर्गे