वसंत ऋतू

दिंनाक: 09 Mar 2020 17:18:44

 


“सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे।”

या मंगेश पाडगांवकरांच्या ओळी जीवनाचा नवा अर्थच सांगतात. शिशिर ऋतूंमध्ये झालेली पानगळ, सगळीकडे थंडावलेले, काहीसे आळसावलेले वातावरण वसंत ऋतूची चाहूल लागताच सगळी मरगळ टाकून सर्वार्थाने सर्वस्वाची उधळण करण्यासाठी सज्ज होते. माघ-फाल्गुन महिन्यात येणार्‍या या वसंत त्रतूचे सोहळे आगळेवेगळे आणि प्रत्येकाच्या मनात उत्साह निर्माण करणारे असतात. सहाही ऋतूंमध्ये सर्वांत सुंदर असणार्‍या या वसंत ऋतुला कालिदासासारख्या अभिजात कविश्रेष्ठाने ‘ऋतुराज’, ‘मधुमास’ असे संबोधले आहे.

पौराणिक कथेनुसार कामदेवाचा पुत्र म्हणजे ‘वसंत’. त्याचा जन्म झाल्यावर साहजिकच निसर्ग बहरून येतो. वृक्ष त्यांच्यासाठी नव्या पालवीचा पाळणा बांधतात. पुष्प-कुसुमे त्यांच्यासाठी नव्या वस्त्रांची भेट घेऊन येतात. शीतल, सुगंधित वारा त्याला झोका देतो. मोगर्‍याची सुगंधित फुले त्याच्यासाठी मऊ बिछाना बनवतात आणि कोकीळ आपल्या सुमधूर स्वरांनी त्याचे मनोरंजन करतो, असा हा ‘सर्जनोत्सव’.

वर्षा ऋतूनंतर वसंत ऋतूमध्येच पुन्हा झाडांवर कोवळी पालवी दिसू लागते. रंगीबेरंगी फुला-फळांनी वृक्ष डवरू लागतात. जसे पहिल्यांदाच आई होणार्‍या स्त्रीला येणार्‍या बाळाचे स्वागत करण्यासाठी, मी काय काय करू, अशी भावना असते. स्वतःमध्ये अनेक चांगले बदल घडवून आणण्याचा हे भावी आई-बाबा प्रयत्न करतात. जे-जे उत्तम ते-ते आपल्या सोनुल्याला देण्यासाठी उत्सुक असतात. तसेच, या वसंत ऋतूमध्येही निसर्गातील प्रत्येक जण आपल्याजवळील खजिन्याची बरसात करत असतो. डोळ्यांचे पारणे फिटावे, अशी रंगांची उधळण आपल्याला चौफेर पाहायला मिळते.

कोवळ्या उन्हाचा केशरी, तर नव्या पालवीचा पोपटी, तर कधी गर्द हिरवा रंग पांगार्‍याच्या फुलांचा लालभडक रंग, तर गुलमोहराची गुलबक्षी पांढरी, पिवळी, जांभळी फुले अशी रंगपंचमी निसर्गातच पाहायला मिळते.

कडाक्याच्या थंडीपासून रक्षण होण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास करून येणार्‍या वैविध्यपूर्व पक्ष्यांचे रंग, आकार, चोचींचे आकार यांचे निरिक्षण केल्यास निसर्गाने ही त्यांना देऊ केलेली देणगीच आहे, असे वाटते.

निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली ही उधळण आपण कशी स्वीकारणार आहोत? त्यांचा योग्य प्रकारे वापर करून की दिसेल ते मनाप्रमाणे ओरबाडून, लुटून?

निसर्गातील प्रत्येक घटना मानवाला काहीतरी शिकवण देत असते. नैसर्गिक संपत्तीचा मानवाने योग्य प्रकारे वापर केला नाही, तर एक वेळ अशी येईल की निसर्गाची आपल्यावर अवकृपा होईल.

लहानपणापासून मुलांमध्ये पाणी जपून वापरणे, प्रत्येक वाढदिवसाला एक रोप लावणे व त्याची काळजी घेणे, थर्माकोल, प्लास्टिक पिशव्यांचा कमीतकमी वापर करणे, ओला-सुका कचरा वेगळा करणे या छोट्या-छोट्या गोष्टींमधून निसर्गाचा समतोल राखण्याचा संस्कार रुजवता येईल.

वसंतामध्ये निसर्ग रंगांची उधळण करत असतो; त्याला रंगपंचमीची जोड मिळते. रंगपंचमीसाठी लागणारे रंग घरच्याघरी तयार करता येतात. जास्वंदी, गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या वाळवून लाल रंग, पांगारा वृक्षाची लालभडक रंगाची फुले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली, तर लाल रंगाचे पाणी मिळते. पांगारा जंतुनाशक असतो, त्यामुळे या पाण्याने त्वचा स्वच्छ, शुद्ध होते. मंजिष्ठा या वनस्पतीच्या मुळ्या पाण्यात उकळल्या असता, पाण्याला सुंदर लाल रंग येतो. मेंदीची पाने वाळवून बनवलेले चूर्ण हिरवा रंग म्हणून वापरता येतो. बीटरूट किसून एक लीटर पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी गाळून घेतले की छान रंगीत पाणी तयार होते. पळसाची फुले रात्रभर पाण्यात भिजत ठेवली किंवा पाण्याबरोबर उकळून घेतली, तर सुंदर केशरी रंग तयार होतो. पळसामुळे त्वचेला जंतूसंसर्ग होत नाही. त्वचा नितळ राहाते. झेंडूची फुले वाळवून पाण्यात भिजवून उकळली की सुंदर पिवळ्या रंगाचे पाणी मिळते.

अशा नैसर्गिक रंगांचा वापर करून खेळलेली रंगपंचमी लहान-मोठ्यांना निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जाते.

वसंत ऋतूमध्ये येणारे सण-उत्सव आपल्याला हीच शिकवण देत असतात. आपल्या शरीराचे वाढणारे तापमान स्थिर ठेवण्यासाठी महाशिवरात्रीनंतर उसाचा रंग पिण्याचा रिवाज आहे. गुढीपाडव्याला प्रथम कोवळे कडुनिंबाचे पान खाणे. होळीला पुरणपोळीचा आस्वाद घेणे, ही सगळी हवामानातील बदलांवर आधारित पदार्थांची रेलचेल आपल्या आयुर्वेदात सांगितली आहे.

चला तर मग, या वसंत ऋतूचे स्वागत करू या आणि निसर्गाचा समतोल राखण्याचा संस्कार नव्या पिढीवर रुजवू या.

  • हर्षाली अवसरे, (शिक्षिका) न्या. रानडे बालक मंदिर