जेव्हा मनुष्याचा पूर्ण जैविक विकास झाला व तो टोळ्यांमध्ये भटकंती करायला लागला तेव्हा त्याला संवादाची आवश्यकता वाटू लागली. हातवारे, ओरडणे यांच्या माध्यमातून संवाद कलेचा विकास झाला. कंठातून येणारे वेगवेगळे स्वर त्याने एकमेकांत गुंफून संवादाची पद्धती त्याने निर्माण केली. कंठातून येणाऱ्या स्वरातून तो स्वत:च्या भावना व्यक्त करु लागला. पहाटेच्या पवित्र वेळी आपल्या पुर्वजांनी सप्तसिंधुंच्या किनाऱ्यावर सकाळ - संध्याकाळ चिरंजीव अशा वेदांची रचना केली......... त्या पाठ करुन पिढ्यानपिढ्या जतन केल्या. काही दिवसांनी त्या लिपीबद्ध पण केल्या गेल्या.

 

   भाषा भौगोलिक परिस्थितीचा वारसा सुद्धा जपतात. कोकणातल्या हिरव्यागार व घनदाट प्रदेशात देशातून खाली उतरलो की गोड व मधुर स्वर आपल्या कानी पडू लागतात; जणु काही रसाळ फणसच जीभेवरुन रेंगाळत कानात उतरावा. तेथल्या अथांग सिंधू सागराची ह्रृदय स्पंदने गोड वाणीतील गंभीरता सांगून जातात. हेच पुन्हा देशावर आलो की राजेशाही रांगडेपणा भाषेत जाणवायला लागतो. छत्रपती शिवरायांची कर्मभूमीच ही. मग हा रांगडेपणा व दरारा सह्याद्रीच्या प्रकृती प्रमाणेच असणार; अजस्त्र, उंच, चारित्र्यवान व समोरच्याला आदराने मान झुकवायला लावणारा. मराठवाड्यात व खानदेशात आलो की तिखट ठसका लावणारा आपुलकीचा स्वर कानास पडतो, ज्याच्या जिभेला खान्देशी भाषेची चटक लागेल तो विदेशी संस्कृती अंगीकारेलच कसा..? निव्वळ अस्सल देशी म्हणजे खान्देशी. विदर्भात आलो की तेथे मिळणाऱ्या गोड संत्र्यांसारखी व रुचकर ढेमश्याच्या भाजी सारखी मराठी आपल्याला ऐकू येऊ लागते. सगळ्यांना सामावून घेणारी.

 

       भाषा ही प्रवाही तर असतेच, समरस सुद्धा असते. ज्या भाषेत समरस होण्याची शक्ती नसते ती भाषा नष्ट होते. या जगाच्या पाठीवर अनेक संस्कृती नांदत असतात. प्रत्येक संस्कृती व राष्ट्राची भाषा वेगळी पण दोन भाषा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यातील शब्द भांडार सुद्धा वाढते. एक-अनेक शब्द दुसरी भाषा स्वीकारते. एक ब्रिटिश अधिकारी माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन त्याच्या मायदेशी भारतातील प्रशासकीय सेवा संपवून गेल्या नंतर तेथे मराठी भाषकांप्रमाणे शेती करायला लागतो व सरकारी इंग्रजी पत्र लेखनात मराठी शब्द वापरत तो स्वत:ला मी एक गरीब मराठा शेतकरी आहे असे म्हणतो. केवढा हा भाषेचा प्रभाव. महाराष्ट्र हा अनेक संस्कृती व राजवटी अनुभवलेला प्रदेश. येथे मराठी समृद्ध झाली तिच्यावर संस्कृत, इंग्रजी, फारसी, अरबी, हिब्रू, पोर्तुगीज, तमिळ, गुजराती, कन्नड अशा सर्व भाषांचा प्रभाव पडला व तिचा शब्दकोश आणखी समृद्ध झाला. तसाच मराठीचा प्रभाव इतर भाषांवर पडला. 

 

   मुंबईत राहाणारे ज्यु जेव्हा मायदेशी इज्राईल ला जातात; तेव्हा ‘मायमराठी’ नावाचे नियतकालिक काढतात. महानुभव पंथाचे अनुयायी व संत मराठी अभिमानाने मिरवतात व आजपासून अडीच हजार वर्षे जुने शिलालेख सातवाहन राजांची मराठी भाषेविषयी असणारी निष्ठा व्यक्त करतात.

 

   संत गोरा कुंभार काव्य करताना त्यांच्या व्यवहारातील शब्द वापरत भाषा समृद्ध करतात तर सावता माळी कांदा-मुळा-भाजी करत देवाच्या भक्तीचा महिमा सांगत रोजच्या शब्दांतून अमृतमय काव्य रचतात. संत रामदासांच्या भाषेतून व्यवस्थापनाची सुत्रे गवसतात तर संत तुकारामांचे काव्य डोळस विठ्ठल भक्तीत तल्लीन करते. वीर सावरकरांच्या शब्दांतून तेजस्वी राष्ट्रप्रेम अवतरते.

 

     भाषा हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते कुणाच्याही बंधनात राहत नाही. पण व्याकरणाचे नियम काटेकोरपणे पालन करीत स्वेच्छेने जगायचे कसे ते शिकवते.... आई.... मातृभूमी... मातृभाषा... या तीन माता मानवाच्या आद्यगुरु होत.

~ वन्दे मातरम्

 

लेखक :- श्रीकांत देवेंद्र जोशी

शिक्षक , डी इ एस प्रायमरी स्कूल, टिळक रोड, पुणे