मी मलाला
दिंनाक: 06 Mar 2020 12:32:05 |
निसर्ग सौंदर्याचं लेणं लाभलेल्या स्वात खोर्याचा तालिबानने ताबा घेतला. तेव्हा एका मुलीनं आवाज उठवला. ती मुलगी म्हणजे - मलाला युसुफझई. तिने तिच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढा द्यायचं ठरवलं.
पण, मंगळवार दिनांक 9 ऑक्टोबर, 2012 रोजी तिला याची किंमत मोजावी लागली. शाळेतून बसने घरी परतत असतांना वाटेत तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि एकाएकी तिचं आयुष्य जीवन-मरणाच्या खोल दरीत लोटलं गेलं. पण या हल्ल्यातून ती आश्चर्यकारकरित्या वाचली. आणि तिच्या ध्येयासाठी त्याच निर्धाराने कार्य करत राहिली.
ही आहे मलालाची चित्तथरारक कहाणी. एक कोवळा आवाजसुद्धा परिवर्तनाची पहाट जागवू शकतो याची साक्ष देणारी!
नोबेल शांतता पुरस्कार मिळालेल्या वयाने सर्वांत लहान मुलीचे हे आत्मकथन आपल्याला खिळवून ठेवते. तिचा धीरोदात्त प्रवास आणि मातृभूमीच्या उद्धारासाठीची तळमळ आपल्याला आपल्या खुजेपणाची जाणीव करून देतो. तालिबानी या धर्मांध आणि कट्टर संघटनेने तेथील स्त्रिया, मुलींवर घातलेली बंधने व त्यांच्या शिक्षा देण्याच्या पद्धती वाचताना आपण धर्मनिरपेक्ष भारतातील नागरिक असल्याने सुरक्षित असल्याची खात्री वाटते.
तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, मिळवा हे पुस्तक आणि जरुर वाचा. आपली प्रतिक्रिया शिक्षणविवेकला जरूर कळवा.
पुस्तकाचे नाव : मी मलाला
लेखिका : मलाला युसुफझई
सहलेखिका : क्रिस्टीना लॅम्ब
अनुवाद : सुप्रिया वकील
- स्वाती गराडे, सहशिक्षिका
म.ए.सो. कै.दा.शं.रेणावीकर विद्या मंदिर