पालक व बालक

दिंनाक: 27 Mar 2020 22:41:33


1) मुलांशी भरपूर गप्पा मारा. त्यांना इसापनीतीच्या, परीकथेतल्या गोष्टी सांगा.वैतागू नका. ती तुमचीच जबाबदारी आहे.
2)रोज एका प्राण्या किंवा पक्षाबद्दल माहिती वाचून चित्रांसह त्यांना दाखवा. हे वाचन केल्यासारखं न करता दिवसभरात येता जाता एक एक fact उदाहरणासह सांगा.
3)मुलांना स्वच्छतेच्या योग्य सवयी आपण लावतोच पण रोज शाळेची घाई असताना अंघोळ घाईत उरकली जाते. आपल्या शरीराची योग्य स्वच्छता अगदी दात घासण्यापासून कशी करायची हे हळूहळू स्वतःहुन करायला शिकवा.
4)मुलांना काय खेळावं हा प्रश्न सतत छळतो. घरात असलेल्या खेळण्यातून लहान मोठे चेंडू निवडा घरातल्या घरात कसे खेळता येतील ते शिकवा. वेळ भरपूर आहे जागा असेल तर त्यांच्यासोबत खेळा.
5)घरातल्या खाण्याच्या वस्तू सोडल्या तर इतर काहीही वापरून काय बनवता येतंय ते बनवू द्या. पसारा केला. आवरावा लागेल म्हणून चिडचिड करू नका. चित्रं काढायला शिकवा, नवे नवे विषय द्या त्यांना सुचेल ते काढू द्या. मोठया मुलांना शिवणकाम शिकवा. कोलाज काम शिकवा. घरात उपलब्ध वस्तूत त्यांना जे काही उपक्रम करता येतील ते दाखवा.
6)बाल्कनी असेल आणि झाडे असतील तर झाडांना पाणी घालायचं काम त्यांना द्या. तिथे कोवळया उन्हात काही काळ बसू द्या.झाडे सजीव आहेत आपले मित्र आहेत हि भावना मनात रुजवा.
7)कणकेपेक्षा चांगला पर्याय नाही. मुलांना फारच कंटाळा आला तर त्यांना वेगवेगळ्या आकाराच्या पोळ्या लाटू द्या. पूर्ण भाजलेली कोणतीही पोळी आपण खाऊ शकतो.
8)गाणी ऐका. मुलांना नाचायला शिकवा. नाचत असतील तर त्यांच्या सोबत तुम्हीही हलक्या पावलांनी ठेका धरू शकता. जबरदस्ती नको आणि शिकवणीही नको.
9)मुलांना मोबाईल आणि tv वरच्या कार्टून मध्ये गुंतवून न ठेवता जग, जगाचा भारताचा इतिहास एखादी विशेष घटना याबाबत जरूर सांगा ती लक्ष देऊन ऐकतात. गरज असेल तर त्यासंदर्भात व्हिडीओ दाखवा त्यांचे कुतूहल जागृत करा.
10)मुलं मोठी असतील तर एखाद्या घटने बाबत आवश्यक पुस्तके वाचायला द्या. पण भारंभार पुस्तके सरळसरळ लादण्यापेक्षा त्यांच्याशी आधी त्याबाबत नक्की बोला. कुतूहल जागृत झाले कि मुलं आपोआप आवडीने सगळ्या गोष्टी करतात.
11)विज्ञानातील छोटे छोटे concepts समजावून सांगा. प्रयोग शक्य असतील तर ते दाखवा. त्यांना स्वतः करायला सांगा. वेळेचा सदुपयोग करा यातून मुलांना प्रयोग करण्याची, निरीक्षण करण्याची, निष्कर्ष काढण्याची सवय लागते.
12)गाणी ऐकणं आणि गाणं हा उत्तम स्ट्रेस बस्टर आहे. सिनेजगतातल्या गंमती जमती सांगा. आपलीकडे असलेले बालपणीचे किस्से त्यांना ऐकवा. जुने खेळ शिकवा. बैठे खेळ खेळा.
13)आपलीकडे वेळच वेळ आहे. उद्या मुलांना कशाबद्दल सांगायचे आहे याची आदल्या दिवशी थोडीशी तयारी करा. या वयात कामं नसली कि आपण मनोरंजन म्हणून इंटरनेटकडे, मोबाईलकडे वळतो. मुलांना 12-15 तास तो पर्याय देऊ नका. त्यांचा वेळ घालवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधा.
14)मुलांना भरपूर झोपू द्या. आपल्यासोबत छोटे छोटे व्यायाम शिकवा. एक दोन तास त्यांचे आवडते कार्टून देखील बघू द्या 😊
15) चांगले अन्न कोणते? काय खावं काय खाऊ नये हे वयोगटानुसार कथेतून सांगा. मॅग्गीची, मैद्याची, बेकरीची पाकीट रिकामी करू नका. मुलांना त्यात न खाण्या सारखं काय काय आहे तेही सांगा. सगळंच डोक्यावरून जात नाही. भाषा सौम्य आणि सोपी असावी
शाळा, मित्र आणि मैदान सारे बंद असल्यामुळे त्यांची मानसिकता बिघडते. त्यांची काळजी घेण्यासाठी तुमचा थोडा वेळ त्यांना नक्की द्या.


-----डॉ. प्रेरणा पारवे - सिंह