गुढी-पाडवा

दिंनाक: 25 Mar 2020 08:55:51


भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. यंदाचा हा पाडवा अनेक अर्थांनी वेगळा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या (गडू) बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते. ती विजयाचा संदेशही देत असते. याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. म्हणून याला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच. भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळविण्याची प्रतिज्ञा करायची. आपल्या मनातील चंचल, स्वार्थी वृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षारंभापासून आपले मन शांत, स्थिर व सात्विक बनविण्यासाठी प्रयत्न करावे हाच खरा विजय !!!
संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरवतात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात (पुन्हा धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे) व त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात. होळीपासूनच हार-कडे देवाणघेवाण सुरू होते.

या प्रथांमुळे निसर्गातील, ऋतूबदल आपल्या आयुष्यात अतिशय कल्पकतेने होतात. आहार-विहार व दैनंदिन जगण्यातही. उन्हाळा तीव्र होणार असतो म्हणून आपल्या शरीरालाही याचा त्रास होऊ नये म्हणून आपण काही बदल करतो. उदाहरणार्थ डोक्यावर टोपी, रुमाल स्कार्फ बांधणे, थंड पाणी पिणे, हलका आहार घेणे वगैरे.
मुलांनाही झळवणी घालतात. म्हणजे उन्हात पाणी ठेवून त्या पाण्याने अंगाला उकडलेल्या कैरीचा गर लावून मुलांना अंघोळी घालतात याचाच अर्थ लहानथोरांच्या जीवन शैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून निसर्गाच्या जास्तीतजास्त जवळ जाण्याचाच मार्ग आपल्या परंपरेत आहे. या सर्व परंपरांतून लहानपणापासूनच आपण निसर्गाच्या जास्तीतजास्त जवळ जाण्यास शिकतो. पूर्वी आपले जीवनमान निसर्गाच्या लहरींवर त्याच्या उष्ण, शीत बदलांवर अवलंबून होते त्यामुळे आपल्या प्रत्येक सणांतले बदल हे निसर्गाच्या बदलानुसार होतात जसे, संक्रांतीची गुळाची पोळी तिळगुळाची वडी, चैत्रात कैरीचे गूळ घालून केलेले पन्हे कैर्‍या तेव्हाच येतात. कडुनिंबाच्या कोवळ्या पानाची हिंग-मिरे घालून केलेली चटणी वर्षाच्या सुरुवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असेच तर सांगतात.
आपली संस्कृती थोर आहे. निसर्ग, प्राणी व समस्त सजीवांची काळजी घेणारी आहे. पर्यावरणपूरक आहे. आपल्या प्रथा, परंपरा, चालीरीती विचारपूर्वक साकारलेल्या आहेत. आज संपूर्ण जगात त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहे.
हे सगळे छान असले तरी आज भारतभर सगळीकडे कोरोंना व्हायरसचा प्रादुर्भाव होत असताना खरं तर कोणाचीही सण साजरा करण्याची मन:स्थिती नाही. केवळ परंपरा म्हणून हा दिवस साधेपणाने साजरा करायचा आहे. पण या निमित्ताने आपण आपल्या सामाजिक जीवनात कसे वागतो हे आपण पाहायला हवे. या वर्षारंभी स्वतलाच तपासून पाहायला हवे. चुकतोय का आपण? आतला आवाज होय असेच सांगतोय. गुढीपाडवा ही एक उत्तम संधी आहे. अगदी साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त!!! चला तर मग आपण या दिवशी निश्चय करू या की मी सध्या घरातच राहीन व सुरक्षित राहीन. यापुढे घराबाहेर जबाबदारीने वागेन. सामाजिक स्वच्छता, वाहतुकीचे नियम, आरोग्यदायी सवयी, निसर्गाचे संवर्धन यांचे समाजाच्या काळजीपोटी पालन करेन.
आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
                                                                       स्वाती यादव.
                                                                     ९६७३९९८६००