माणसाने माणसाशी माणसा सम वागणे,

हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे।

ही प्रार्थना आम्ही रोज म्हणतो, परंतु ही प्रार्थना आम्ही  आचरणात आणतो का? ही प्रार्थना आम्ही वास्तवात आमलात आणतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न जर आपण केला; तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच असणार आहे. कारण जर माणूस माणसाशी माणसासम वागला असता तर समाजात माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटना घडल्या नसत्या. आपण राष्ट्र घडणीच्या, समाज सुधारणेच्या मोठमोठ्या वल्गना करतो, परंतु समाजसुधारणेची खरी सुरुवात ही आपण आपल्या घरापासून केली पाहिजे. मातृ-पितृ देवो भव या संस्कृतीत वाढणारी आम्ही माणसं; पण आम्हाला या सर्वांचा विसर पडत चालला आहे. माणूस आज माणुसकी हरवत चालला आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीचं महत्त्व सांगणारी आम्ही आणि आम्हालाच या सर्वांचा विसर पडत चालला आहे. आम्ही जर संस्कृती व संस्कारांचं जतन केलं असतं, आणि साधा एक माणुसकीचा धागा पकडला असता तर आज आमच्या घरातील आजी-आजोबा आम्हाला वृद्धाश्रमात दिसले नसते. हीच तर खरी समाजाची शोकांतिका आहे.

 मनाला चांगले वळण लागावे म्हणून आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. हल्ली तर विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी व दिवाळी सुट्टीत अश्या संस्कारक्षम शिबिराचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी दिलेली शिकवण, संतांचे आचार-विचार यांचे आज आम्हाला दुर्दैवाने विस्मरण होत आहे.  गाव ते जग या स्तरावर जरी माणूस माणसाला भेटत असला तरी खरी परिस्थिती काय आहे? माणसातलं माणूसपण संपत आहे. मायेचा ओलावा, आस्था, प्रेम, सहानुभूती आपल्याला कुठेच दिसून येत नाही. माणसे आज भावनारहित होताना दिसतात.

आज आम्ही २१व्या शतकात वावरत असलो तरीसुद्धा माणूस माणसात भेद करताना दिसून येतो. आज समाजातील ही परिस्थिती बदलणे काळाची गरज आहे. माणसाची मनं बोथट होत चालली आहेत. या सगळ्यांना बर्‍यापैकी कारणीभूत व्हाट्सअप, फेसबुक यासारखे सोशल मीडिया आहेत. कुठेतरी दुर्दैवी अपघात घडलेला असतो. अशा प्रसंगी आम्ही अपघातग्रस्तांना मदतीचा हात द्यायचा सोडून शूटींग, सेल्फी काढण्यात मग्न असतो. अशा वेळी अनेक लोक मृत्युमुखी पडतात आणि आम्ही मात्र बघ्याची भूमिका घेत असतो. आमच्या या वेळी तत्परतेने केलेल्या मदतीमुळे कोणाचा तरी प्राण वाचू शकतो. याचा तर आम्हाला विसरच पडतो.

कुष्ठरोग्यांच्या चेहर्‍यावरील हसू पुन्हा परत आणण्यासाठी त्यांना सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगता यावं, यासाठी ‘आनंदवन’ प्रकल्प उभा करून खरी माणुसकी जपणारे समाजसेवक कै. बाबा आमटे, प्रकाश आमटे, अनाथांची आई सिंधुताई सपकाळ, बीड जिल्ह्यातील सुपुत्र ओमप्रकाश शेटे आणि ते ग्रामीण भागातील शेतकरी गोरगरिबांना देत असलेली वैद्यकीय सेवा, अनसरवाडा येथे डोंबारी समाजासाठी काम करणारे नरसिंग झरे यांच्या कार्याची आठवण झाली की असे वाटते, ह्या समाजातील महान कार्य करणार्‍या आदर्श व्यक्तींचा आदर्श आपणही घ्यावा. समाजातील गरीब, दुर्बल घटकासाठी आयुष्य खर्ची करावे. त्यांच्यातच परमेश्वर पाहावा. असा हा एक विचार जरी आपल्या मनात आला तर हेच खरे माणसाचे माणसाशी माणसासम वागणे होईल.

- सुनंदा गणपतराव खांडेकर, सहशिक्षिका

श्री सिद्धेश्वर मा.विद्यालय, माजलगाव