पाडस

दिंनाक: 17 Mar 2020 12:57:03


 

काय वाचाल ???

मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या ‘द इयरलिंग’  या कादंबरीचा  मराठी अनुवाद म्हणजे ‘पाडस’. द इयरलिंग ही केवळ अमेरिकनच नव्हे, तर जागतिक कादंबरी वाङ्मयातील एक महत्त्वाची कादंबरी मानली जाते.

अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील अफाट जंगलात सुमारे 100 वर्षांपूर्वीचा काळ. थोडेसे रान तोडून तयार केलेल्या शेतीवाडीत जिवापाड कष्ट करून कशीबशी गुजराण करणारे बॅक्स्टर कुटुंब. आई, बाप आणि 12 वर्षांचा कोवळा ज्योडी.

हिंस्त्र श्वापदांनी वेढलेल्या त्या वाडीच्या भोवती काही मैलांच्या घेरात लोकवस्ती नाही. तिथल्या एकाकी जीवनाची गाठ सदैव निसर्गाची पडलेली. त्याच्याशी झगडायचे आणि सलोखाही त्याच्याशीच.

या परिसरात एकटेपणाने वाढणार्‍या ज्योडीला जिवाभावाच्या मैत्रीची अनिवार तहान लागलेली असते. त्याला हरणाचे एक पोरके पाडस मिळते आणि त्या स्नेह्बंधात तो तृप्तीने डुंबून जातो. पण निसर्गक्रम अटळ असतो.  ज्योडीच्या बालबुद्धीने त्या स्नेह्बंधातून उभारलेल्या रम्य जगाच्या ठिकर्‍या उडतात. त्यातून ज्योडीचे बालपण संपते आणि तो नव्याच सुजाण आणि प्रौढ वृत्तीने जीवनाचा स्वीकार करतो.

बॅक्स्टर कुटुंबाच्या दैनंदिन जीवनाचा पाडसमधील चित्रपट संथपणे डोळ्यापुढे उलगडत जाताना आपल्याला अनेकदा मराठी ग्रामजीवनातील निसर्गसौंदर्य रोमांचकारी प्रसंग, विनोदी घटना प्रवृत्ती परंपरागत समजुती आणि या सगळ्याला व्यापून उरणारे अशिक्षित, अ-नागर शहाणपण जाणवते.

ज्योडी आणि त्याचा बाप पेनी याच्यातील वात्सल्यपूर्ण जिव्हाळा मन हेलावून टाकतो.

आधुनिक यंत्रयुगीन शहरवासियांना दुर्मिळ झालेली निसर्गाची गूढ, प्रसन्न व भीषण रूपे आणि ऋतुचक्राच्या संथ पण अखंड लयीचे भान हे पुस्तक वाचताना मनात रुंजी घालत राहते.

मार्जोरी रॉलिंग्ज या वॉशिंग्टनच्या विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या पदवीधर. काही वर्षे वृत्तपत्र व्यवसायात घालविल्यावर त्या फ्लॉरिडामध्ये स्थायिक झाल्या. तिथल्याच दोन म्हातार्‍या शिकारी मित्रांनी सांगितलेल्या गोष्टींमधून ‘द इयरलिंग’चा जन्म झाला.

अत्यंत औत्सुक्यपूर्ण आणि मनोवेधक असे हे पाडस हातात घेतल्यावर पूर्ण केल्याशिवाय खाली ठेववतच नाही.

तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, वाट कसली बघताय? सुट्टीत हे पुस्तक नक्की वाचा आणि वाचल्यानंतर आपली प्रतिक्रिया शिक्षणविवेकला जरूर कळवा.

द इयरलिंग

मार्जोरी किनन रॉलिंग्ज

अनुवाद - राम पटवर्धन

- स्वाती गराडे (सहशिक्षिका)

  कै.दा.शं.रेणावीकर विद्यामंदिर