एकनाथ षष्ठी

दिंनाक: 14 Mar 2020 10:38:16

 

 


मानवी जीवनात मानसिक शांतीला, समाधानाला अत्यंत महत्त्व आहे. भौतिक सुखांच्या उपलब्धतेनंतरही आपणास आयुष्यात काहीतरी उणीव जाणवते. याचे कारण म्हणजे मानसिक शांतीचा अभाव. आपले अवघे आयुष्य तणावपूर्ण झालेले आहे. या तणावातून बाहेर येऊन आयुष्याचा नेमका अर्थ काय आहे, आपणास काय हवे आहे हे शांतपणे समजून घेण्यासाठी जो  निवांतपणा लागतो तोच नाहीसा झाला आहे. त्यामुळे समाजात अनेक समस्या निर्माण झालेल्या जाणवतात. अशा वेळी आपल्या मदतीला येते अध्यात्म. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. निर्गुण, निराकार अशा परमतत्त्वाचा साक्षात्कार जो शिष्याला करून देतो, तोच संत होय. जो शास्त्राचे उत्तम अध्ययन करतो, त्याप्रमाणे स्वतः आचरण करतो आणि शिष्यांना त्याचा उपदेश करून त्यांनाही आचरणाला प्रवृत्त करतो, त्यालाच संत असे म्हणतात. असे संत म्हणजेच एकनाथ महाराज.

 

नाथांचे वडील सूर्यनारायण, आजोबा चक्रपाणी! नाथांचा सांभाळ या आजोबांनीच केला. नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाल्यामुळे त्यांच्या नशिबी पितृसुख नव्हते, वडिलांचे छत्र ढळल्यावर आजी  आजोबांनीच नाथांवर संस्कार केले. नाथांचे पणजोबा म्हणजे संत भानुदास हे स्वतः वारकरी होते.

त्यांच्या घराण्यातच भक्तीपरंपरा असल्याने भक्ती त्यांच्या मनात रुजली होती. जनार्दन स्वामींनी नाथांची सेवावृत्ती पाहून आपले शिष्य म्हणून स्वीकारले.

संत एकनाथांनी भारुडे जोगवा गवळणी गोंधळ यांच्या साहाय्याने समाजजागृती केली.  संत एकनाथ हे संतकवी होते. एका जनार्दनी  ही त्यांची नाममुद्रा आहे. एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. एकादश स्कंदात १३६७ श्लोक आहेत, पण यावर भाष्य करताना  नाथांनी १८८१० ओव्या लिहिल्या आहेत.

भावार्थ रामायण हा  सुमारे ४० हजार ओव्यांचा ग्रंथ एकनाथांनी लिहिला आहे. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांचेच. नाथांची दत्ताची आरतीही प्रसिद्ध आहे. संत एकनाथ महाराजांचे  सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध  केली. 

 

एकदा नाथ गोदावरीवरून स्नान करून येत होते. एक यवन त्यांच्यावर थुंकला. नाथांनी परत जाऊन अंघोळ केली. तो परत थुंकला, असे नाथांनी त्या दिवशी एकशेआठ वेळा स्नान केले. शेवटी यवन थकला. नाथांनी क्षमा मागून त्याला नाथ म्हणाले, 'वेड्या, मी तुझा आभारी आहे. तुझ्यामुळे मला आज एकशेआठ वेळा गोदावरी स्नान घडले.’ काय हा संयम!  आज आपल्याला हे अशक्यच वाटेल.

समाजाच्या सर्व थरात परमार्थ रुजावा यासाठी नाथांनी फार खटाटोप केला. नाथांचे समाजावर असे अपार उपकार आहेत म्हणून नाथषष्ठीचा उत्सव गावोगाव होतो.

एक दिवस नाथ मृत्यू पावले. लोकांना प्रश्न पडला की हे तर सर्वसामान्यांसारखे वारले.  हे कसे? मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक? मग नाथ ताटीवर उठून बसले आणि म्हणाले की मी  पुन्हा केंव्हातरी जाईन. मग त्यांनी फाल्गुन वद्य षष्ठी (शके १५३३ ते १५९९) हा दिवस नाथांनी जलसमाधीसाठी निश्चित केला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाथांनी लक्ष्मीतीर्थावर शेवटचे कीर्तन केले. कृष्णकमलतीर्थावर नाभीपर्यंत पाण्यात जाऊन आत्मा ब्रह्मांडात विलीन केला.  त्यांच्या पार्थिव देहावर हरिपंडितांच्या हस्ते अग्नी देण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी गरम राखेवर तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले. त्यावरच नाथपुत्र हरिपंडितांनी चरण पादुकांची स्थापना केली.

 

नाथांच्या आयुष्यात या षष्ठीला फार महत्त्व आहे. नाथषष्ठी म्हणजे फाल्गुन पक्षात येणारी षष्ठी तिथी एवढाच या षष्ठीचा अर्थ नाही तर एकनाथ महाराजांच्या जीवनात या सहा महत्त्वाच्या घटनांनी त्यांची त्यांच्या सद्‌गुरुशी झालेली एकरूपता जणू सिद्ध होते. परमार्थ सफल व्हावयाचा असेल तर सहा  गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. गुरू, शिष्य, सेवा, उपदेश, ज्ञान, कृतार्थता.  गुरू शिष्य एकरूप झाले म्हणजे गुरूचे गुरूपण संपते. शिष्याचे शिष्यपण संपते व दोघांचे एकाच तिथीला म्हणजे एकाच क्षणात निर्वाण होते.

प्रतिवर्षी एकनाथषष्ठी उत्सवास लाखो भाविक मनोभावे  नाथांच्या समाधीचे दर्शन घेतात. नव दाम्पत्याने लग्न झाल्यवर नाथसमाधीचे दर्शन घ्यावे अशी इकडे प्रथा आहे. नाथांसारखाच त्यांचा प्रपंच व परमार्थ दोन्ही सुखाचा होतो अशी श्रद्धा आहे.

नाथ षष्ठीमध्ये हे सहा योग एकत्र येतात. षष्ठी म्हणजे सहाचा समुदाय. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या षडरिपूंच्या समुदायाने आपल्याला अनाथ केले आहे, दीन केले आहे पण श्रीसंत एकनाथ महाराजांनी या सहांना जिंकले होते म्हणून ते नाथ झाले यालाच नाथषष्ठी म्हणतात.

 

स्वाती यादव

९६७३९९८६००