आज  यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस !!!  आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार!!!!!

यशवंतराव चव्हाणांचा जन्म १२  मार्च १९१४  रोजी सांगली जिल्ह्यातल्या देवराष्ट्र या अगदी हजार वस्तीच्या छोट्याशा खेडेगावात  झाला. यशवंतरावांचे वडील ते लहान असतानाच वारले. आई विठाबाई आणि भाऊ ज्ञानदेव यांनी मोठ्या कष्टाने घर चालवले.

यशवंतरावांनी खूप शिकावे अशी आईची इच्छा होती. यशवंतरावही अतिशय हुशार व मेहनती होते. यशवंतरावांचे बालपण विटा या गावी गेले. देवराष्ट्र येथे  प्राथमिक शिक्षण व पुढे कराड येथे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण झाले. शालेय जीवनापासूनच त्यांना वाचनाचे वेड  होते. वक्तृत्व स्पर्धेतही पारितोषिके पटकावली. भजन –कीर्तन संगीत यातही त्यांना रुची होती. ते व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्व देत. त्यामुळे तेजस्वी चेहरा व कणखर देहयष्टी त्यांनी कमावली होती.  

विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते अनेक चळवळींमध्ये भाग घेत होते. वयाच्या चौदाव्या वर्षीच मुंबई लेजिसलेटीव कौन्सिलच्या निवडणुकीत त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. शालेय वयातच वृत्तपत्रवाचनाची सवय जडल्याने अवतीभवती व देशांतर्गत घडणाऱ्या घडामोडीबद्दल घटनांबद्दल जागरूकता निर्माण झाली. नाटक कुसत्यांचे फड समाजकार्य यामुळेच दृढ मनोबल, निर्धार-शक्ती मुत्सद्देगिरी या गुणांची त्यांच्या व्यक्तिमत्वात रुजवण झाली. यामुळेच त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडत गेले.

त्या काळात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, लोकमान्य टिळक, ना. गोखले यांची भाषणे ऐकली.

विचारवंत, साहित्यिक यांच्याबद्दल त्यांना आकर्षण वाटू लागले.  २६ जानेवारीला कराडच्या हायस्कूलमध्ये झेंडा फडकवून वंदे मातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना अटक झाली व तुरुंगवास सोसावा लागला. या तुरुंगवासातच त्यांना आचार्य भागवत रावसाहेब पटवर्धन, एस.एम.जोशी, ह.रां. महाजनी अशा थोरांचा सहवास लाभला. राजकीय विचारसरणीचे दृष्टिकोन  अभ्यासता आले. व्यापक विचारविश्व घडले.

कोल्हापुरातील राजाराम कॅालेजात नामवंत साहित्यिक ना.सी. फडके यांच्यासारखे प्राध्यापक त्यांना लाभले. १९४० मध्ये बी.ए., एल.एल.बी. या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी १९४२ मध्ये स्वातंत्र्यचळवळीच्या लढ्यात उडी घेतली.

१९४६ साली देशात सर्वत्र निवडणुकांचे वारे वाहू लागले. यशवंतराव विजयी झाले. पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून त्यांची निवड झाली. १९५२ साली ते पुन्हा निवडून आले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना यात त्यांची अनन्यसाधारण महत्त्वाची भूमिका आहे. शेती व सहकारी साखर कारखान्यांचे, जलसिंचन योजनांचे मजबूत पायाभरणीचे कार्य त्यांनी केले. समाजातील विविध घटकांना व विभागांना न्याय देत राज्य एकजिनसी व प्रगतिपथावर नेण्याचे कार्य त्यांनी केले. पानशेतची पुराची आपत्ती कोसळली, तेंव्हा त्यांनी अमलात आणलेली पद्धत आजही वस्तूपाठ ठरावी अशीच आहे.

१९६१ साली चीनी आक्रमणानंतर संरक्षण विभागाची नव्याने घडी बसवण्यासाठी पं. नेहरूंनी यशवंतरावांना संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला बोलावून घेतले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री व परराष्ट्रमंत्री अशी अनेक मानाची पदे भूषवली. केवळ राष्ट्राचे हित लाक्षात घेऊन त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. एक राजकारणी म्हणून त्यांचे कार्य जितके महान आहे तितकेच ते साहित्यिक म्हणूनही महान होते. ललित, आत्मपरलेखन, चरित्रात्मक, व्यक्तिचित्रणपर आठवणी, प्रवासवर्णन, स्फुट, वैचारिक, समिक्षात्मक, पत्रात्मक, भाषणे इत्यादी स्वरूपातील त्यांचे लेखन त्यांच्यातील साहित्यिकाचे दर्शन घडवते. कृष्णाकाठ , ऋणानुबंध, युगांतर, भूमिका, शिवनेरीच्या नौबती, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे अशी त्यांची साहित्य संपदा आहे. यातून त्यांच्यामधील चिंतनशील, रसिक व सामाजिक विचारवंताचे दर्शन घडते. परदेशातील वास्तव्यात त्यांनी ग्रंथालयांना भेटी दिल्या. उत्तम पुस्तके विकत घेतली. तेथील अनुभव पत्ररूपाने लिहून ठेवले.

त्यांची पत्नी वेणूताई गेल्यानंतर एकाकी अवस्थेत त्यांना मृत्यू आला. त्यांची अखेर दुर्दैवी ठरली. त्यांच्यानंतर त्यांचे हयातीत मागे ठेवलेली रक्कम होती फक्त छत्तीस  हजार रुपये!!! स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा कर्तृत्वाच्या बळावर लोकमान्यांच्या नंतरचा महान नेता बनला हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही असे द्वादशीवार यांनी लिहून ठेवले आहे. ज्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही असा एक ग्रामीण युवक आपल्या गुणांच्या मेहनतीच्या जोरावर  एक मनमिळावू सुसंस्कृत तत्त्वनिष्ठ राजकारणी व विचारवंत बनू शकतो यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचे जीवन होय.

त्यांची कार्यास महाराष्ट्राचा मनाचा मुजरा व स्मृतीस अभिवादन!!!!!!!!

स्वाती यादव.

9673998600