गरमगरम खिचडी

दिंनाक: 03 Feb 2020 15:12:36


‘‘पण मला माझी शाळा सोडून कुठेही जायचं नाही...’’, वीणा रडत रडत म्हणत होती.

‘‘मलाही माझी शाळा, माझे मित्र सोडून दुसरीकडे कुठेही मुळीच जायचं नाही ...’’, न रडता पण ठाम आवाजात सुदीपनेही सांगितलं. सुदीप आता आठवीला आणि वीणा तिसरीला जाणार होती.

सुदीप आणि वीणाचे बाबा सरकारी दवाखान्यातले मोठे डॉक्टर होते. पोटाची अवघड ऑपरेशन्स करण्यात त्यांचा हातखंडा होता. नुकतीच त्यांची छत्तीसगडच्या बस्तर या आदिवासी भागात बदली झाल्याची बातमी आली होती.

सुदीप आणि वीणा हे दोघेही आपली शाळा, मित्र आणि आपलं शहर सोडून कुठेही जायला तयार नव्हते. त्यांचं शहर म्हणजे, समुद्रकिनारी वसलेलं, सुंदर रस्ते, मोठं क्रिकेट स्टेडियम, हिरव्यागार टेकड्या यांनी नटलेलं विशाखापट्टणम. आंध्र प्रदेशमधलं एक महत्त्वाचं शहर आणि बंदर.

आई-बाबा त्यांना समजवायचा खूप प्रयत्न करत होते. शेवटी असा मार्ग निघाला की, एक वर्ष तिथे राहून पाहू. जर वर्षाच्या शेवटी जर असं लक्षात आलं की तिथे राहणं काही मुलांना मानवत नाही, तर आई मुलांना घेऊन विशाखापट्टणमला परत जाईल आणि बाबा पुढची 3 वर्ष बस्तरलाच राहतील आणि अध्येमध्ये येऊन भेटतील. मुलांनी तडजोड कशीबशी मान्य केली आणि एक दिवस सगळे बस्तरला येऊन पोहोचले.

सगळं कुटुंब आता बस्तरला आले होते.  कुरकुरत का असेना पण मुलं आता तिथल्या शाळेत जायला लागली.  बस्तरची गौंडी भाषा आणि इतर बोली या अजून मुलांना नीट समजत नव्हत्या. जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे मुलांना हळूहळू मित्र मिळाले. त्यांची भाषा थोडीफार समजू लागली. शाळेत सुदीप आणि वीणा यांच्यासारखी शहरातून आलेली मुलं फार कमी होती. बहुतेक मुलं स्थानिक आदिवासी पाड्यांवरची होती. त्यांचं राहणीमान, समजुती हे सारंच वेगळं होतं. बस्तरला येऊन सुमारे 6 महिने लोटले. हळूहळू मुलं आणि आई-बाबा सगळेच आपल्या नव्या जागी रुळले. बाबांना दवाखान्यातून फुरसत मिळत नसे. अनेकदा त्यांना भलत्या रात्री देखील उठून दवाखान्यात जावं लागत असे.

हळूहळू थंडीचे दिवस आले. वीणा आणि सुदीपचं घर उबदार राहावं म्हणून त्यात सोयी केलेल्या होत्या. शाळेत मात्र बरीच थंडी वाजायची. सुदीप आतापर्यंत अनेकदा आपल्या वर्गातल्या मित्रांच्या आदिवासी पाड्यांवर गेला होता. आपले वर्गमित्र किती प्रतिकूल परिस्थितीत राहतात याची त्याला जाणीव झाली होती. नुकतेच तो वीणाला घेऊन आपल्या मित्राच्या शंभूच्या घरी गेला होता. घर म्हणजे छोटीशी पत्र्याची झोपडी होती.

वीणाने त्यांची बरीच चित्रे काढली. शंभू आणि आजूबाजूच्या बहुतेक सगळ्या मित्रमैत्रिणींच्या झोपड्यांवर, गोठ्यांवर सुरेख आदिवासी चित्रे होती. काही घरात लाकडाची भांडी, मूर्ती होत्या. वीणाने त्यांचीही बरीच चित्रे काढली. तिचे सगळ्यांनी कौतुक केले.

संध्याकाळ झाली, तशी थंडी वाढली. सुदीप वीणाला घेऊन घरी निघाला. हातात कंदील घेऊन शंभू, जगन्नाथ आणि त्याची बहीण दुर्गा हे तिघे त्यांना सोडायला आले. ते सगळे सुदीप-वीणाच्या घराजवळ आले. बाजूलाच बाबांचा मोठा दवाखाना. तिथे एक मोठा ट्रक उभा होता. त्यातून बरंच काही सामान उतरवलं जात होतं. मुलं उत्सुकतेने थोडा वेळ बघत उभी राहिली. पुष्कळ मोठी खोकी, लाकडी कपाटं असं खूपसं सामान उतरवलं गेलं आणि ट्रक निघून गेला. मुलांची उत्सुकता पाहून सुदीप-वीणाच्या बाबांनी मुलांना जवळ बोलावलं.

‘‘बाबा, हे इतकं सामान काय आहे? ही मोठी खोकी कसली?’’, सुदीपने विचारलं.

‘‘अरे, ही सगळी ऑपरेशन करायला लागणारी नवीन उपकरणं आहेत. शिवाय औषधं आणि उपकरणं ठेवायला लागणारी कपाटं आहेत.’’, बाबांनी सांगितलं.                       

‘‘डॉक्टरकाका, या खोक्यांना असा पांढरा पुठ्ठा काहून लावलाय?’’, शंभूने विचारलं.

‘‘हा पुठ्ठा नाही रे, हे थर्माकोल आहे. रायपूरहून सामान आपल्यापर्यंत आलं ना. मग रस्त्यात खाचखळग्यातून ट्रक येताना सामानाची काही मोडतोड होऊ नये म्हणून हे सगळ्या बाजूंनी हे पॅकिंग घातलं आहे.’’

‘‘दुसर्‍या दिवशी सकाळी बाबांनी आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी उपकरणे खोक्यांमधून बाहेर काढून लावून घेतली. निघालेले थर्माकोल एका मोकळ्या कोपर्‍यात रचून ठेवलेले होते. दुपारी सुदीप आणि वीणाने शाळेतून घरी आल्यावर बाबांना मदत केली आणि मग ते खेळायला पळाले. कोपर्‍यातील थर्माकोलचा एक तुकडा घेऊन त्याचे साबुदाण्यासारखे गोल गोल मणी काढून ते वार्‍यावर उडवणे हा नवाच खेळ त्यांना मिळाला होता. थोड्या वेळाने आई बाहेर आली. मुलांचा हा उद्योग पाहून तिने मुलांना जवळ बोलावलं.

ती म्हणाली, ‘‘तुम्हांला या थर्माकोलचं वैशिष्ट्य माहीत आहे का?’’

‘‘हो.. कालच बाबानी सांगितलं की, त्याचा पॅकिंग म्हणून उपयोग होतो आणि त्याचे हे गोल मणी काढून उडवायला किती मजा येते ना आई...’’, वीणाने आनंदाने सांगितलं.     

‘‘हो, पण तुम्हांला त्याची बाकीची माहिती आहे का?’’

‘‘नाही...’’

‘‘ठीक आहे’’, मी सांगते.  असं म्हणून आईने त्यांना थर्माकोलची सविस्तर माहिती सांगितली.

‘‘थर्माकोल हे एक हायड्रोकार्बन प्रकारचं संयुग आहे. पॉलीस्टायरिन प्रकारचं हायड्रोकार्बन वापरून हे थर्माकोल बनवलं जातं. ते वजनाला एकदम हलकं असतं. मुख्य म्हणजे ते उष्णता आणि वीजरोधक आहे. या गुणांमुळे थर्माकोल पॅकिंगसाठी वापरलं जातं. पण त्याचा मोठा धोका असा की, जसं प्लास्टिक कुजून मातीत मिसळत नाही तसंच थर्माकोलपण कुजून जात नाही. त्याचं विघटन होत नाही आणि त्यामुळे ते जमिनीत हजारो वर्षे पडून राहते आणि जमीन नापीक करू शकते. शिवाय पाण्याच्या प्रवाहातही अडथळा बनू शकते. त्यामुळेच थर्माकोलचा अतिवापर टाळावा आणि आहे त्याचा पुनर्वापर करावा असं सगळीकडे सांगितलं जातं.’’ मुलं हे ऐकून चिंतेत पडली. आपल्याकडे तर इतकं थर्माकोल आलंय, त्याचं आता काय करावं याची त्यांना काळजी वाटू लागली. आपण थर्माकोलचे मणी काढून इकडे तिकडे उडवले हेही योग्य नाही असंही त्यांना वाटून गेलं.

रात्री जेवणाच्या वेळीसुद्धा त्यांची तीच चर्चा चालू होती. इतक्यात बाबांना तातडीचा निरोप आला आणि ते जेवण अर्धेच ठेवून इमर्जन्सी पेशंट बघायला गेले.

आई म्हणाली, ‘‘आता ऑपरेशन किती वेळ चालेल कुणास ठाऊक! तो पेशंट नीट बरा होऊ दे रे देवा... मला मात्र आज पुन्हा तुमच्या बाबांना रात्री उठून अन्न गरम करून द्यावं लागेल. हे अन्न गार होऊन जाईल...’’ 

हे ऐकून सुदीपच्या डोक्यात एक कल्पना चमकली. तो शाळेत उष्णतारोधक पदार्थ म्हणजे काय हे शिकला होता. ‘थर्माकोलही उष्णतारोधक आहे’, असं आई म्हणाली होती. तो जेवण आटोपून पटकन बाहेर जाऊन थर्माकोलचे  काही मोठे तुकडे घेऊन आला. आईच्या मदतीने त्याने उकळत्या पाण्याने काचेचे दोन कप भरले. एका कपाला बाहेरून थर्माकोलचे आवरण घातले आणि दुसरा तसाच ठेवला. दोन्ही मध्ये स्वच्छ केलेले थर्मामीटर्स (तापमापक) ठेवले. मग थोड्या थोड्या वेळाने त्याने आणि वीणाने दोन्ही कपांचे तापमान मोजले. एक तास असे मोजमाप घेतल्यावर लक्षात आले की साध्या कपातल्या पाण्यापेक्षा थर्माकोलचे आवरण घातलेल्या कपातले पाणी जास्त वेळ गरम राहिले होते.’’

मग सुदीपने आईच्या आणि वीणाच्या मदतीने बाकीच्या थर्माकोलपासून काही मोठे तुकडे कापून घेतले. दुसर्‍या दिवशी सकाळी आपल्या वर्गमित्रांसह त्याने ते सगळे तुकडे शाळेत नेले. आपल्या मित्रांना आणि  शिक्षकांना त्याने बेत सांगितला. त्यांनीही आनंदाने मान्यता दिली. मग काय, सगळा वर्गच कामाला लागला.

सगळ्या मुलांना शाळेत दुपारी जेवायला खिचडी आणि काही खाऊ दिला जात असे. ही खिचडी शिजून झाली कि ती दुसर्‍या भांड्यांमध्ये काढली जात असे. त्यातून ती मुलांना वाढायला सोपे होते. मात्र सगळी मुलं येऊन जेवायला बसेपर्यंत बराच वेळ जाई आणि खिचडी थंड होऊन जात असे. शिवाय हिवाळ्यात तर ती फार लवकर थंड होऊन जायची. मुलांचा  बेत असा होता की, भांड्यांना थर्माकोलचे आवरण बाहेरून घातल्याने ती खिचडी बराच वेळ गरम राहायला मदत होईल. थर्माकोल उष्णता इकडून तिकडे लवकर जाऊ देत नाही आणि त्यामुळे खिचडी थंड होण्याची क्रिया हळूहळू होईल आणि मुलांना गरमगरम खिचडी खायला मिळेल. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात जर गार पाण्याच्या भांड्यांना थर्माकोलचे आवरण बाहेरून घातले तर आतले पाणी बराच वेळ गार राहू शकेल. 

मग मुलांनी खिचडीची जी भांडी होती त्यांची मापे घेतली.  त्यानुसार थर्माकोलचे तुकडे जोडून आकार बनवले. भांड्यांना थर्माकोलचे आवरण बाहेरून लावले. 

मुलांची ही युक्ती सफल झाली. शाळेत केलेली खिचडी नेहेमीपेक्षा कितीतरी जास्त वेळ गरम राहिली आणि मुलांना ती खूप आवडली! शिक्षकांनी मुलांचं इतकं कौतुक केलं की त्या आनंदात मुलं चार घास जास्तच जेवली बहुतेक!

घरी आलेल्या थर्माकोलचं काय करावं हा आईबाबांना पडलेला प्रश्न छान सुटला आणि सगळ्या मुलांना शाळेत रोज गरम खिचडी खाण्याचा आनंदही मिळू लागला. एका वर्ष पूर्ण झाल्यावर, बस्तर सोडून जायचं का असं बाबांनी विचारल्यावर फक्त वीणा आणि सुदीपच नव्हे तर सगळ्या वर्गमित्रांनी, शिक्षकांनी, गावकर्‍यांनी सुद्धा मोठा नकार दिला!

तुम्ही कधी थर्माकोलच्या खोक्यात ठेवलेले आईस्क्रीमचे डबे, गार पाण्याच्या बाटल्या पाहिल्या आहेत का? सुदीपने केलेला प्रयोग करून बघितला आहे का? मला नक्की कळवा.

- अपर्णा जोशी