लाडक्या तरुण मित्रांनो, मला दोन मुली प्राजक्ता आणि निशिगंधा. प्राजक्ताला बारावीला नव्याण्णव टक्के गुण पिसीएम नि पिसीबीला होते कोठेही प्रवेश. पण ती डॉक्टर झाली. तिच्या आवडीप्रमाणे. निशू बारावीला नाटक, मालिका यात व्यग्र होती. कलाशाखेला होती. बारावीला बोर्डात तिसरी. दोघी मुली तैल बुद्धीच्या होत्या. पण प्राजक्ता पद्धतशीर अभ्यास करी. वर्षभर वेळापत्रक करून त्यामुळे परीक्षेला थोडाही मानसिक ताण नसे. निशू मात्र जानेवारीत नाटक सिनेमे पूर्ण बंद करून चार महिने जीवाचा आटापिटा करी. इतका की तिला सारे दोन दोन दिसे डोळ्यांना. पण परीक्षा उत्तमच देई. पण ही अभ्यासाची आदर्श पद्धत नव्हेच. प्राजक्ता ज्या पद्धतीने अभ्यास करी त्याने तिला टेन्शन येत नसे. तुम्हांसही ते येऊ नये म्हणून अभ्यासाची आदर्श पद्धत सांगते. या मागे ४० वर्षांची तपश्चर्या आहे बरे. ४० पिढ्या घडविण्याचे पुण्यही पदरी आहे.

मित्रांनो, पहाटे उठून जर वाचन आणि पुनर्वाचन केलेत ना तर ते खूप म्हणजे खूपच फायद्याचे ठरते. कारण शांत वेळ, निवांतपणा आणि पूर्ण झोप झाल्याने आलेला ताजेपणा, मग लक्षात राहणे सोपे जाते. फ्रेश माइंड! फ्रेश थॉट्स! कळले ना? तुमच्या भाषेत हो!

मग तासभर जाऊ द्यावा. नि शाळा कॉलेजात जातांना मनात आठवून पहावे की किती आठवते? नाही आठवले तरी चिंतीत होण्याचे कारणच नाही. कारण तुम्हीच जज्ज आहात. लक्षात ठेवा कुणाला एक वेळा वाचून लक्षात राहते? कुणास दोन वेळा. अहो आपण तीन वेळा वाचू! उसमे कौनसी बडी बात है? प्रत्येकाचा वकुब वेगवेगळा असतो. हे ध्यानी ठेवावे.

पुनर्वाचन करूनही काही भाग समजला नाही तर अवघड भाग अधोरेखित करावा नि तो पुन्हा पुन्हा (समजे-उमजेपर्यन्त) वाचावा. तरीही काही शंका राहिली तर शिक्षकांना विचारावे, अथवा आपल्या वर्गातील हुशार मित्रांची मदत घ्यावी. ते फार उत्तम समजावतात.

लाडक्यांनो, वाचन, पुनर्वाचन, पठण, मनन, चिंतन आणि लेखन हे अभ्यासातले मैलाचे दगड आहेत. जे आपली अभ्यासाशी खरी खुरी मैत्री करतात. आपला आत्मविश्वास वाढवतात.

एक गंमत सांगते, माझी धाकटी मुलगी चौथीत असावी बहुदा. ती आजोबांना वाचायला लावी. स्वतः काही वाचीत नसे. नुसती त्यांच्या मांडीवर डोके ठेऊन श्रवणभक्ती. मी नोकरीवर! एकदा तिच्या बाईंनी मला तिच्या शाळेत बोलावले.

“अहो वाडबाई, एलफिनस्टनचं स्पेलिंग निशुने लिफीस्टन केलय. वाचीत नाही का ती? आम्हाला तर सारी पुस्तके पाठ आहेत म्हणते.”

तेव्हा कुठे मला आजोबा नि नातीमधले गुपित कळले. सारी पुस्तके पाठ असायचे कारण तैलबुद्धी! आणि विचित्र स्पेलिंग करण्याचे कारण म्हणजे श्रवणभक्ती! वाचलेच नाही तर स्पेलिंग काय कपाळ येणार?मग तिला धरून बांधून वाचायला लावायचे मी. मग तिने इतके वाचले, इतके वाचले की दोन दोन पी.एच.डी. प्राप्त केल्या. रंगभूमीवर स्त्रीची बदलती भूमिका ही नाट्यशास्त्रातील पदवी तिला नावलौकिक नि दिल्ली दरबारी सन्मान देऊन गेली. तर मित्रांनो, वाचनाने तुम्ही समृद्ध होता हे नक्की लक्षात ठेवा. वाचन फक्त पाठ्यपुस्तकाचे करू नये. इतर पुस्तकेही वाचावी. ज्यांचे एखादे उदाहरण आपल्या निबंधात अतिशय भाव खाऊन जाते.

वाचनाने आधी विषय समजतो. पुनर्वाचनाने तो पक्का होतो. मग अवघड, न समजलेला भाग पठण केल्याने आत्मविश्वास वाढतो. मनन केल्याने भीतीचा लावलेशही उरत नाही. चिंतन केल्याने मला किती येते, काय समजले नाही याची ओळख पटते नि न समजलेले उमगे पर्यन्त वाचले की आत्मविश्वासात कमालीची वाढ होते. एकदा तुम्ही स्वतः अनुभवा. या नानीच्या आग्रहाखातर आणि काय जादू होईल बघा लाडक्यांनो. नावडता भागही समजल्यावर आवडू लागेल.

आपल्याला सारीच माणसे जवळची वाटत नाहीत. तसेच विषयांचेही आहे. पुष्कळ मुलांना गणित आणि इतिहास भूगोल नको वाटतात. पण असे बघा, शालांत परीक्षेला या विषयात पास व्हावेच लागते. त्या शिवाय भारतात पुढल्या वर्गात प्रवेश नाही. “मी गणितात सातवीत आहे नि बाकी विषयात नववीत” अशी नाही ना सोय आपल्याकडे! मग गुणांबरोबर प्रेम कसे बसावे?

अहो गुपित असे आहे. दोन गणिते पुस्तकात विषय समजावा म्हणून सोडवून दाखविलेली असतात. ती नीट अभ्यासावी. मग स्वतः बघून सोडवावी. मग न बघता सोडवावी. चुक्या? मग बघा ना पुस्तकात. काय चुकले? सुधारा! आहे काय अन नाही काय? मी तुम्हाला माझेच उदाहरण सांगते. बारावीला घटक चाचणीत फिजिक्स या विषयात मी नापास झाले. हा धक्का पचवणे माझ्या सहनशक्तिबाहेरचे होते. मी आणि नापास? तुटून पडले मग फिजिक्सवर. येता-जाता, उठता-बसता, निजता फिजिक्स फिजिक्स आणि फिजिक्स. सारी प्रकरणे तोंडपाठ! परिणाम? फिजिक्समध्ये इतर सर्व विषयांपेक्षा अधिक गुण.

“शत्रूचा पाडा मुडदा, जा अंगावर धावूनी

परजा अभ्यासाचे शस्त्र या विजयश्री घेऊनी

घाबरू नका अभ्यासा, मुळी नका होऊ घाबरे

ऐशी तैयारी असुदे, की प्रश्नच हो बावरे!”

अशी तयारी करा दोस्तानो, की शिकार वाघाची करायला आलो नि समोर होते कोल्हे. ये हुई ना बात? डरना मना है दोस्तो|

तरवाचन, पुनर्वाचन, पठण, मनन, चिंतनया पायर्‍या झाल्या की सर्वात महत्त्वाची पायरी येते लेखन.

तुमच्या आईला विषय येवो अथवा न येवो. तिला वाचता तर येते ना? मग सांगा... “आई हा धडा मी पुन्हा पुन्हा अभ्यासला आहे. यातील दोन प्रश्न मला घाल. अगदी कोणतेही मी उत्तरे लिहितो.” मग लिहायचे. आले अतिउत्तम. नाही आले? कुछ नाही बिगड्या. पुनर्वाचन, पठण आणि लेखन फिरसे. उसमे कया है? खरे ना?

पूर्वीची एक म्हण सांगते, “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे!” येथे अशक्य ते शक्य दाखविले आहे.

आता सर्वश्रूत म्हणी. “प्रयत्नांती परमेश्वर” म्हणजेच काय? “गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्ज.” कळले ना?

अभ्यासाचे वेळापत्रक करा. सकाळची शाळा असेल तर दुपारी दोन तास आणि रात्री दोन तास. चार तासांपैकी एक तास वाचन, पुनर्वाचन आणि एक तास पठण. एक तास,मनन चिंतन नि शेवटला तास लेखन.

वाचनाने भाग समजतो. पुनर्वाचनाने अवघड भाग समजायला मदत होते. पठणाने लक्षवेध करण्यासाठी तुम्ही सज्ज होता... आणि लेखनाने स्मरणशक्तीवर शिक्कामोर्तब होते.

जे वाचिले ते ध्यानी ठेवले... पुनर्वाचनी आणि पठणे पक्के पक्के केले आणि लिहुनी त्यावर सील की हो ठोकिले.

एक खूप महत्त्वाची गोष्ट ध्यानी ठेवा. कोणी एकपाठी असतो. असो बापडा. मला चार वेळा वाचावे लागते काय? आता पाच वेळा वाचेन. बघाच. अशी मनाची धारणा ठेवा. लक्षात ठेवा. कोणीही अगदी कोणीही ढ नसतो.

परीक्षा जवळ आल्यावर टीव्ही बंद, व्हॉटसअप, ई चॅट? नो नो नो! अहो आलिया भट, रणबीर कपूर नाचताच राहणार आहेत. मे, जून, जुलै... बारोमास! टाईमपास अगदी नको ही पुन्हा न येईल वेळ! बिचारी आलिया तुमचे आसू पुसायला येणार आहे? नाही हो! आपली परीक्षा आपले ध्येय. आपली सुट्टी हव्वी तेवढी एंजॉय करा.

प्रत्येक जण प्रत्येक विषयात हुशार असणे ही असाधारण घटना आहे. पण येवढे जरूर शक्य आहे. जो विषय आवडतो त्यात तीर मारा. जो विषय फार अवघड जातो त्याच्या काठावर तरी प्रयत्ने, अभ्यासे पोहोचा. त्यासाठी मार्गदर्शनाची गरज लागली तर आईबाबांना न लाजता सांगा. योग्य, प्रशिक्षित व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या.

स्वतः बद्दल आपण अवास्तव अपेक्षा बाळगू नका. स्वतःची कुवत ओळखा. वर्गात पहिला नंबर एकाचाच येतो. खरे ना? कोणीतरी शेवटचाही असतोच.

“जीन्स आर द फंक्शनल फॅक्टर्स ऑफ हेरिडिटी” हुशारी वाड-वडिलांकडून येते. त्यामुळे मी साठ टक्केवाला असेल तर प्रयत्नाने पंचहत्तर पर्यन्त जाईन. सत्तर–पंचहत्तरवाला ऐंशी ब्याऐंशी प्रयत्ने कमवेल. पण जिनियसच पहिला. तेव्हा पालकांनीही कुवत लक्षात घ्यावी लेकराची. अपेक्षांची ओझी नका लादू मनावर त्यांच्या.

अभ्यास जो रोज, नियमित न चुकता करतो त्यास परीक्षेचे भय उरत नाही. माझी मोठी मुलगी १ जून पासून परीक्षेपर्यंत रोज रात्री ९ ते २ अभ्यास करीत असे. पै पाहुणा, सिनेमे, गप्पा कशाचेही तिला आकर्षण नसे. मग बारावीच्या परीक्षेला गणिताच्या पेपराआधी मला म्हणाली, “आता शांत झोपते. करण्यासारखे काही राहिले नाही.” त्या पेपरात तिला ९९ गुण मिळाले. तुम्हाला बेस्ट विशेस हं नानीकडून.

डॉ. विजया वाड