जत्रा

दिंनाक: 18 Feb 2020 15:52:54


कुणालला गावातील पोस्ट ऑफीसजवळ लावलेला जत्रेचा बोर्ड दिसला. 'जत्रा' शब्द दिसताच त्याचे डोळे अगदी विस्फारले गेले.  जत्रा कधी भरणार हे तो बारकाईने वाचू लागला. जणू काही वाटच पाहात होता जत्रेची.

दोनच दिवस जत्रा आहे हे वाचल्यावर त्याने त्याच्या बालमित्राची म्हणजेच चेतनची त्याच्या घरी जाऊन  भेट घेतली.
दोघेही सहावीत शिकत होते. एकाच वर्गात, एकाच बेंचवर बसत असत. दाट मैत्री होती त्यांची. दोघेही दयाळू स्वभावाचे होते. कुणालने चेतनला जत्रेविषयी सांगितले. चेतनने आईला विचारून उद्या सांगेन असे कबुल केले व फोन करून सांगेन असे म्हणाला.
कुणालच्या आईने तिचा जुना मोबाईल कुणालला वापरायला दिला होता. पण घराबाहेर न्यायचा नाही असे बजावले होते. फक्त घरात तो पंधरा मिनिटे वापरायचा असेही सांगितले होते. ठरल्याप्रमाणे कुणालने चेतनला फोन केला व जत्रेत जायला परमिशन मिळाल्याचे सांगितले. दोघेही मस्त टी-शर्ट आणि जिन्स पॅन्ट घालुन, पैसे घेऊन जत्रेत गेले.

जत्रेत दुकानांच्या पद्धतशीर रांगा होत्या. जास्तकरून महिलावर्गासाठीच दुकाने होती, लिपस्टिक ,नेकलेस, पिना, नेलपेंट वगैरे वगैरे. त्या जवळच पाणीपुरी, भेळपुरीवाल्यांकडे खूप गर्दी झाली होती. पुढेच एक रगडा-पॅटीसवालाही होता.
त्याच्याच स्टाॅलवर जाऊया असं दोघेही ठरवणार, इतक्यात गडबड झाली. आरडाओरड सुरू झाली.

स्टाॅलवाला ओरडू लागला होता, "नेकलेस किसने चुराया? चोर! चोर!! पकडो! कहा गया?"
त्याच्या दुकानातला एक, दोनशे रूपयांचा  नेकलेस बघता बघता गायब झाला होता.

काही महिला घाबरून लगेच दुसरीकडेच गेल्या. थोडी ढकलाढकलही झाली.

कुणालाच काही कळेना की नेकलेस नक्की चोरला कुणी?

गर्दीतल्या महिलांपैकीच तर नसेल ना कोणी?

संशयी नजरेने महिलांकडे सारे जण पाहात होते.

पण असा आपण कुणावर संशय दाखवू शकत नाही. उगीच एखादी निष्पाप महिला संशयामुळे दुखवायला नको.

चेतन आणि कुणालच्या मनात चोर कोण असेल हे जाणण्याची उत्सुकता लागली. दोघेही थोडे गर्दीपासुन दूर जाऊन निरिक्षण करत उभे राहिले.

सगळेजण जत्रा एन्जाॅय करत असल्याचे दिसत होते. लहान मुले आकाशपाळणा एन्जाॅय करत होती. महिला दागिने, पर्स, कपबशा, बाऊल, चमचे असे खरेदी करीत होत्या.पुरूष खिसे सांभाळत फॅमिलीसोबत चालत होते.

तेवढ्यात एक काळ्या टि-शर्टमधला मुलगा हातगाडीखाली गेल्याचे कुणालने पाहिले. कुणालच्या कपाळावर आठ्या पडल्या. भरगच्च भरलेल्या जत्रेत रमायचे सोडुन हातगाडी खाली कशाला घुसला हा?

चेतनला भूक लागली होती. तो पाणीपुरी खाणार्यांकडे आसुसलेल्या नजरेने पाहात होता. कुणालने त्याचे लक्ष हातगाडीखाली गेलेल्या मुलाकडे वळवलं.
पाच मिनिटांनी तो हातगाडीच्या बाहेर आला नि हात झटकुन पुढे निघुन गेला.

आता मात्र कुणाल आणि चेतन बेचैन झाले. त्यांनी हळूच हातगाडीच्या दिशेने सरकायला सुरवात केली आणि कुणाचे लक्ष नाही पाहून हातगाडीखाली वाकुन पाहिले.

अरे बापरे! इथे तर नेकलेस चमकतोय....
कुणालला कळले की मगाशी जी बोंबाबोंब झाली, ती याच नेकलेससाठी.

कुणाल आणि चेतन दोघेही त्या नेकलेस विक्रेत्याकडे गेले. तो खूपच गडबडीत होता. बायकांनी गर्दी करून त्याला गुंगवून टाकलं होतं.

शेवटी कुणालने जोरातच त्याला ओरडुन सांगितले की "आपका नेकलेस मिल गया."
हे शब्द ऐकताच विक्रेता चमकला. कुणालकडे पाहू लागला.

"कहा मिला नेकलेस?  किसने लिया था.?"

कुणालने हातगाडीखाली एका मुलाने नेकलेस लपवल्याविषयी त्याला सांगितले.

विक्रेत्याने आपल्या पोराला कुणालसोबत पाठवले. पोर गेला कुणालसोबत आणि खरंच  हातगाडीखालून नेकलेस काढला.

मातीने भरलेले हात व नेकलेस दोन्ही झटकत तो  झटकत बाहेर आला.
आपल्या वडीलांकडे जाऊन तो नेकलेस दाखवला. वडिलांनी पाहिले तर तो हार तोच होता जो गायब झाला होता.
दोघांनी चेतन व कुणालचे आभार मानले.

कुणाल व चेतन आभार स्विकारून पुढे जाऊ लागले.

एवढ्यात तोच मुलगा परत दिसला जो मगाशी हातगाडीखाली नेकलेस लपवत होता.

मळकट शर्ट, तुटलेली बटणे, विस्कटलेले केस, ठिगळ लावलेली पॅन्ट, आंघोळ नसल्यासारखे मळके शरीर, असा त्याचा अवतार होता.
चेतनने धावत जाऊन त्याला पकडलं आणि त्याची काॅलर पकडुन नेकलेस विषयी विचारलं.

तो घाबरला. तो सराईत चोर नव्हताचमुळी.

पण आज त्याची आई खूपच सिरियस झाली होती. तिच्या उपचारासाठी घरात पैसे नव्हते. म्हणून त्याने ठरवले होते की नेकलेस विकून त्या पैशातून आईला बरे करुया. म्हणून त्याने हा उपद्व्याप केला होता.
हे त्याने कुणालला सांगितले तेव्हा कुणालचे डोळे पाणावले.

"अरे, वाईट कामातुन कमवलेला पैसा कधीच यश देत नाही. तुझी आई अशाने वाचणारच नाही. चोरीच्या पैशाने उलट अजुनच सिरियस होईल ती. त्यापेक्षा हे घे पैसे आणि नंतर जमेल तेव्हा चांगले काम करून पैसे कमव आणि परत कर."
असे म्हणून  दोघांनी खिशातले पैसे त्या मुलाला दिले. आणि त्याच्या बोलण्याची शहानिशा करण्यासाठी त्याच्या घरापर्यंत जाऊन आईला पाहून आले.
त्या मुलाने ते पैसे घेतले, कारण त्याला त्याच्या आईला बरे करायचे होते.
त्या मुलाने कुणालचा फोननंबर घेतला आणि पैसे परत करीन असे वचन देत  साश्रुनयनांनी त्यांना निरोप दिला.

कुणाल व चेतनने आपापल्या घरी घडलेली घटना सांगितली, तेव्हा दोघांना घरून शाबासकी मिळाली. कारण आज दोघांनी एका आईचे प्राण वाचवण्यासाठी जत्रेतील खरेदी टाळली होती.

शैलजा भास्कर दीक्षित.
सहशिक्षिका, बालविकास कुटी,
गणेशवाडी, कल्याण पूर्व.