आज जयेशदादा खूप खूश होता, तो आज त्याच्या लाडक्या सरांना भेटून आला होता. जयेशदादा मला कायम त्याच्या सरांबद्दल सांगायचा. त्याचे सर विद्यार्थिप्रिय म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांचे  लाडके शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आजही त्यांचे विद्यार्थी आवर्जून त्यांना भेटायला जातात, जसा आज जयेशदादा गेला होता. त्यांच्याशी गप्पा मारणे, ही त्या विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असते. सर उत्तम लेखक आणि चित्रकारदेखील आहेत. दादा सांगत होता, त्यांनी चित्रकलेसाठी कोणताही क्लास लावला नव्हता, तरीदेखील त्यांची चित्र खूप मस्त असतात. त्यांच्या घरातही एका भिंतीवर सरांनी काढलेल्या छान-छान चित्रांच्या फ्रेम्स होत्या. ते लहानपणी गावात राहत असताना विविध सणांच्या निमित्ताने रांगोळीचे गालीचे देखील काढायचे, हे गालीचे काढायलाही त्यांचे तेच शिकले.  

अरे बापरे, मी जयेशदादाच्या सरांबद्दल तुम्हांला सांगतोय पण त्यांचे नाव आणि ते दादाला कुठे शिकवायला होते, हे सांगायचेच विसरलो. जयेशदादा पाचवी ते दहावी ‘पुणे विद्यार्थी गृह’ या पुण्यातील शाळेत शिकायला होता आणि त्याच्या सरांचे नाव म्हणजे डॉ. कृ.पं. तथा शशिकांत देशपांडे.

जयेशदादाला सर सांगत होते, ‘लेखन करीत असताना मला प्रेरणा कित्येकदा विद्यार्थ्यांकडूनच  मिळायची. त्यांच्या गरजेतून काही विषयही सुचले. त्याचे एक उदाहरण म्हणजे ‘मास महिमा’ ही मालिका! १९७३-७४ च्या सुमारास पाचवीच्या वर्गाला पाठ्यपुस्तकातील सणांवरचा एक धडा शिकवत असताना, मी मुलांना प्रश्न विचारले, तेव्हा लक्षात आले की त्यांना मराठी महिन्यांची नावेही सांगता येत नाहीत. कित्येकांच्या चेहऱ्यावर तर मराठी महिने? हा काय प्रकार आहे...असा आश्चर्याचा भाव उमटलेला दिसला. दिवाळी केव्हा येते... तर ऑक्टोबरमध्ये...गणपती...सप्टेंबरमध्ये...अशी उत्तरे मिळाली. निसर्गावरील निबंधातही अनेक गमतीजमती वाचायला मिळायच्या. त्यातून मला जाणवलं की, प्रत्येक महिन्यातील निसर्गवर्णनाबरोबरच आपले सण, उत्सव, संस्कृतीची प्रतीके, त्यामागे असणारा अर्थ, त्या महिन्यातील काही विशेष घटना या सर्वांना स्पर्श करणारी मालिका लिहिली तर ती या मुलांना निश्चितच उपयोगी होईल. त्यातून त्या मालिकेचा जन्म झाला. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. एवढेच नव्हे तर त्याला राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कारही मिळाला. ‘‘महाराष्ट्र दर्शन’’ ही पंधरा पुस्तकांची मालिका, ‘‘सहशालेय उपक्रमांचे दोन संच, मूल्यशिक्षण : संकल्पना, स्वरूप आणि सिद्धी’’ या पुस्तकांची निर्मितीही यानिमित्ताने आणि या गरजेतूनच झाली आहे.’

देशपांडे सर यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणाऱ्या वाडे या गावचा. त्यांचे प्राथमिक शिक्षण वाड्याला झाले. दिवाळीच्या वेळी घरीच आकाशकंदील तयार करणे, गणपतीची आरास पतंगाचे कागद लावून करणे, घराच्या समोर रांगोळीचे गालिचे काढणे अशा प्रकारे सर प्रत्येक क्षणाचा पूर्ण आनंद घेत होते. त्यांच्या घराजवळ डॉ. बोथरे राहायचे.बोत्रेकाकू सणांच्या वेळी रांगोळीचे छान-छान गालीचे काढायच्या. ते पाहून सरांनाही वाटले, आपणही अशाप्रकारे रांगोळी काढून पाहू याआणि त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांना छान-छान गालीचे काढायला येऊ लागले आणि त्यांचे कौतुकही होऊ लागले. मग ते सणांच्या वेळी आवर्जून असे गालीचे काढायचे.

सरांनी क्रांतिकारांवर खूप सारी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या संग्रहातपण क्रांतिकारकांवरील पुस्तके आहेत. स्वातंत्र्यासाठी आपले प्राण देणाऱ्या क्रांतिकारकांचे देशप्रेम, देशभक्ती याच्याबरोबरच त्यांचे धाडस, शौर्य, त्याग हे सगळे माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना समजले पाहिजे म्हणून त्यांनी ही पुस्तके लिहिल्याचे त्यांनी सांगितले. क्रांतिकारकांनी केवळ बंदुकाच चालविल्या नाहीत, तर त्यांच्या जगण्यात खूप सारे पैलू असल्याचे सर सांगतात. ‘सेनापती तात्या टोपे’ यांच्या चरित्राबरोबरच हुतात्मा राजगुरुंवर तर चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावर त्यांनी कादंबरीचे लेखन केले आहे. हुतात्मा राजगुरुंवरील ‘अग्निकंकण’ ही कादंबरी अनेकांना नुसतीच आवडली असे नाही, तर अनेकांना त्या कादंबरीने खूप सारे धैर्य दिले, तर अनेकांनी ती एका बैठकीत वाचून काढली होती. या कादंबऱ्याशिवाय ‘कथा क्रांतिकारकांच्या’ हा वीस पुस्तकांचा १ हजार ७०० पानांचा संग्रहही त्यांनी लिहिला आहे. सरांनी संपादित केलेल्या पुस्तकांसह त्यांनी एकशेपन्नासहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. सरांचा विविध पुरस्कारांनी सन्मानही करण्यात आला आहे.

अशा या देशपांडेसरांबद्दल लिहायचे तर खूप लिहायला आहे, त्यांचा शिकवण्याचा अनुभव, लेखनातील अनुभव आणि काही किस्से असे खूप काही आहे, पण आता मला अभ्यास करायचा आहे आणि हो जयेशदादाही ऑफिसमधून यायची वेळ झाली आहे. मला त्याला ‘सरप्राइज’ द्यायचे आहे. जेव्हा हा लेख तो वेबसाईटवर वाचेल ना, तेव्हा त्यालाही कळेल की मी देखील कसा त्याच्यासारखाच लिहितो ते.

 

तुमचाच मित्र

आदित्य