लहान मुलांसाठी असणाऱ्या ह्या वर्षीच्या शौर्य, क्रीडा, शैक्षणिक आणि कला व संस्कृती पदकांचं माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांनी नुकतंच वितरण केलं. ह्या चारही क्षेत्रात उत्तम काम केलेल्या लहान मुलांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदकं देण्यात आली. खरंतर त्यांचं वय बघता त्यांना पुढील कामगिरीसाठी उत्तेजनार्थ पुरस्कार द्यायला हवेत. पण लहान वयातच ही मुलं उत्तेजनार्थ ह्या कॅटेगरीच्या पलीकडे गेलेली आहेत. त्यांना मार्ग मिळालेला आहेच, आता ह्या पथावर चालत राहून त्यांनी ठरवलेलं उद्दिष्ट गाठायचं आहे.

 

शौर्य पुरस्कार मिळालेल्या ह्या मुलांमध्ये माणिपूरचा छोटासा लालकनसुंग आहे. वय वर्षं फक्त दहा वर्षं आणि उंची जेमतेम चार फूट. तलावात पडलेल्या तीन मुलींना त्याने आपला जीव धोक्यात घालून वाचवलं.

अरुणाचल प्रदेशची उंचपुरी पेमा हीसुद्धा शौर्य पुरस्कार विजेते आहे आहे. पुराच्या पाण्यात शाळेच्या वर्गाची भिंत कोसळत असताना तिने आपला जीव धोक्यात घालून आपल्या शाळेतल्या दोन मुलींना वाचवलं.

सौम्यदीप जाना हा पश्चिम बंगालचा. आपल्या आईला आणि बहिणीला दहशतवाद्यांपासून वाचवताना त्याला गोळ्या लागल्या. सहा महिने तो कोमात होता. अजूनही त्यावर उपचार चालूच आहेत. पुरस्कार स्वीकारायलाही तो व्हीलचेअरमधूनच आला.

 

शैक्षणिक पुरस्कारांमध्ये जम्मू काश्मीरचा ओमकार सिंग आहे. जगात सगळ्यात लहान सैद्धांतिक लेखकाचा विश्वविक्रम ओमकारच्या नावावर आहे. भौतिकशास्त्राशी संबंधित विषयांत त्याचं पुस्तक गाजलं असून त्या क्षेत्रातील थोरामोठ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

यश मिश्रा हा ओरिसाचा. त्याने नासामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि जागतिक स्तरावर गणितात जिनियस पुरस्कार त्याला मिळाला आहे. 0

वेंकट सुब्रमनियन हा पॉंडीचेरीचा मुलगा. मनगटापुढे एक हात नसतानाही राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत सुवर्ण आणि रजत पारितोषिकांचा वेंकट विजेता आहे.

 

कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा अश्याच छान आणि कर्तृत्ववान मुलामुलींना पुरस्कार देण्यात आले आहेत.

अथर्व मनोजकुमार लोहार हा आपल्याच महाराष्ट्रातला. व्यावसायिक स्तरावरचा तो वयाने सर्वात लहान तबलावादक आहे.

गौरी मिश्रा ही लहान वयात पियानोवादक आहे.

प्रगुण पुदुकोई कर्नाटकचा आहे. लहान वयात लेखक म्हणून त्याने जम बसवला असून वृत्तपत्रांमध्ये त्याचे लेख नियमित प्रकाशित होत असतात.

कोरोक बिस्वास हा डाउन सिंड्रोमनी ग्रस्त आणि ५०% मतिमंद असलेला शास्त्रीय नर्तक आहे. कलेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यालाही राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. 

 

क्रीडा पुरस्कारांमध्ये आरुषी शर्मा आणि विनायक बहादूर ही दोन नावं विशेष उल्लेखनीय आहेत. हे दोघेही मूक बधिर असूनही त्यांनी बॅडमिंटनमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करून अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

समन्यू पोथुराजू हा एक छोटासा सर्वात लहान गिर्यारोहक आहे. माऊंट किलिमिनझोरो ह्या टांझानियामध्ये असलेल्या आफ्रिकेतील आणि ऑस्ट्रेलियात असलेल्या माऊंट कोझिस्को ह्या सर्वोच्च शिखरांवर सर्वात लहान वयात चढाई करून त्याने विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. त्यालाही प्रधानमंत्री पुरस्कार देण्यात आला.

 

एकूण मिळून एकोणपन्नास मुलांना ह्या चार क्षेत्रात लहान वयात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कृत करण्यात आलंय. ह्या मुलांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे.

पुरस्कारांसाठी निवड करताना केंद्र सरकारने दिव्यांग, पूर्वोत्तर, काश्मीर, पॉंडीचेरी इथल्या मुलांना दिलेला न्याय अतिशय स्पृहणीय आहे.

भारतासारख्या विशाल देशाच्या कानाकोपऱ्यातुन समाजोपयोगी व समस्त मानवी जीवनाला उपकृत करणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वांचा सन्मान ज्याप्रमाणे पद्म पुरस्कारातून केला गेला, त्याचप्रमाणे लहान वयात दाखवलेलं अदम्य साहस, प्रतिभा आणि कौशल्य ह्यांचा योग्य गौरव वेळीच करून त्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल सरकार अभिनंदनीयही आहे.

 

ह्या सर्व मुलांचे हे गुण आणि कौशल्य कालपरत्वे वृद्धिंगत होवो आणि वैयक्तीक, सामाजिक आणि राष्ट्रीय उत्कर्षासाठी त्यांचा विनियोग होवो ह्याकरिता सर्व मुलांना खूपखूप शुभेच्छा!

 

- सारंग लेले, आगाशी.