मोतिया

दिंनाक: 14 Jan 2020 14:00:39


खऱ्या मोत्याचा रंग स्वच्छ पांढरा नसतो. त्या रंगाला थोडीशी पिवळसर झाक असते. या रंगाची तुलना गाईच्या दुधावर येणाऱ्या सायीशी होऊ शकते. सह्याद्रीत अनेक फुलं या रंगाची आढळतात. सप्टेंबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात एक देखणी वेल मोत्याचा साज आणि हाच मोतिया रंग घेऊन फुलतं. ही वेल आहे – मोहोर उर्फ शेंदवेल. मोहोर हे खास मावळ तालुक्यात प्रचलित असलेलं नाव. पावसाचा जोर ओसरला की खुरट्या आणि मध्यम उंचीच्या झुदुपांवर या वेलीची फुलं दिसायला लागतात. लांबून पाहिलंत तर ही फुलं झाडाची आहेत की वेलीची हे पटकन समजत नाही. इतकी ही वेल आधार देणाऱ्या झाडाशी एकरूप होते. या मोहोराच्या फुलांची रचना खरोखरच मोत्याच्या झुपक्यासारखी पातळ तंतूत नाजूक मोती ओवावेत आणि त्या माळांचे घोस एकत्र करून त्याचं तोरण बांधावं. तशी ही फुलं एका झुडुपाच्या डोक्यावरून दुसऱ्या झुडुपाच्या डोक्यावर पसरत जातात.

या मोहोराचं शास्त्रीय नाव – डायोस्कोरिया पेंटाफायला आणि कुळ आहे – डायोस्कोरेसी. हे कुळ म्हणजे कडू कारंद्याचं कुळ. इंग्रजीत या कुळातल्या फुलांना यॅम म्हणतात. पण रूपाने मात्र त्याच्यापेक्षा फारच वेगळा आहे. मोहोराच्या फुलांना मंद सुगंध असतो. मोतिया रंगाच्या बरोबरीने थोडीशी हिरवी छटा असते. नर आणि मादी फुलं वेगवेगळी असतात. त्यांच्या रचनेच्या वेगळेपणामुळे सहज ओळखू येतात. पानांच्या पाच दलांच्या रचनेमुळे शास्त्रात ‘पेंटाफायला’ हे नाव दिलं गेलं आहे. या वेलीची वाढ जमिनीतल्या कंदापासून होते. वेलीचा देठ जाड आणि टणक असतो. त्यायोगे ही वेल आधार देणाऱ्या झाडाला स्वतःला गुंडाळून घेत प्रस्थापित करते.

या वेलीच्या सौंदर्याव्यतिरिक्त तिचा आणखीनही एक महत्त्वाचा उपयोग केला जातो तो म्हणजे पावसाळ्यातील रानभाजी म्हणून !  मोहोराच्या नर फुलांची भाजी करून खाल्ली जाते. आडगावच्या बाजारातून तसेच लोणावळा-खंडाळ्यात तर ही भाजी हमखास विकायला आलेली आढळते. कधीतरी ठाणे, मुंबईच्या बाजारात ही विकायला येते. तेव्हाही या फुलांचे सौंदर्य यत्किंचितही कमी झालेलं नसतं. या पावसाळी रानभाज्यांना स्वतःचा असा विशिष्ट स्वाद आणि गंध असतो. तो सगळ्यांना आवडतोच असं नाही. या मोहोराचा भाजी म्हणून होणारा वापर खूप पूर्वीपासूनचा आहे. याचा मोहोर भारतभर आढळतो. कित्येक भागात याचे कंदच खाल्ले जातात. तो मुबलक आहे ओं तो खाण्यासाठी ओरबाडला जातो. अशाने ही देखणी वेल कधी नाहीशी होईल समजणारच नाही. डोंगरच्या मळलेल्या पायवाटेवरून चालताना आजूबाजूच्या झुदुपांवर खूप मोठ्या प्रमाणात या मोत्यांचे घोस दिसतात.

  • मीनल पटवर्धन